पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापूर्वी स्त्रीला देण्याची माहिती
- पोलीसात तक्रार दाखल करण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा बसविणे, किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी. पोलिसांकडे तक्रार देण्यापूर्वी स्त्रीला पोलीस स्टेशनमध्ये का तक्रार नोंदवायची आहे, हे समुपदेशकाने/सामाजिक कार्यकर्त्याने नीट समजून घेतले पाहिजे. कधी कधी दोन्हीकडील नातेवाइकांमध्ये पूर्वीचे वैमनस्य असल्याने माहेरच्यांनी स्त्रीच्या मनाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे प्रकारही आढळून येतात. म्हणूनच पोलीस स्टेशनची मदत घेण्याच्या चांगल्या-वाईट परिणामांची स्त्रीला माहिती देणे आवश्यक असते. जेणेकरून त्या क्षणी पोलिसांची मदत घ्यायची अथवा नाही याबाबत ती स्वतः विचारपूर्वक निर्णय घेऊ शकेल.
- संबंधित पोलीस तिच्या तक्रारीवर कोणत्या प्रकारची कारवाई करतील, त्याबद्दल तिला प्राथमिक माहिती द्यावी.
- तिला छळणाच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत जास्तीत जास्त व कमीत कमी किती शिक्षा होण्याची शक्यता आहे, यावर चर्चा करावी.
- तक्रार किरकोळ स्वरूपाची आहे की, गंभीर हे स्पष्ट लिहिण्यास सांगावे. किरकोळ स्वरूपाच्या तक्रारीवर पोलीस कारवाई करणार नाहीत. परंतु पुरावा म्हणून पुढे या तक्रारीचा उपयोग होईल.
- पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मने दुखावली जाऊन संसार पूर्णपणे तुटू शकतो, किंवा धाक वाटून काही प्रमाणात सुरळीतही होऊ शकतो. त्यामुळे आपल्या घरातील परिस्थितीमध्ये पोलीस कारवाईचा काय परिणाम होईल, याचा अंदाज बांधण्यासाठी स्त्रीला मदत करावी.
- पोलीस कारवाईनंतर नांदायला जाणार असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करून घेणे. पोलीस कारवाईमुळे नांदायला जाण्याच्या शक्यता संपल्या, तर तिचे कायदेशीर हक्क काय आहेत याची सविस्तर माहिती देऊन ते मिळवण्यासाठी तिला मार्गदर्शन करावे.
- तिच्या अर्जाची दखल घेण्यासाठी महिला संघटनांनी पोलिसांवर दबाव आणावा असा तात्पुरता, पण तीव्र आग्रह संघटनांकडे धरला जातो. पोलिसांबरोबर संघर्षाची भूमिका घेणे कार्यकर्त्यांनाही तात्पुरते मानाचे वाटू शकते. परंतु समुपदेशकाने कोणत्याही कार्यपद्धतीचा अवलंब करताना त्याचे तात्पुरते आणि दूरगामी परिणाम लक्षात घ्यावेत. स्त्रीच्याही लक्षात ते आणून द्यावेत. समतोल विचार करूनच निर्णय घ्यावा.
- काही विशिष्ट जाती, जमाती व धर्म, यांच्याबद्दल पोलिसांच्या मनात तेढ असते. त्यामुळे अर्ज लिहीत असताना पोलिसांच्या पूर्वग्रहांना खतपाणी देणारे काही लिहू नये.
- अर्जामध्ये खोटे-नाटे आरोप, तसेच अतिशयोक्ती (वाढवून) करून काही लिहू नये. खरे तेच लिहावे.
नवरा, सासू-सासरे यांच्याविरुद्ध स्त्रिया पोलीस स्टेशनाला खोटया तक्रारी दाखल करतात, कायद्याचा गैरवापर करतात. असा गैरसमज समाजामध्ये आढळतो. या गैरसमजाला आपण बळी पडू नये. पोलीस कारवाईबद्दल पुरेशी माहिती, माहेरच्यांचा पाठिंबा आणि परवानगी असेल, तरच स्त्रिया पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकतात. आत्मविश्वास खचलेल्या स्त्रीची पोलिसांसमोर स्वतःचा प्रश्न मांडण्याची योग्य ती तयारी करून घेतली पाहिजे.
(संदर्भ –‘चक्रभेद’ लेखक – मनीषा गुप्ते, अर्चना मोरे, मासूम संस्था, पुणे )