सुनीलची गोष्ट – भाग १
सुनीलची गोष्ट – भाग १ (स्क्रिप्ट)
मीनाचे ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्याचे नाव होते सुनील. सुनीलचे आयुष्य मीनापेक्षा अगदी वेगळे. सुनील त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. सुनील चे वडील, काका एकत्रच राहत. मोठ्या काकांना तिन्ही मुलीच. म्हणजे मोठ्या एकत्र कुटुंबामध्ये सुनील एकटाच मुलगा. घरातल्या सगळ्यांचा लाडका. सुनील ने काही मागितले आणि त्याला ते मिळाले नाही, असे कधीच झाले नाही. सगळं घर सूनीलच्या तालावर नाचायचे. एवढेच नाही, तर सुनीलच्या सगळ्या चुकांवर घरचे पांघरूण घालायचे. त्यामुळे आपले काही चुकूच शकत नाही असा एक टोकाचा आत्मविश्वास त्याला लहान वयातच वाटू लागला.
लहानपापासूनच सुनीलला दिसे, की घरातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचे वडील आणि काका. त्याच्या दृष्टीने ते सहाजिकच होते. घरचा व्यवसाय म्हणजे शेती. शेती मधील सगळा कारभार – पैशांचे व्यवहार वडील आणि काका बघत. घरातले सगळे महत्त्वाचे निर्णय ते घेत. शाळेत देखील मास्तर “तुझ्या वडिलांना विचार” असेच म्हणायचे. “आईला विचार” असे कधीच कोणी म्हणलेले त्याने ऐकले नाही. आपले नाव सांगताना देखील “सुनील शांताराम भोंडवे” असेच तो सांगे. आईचे नाव लिहिण्याचे प्रसंग फारच कमी. थोडक्यात काय, तर घरातले पुरुष सगळ्यात महत्त्वाचे हे त्याच्या डोक्यात पक्के बसले.
वडिलांना, काकांना घरात सगळे घाबरायचे, अगदी त्याची आजी देखील. याचे सुनीलला खूप कौतुक वाटायचे. वडिलांच्या चालण्याबोलण्यात एक प्रकारची मग्रुरी होती, ऐट होती. कित्येकदा सुनीलच्या आईला किंवा बहिणीला देखील शिवी द्यायला ते कमी करायचे नाही. बरेचदा त्यांनी आईवर हात उचललेला देखील त्याने पाहिला होता. त्यावेळी खरंतर त्याला त्याच्या वडिलांचा खूप राग येई. पण इतर कोणालाच त्याबद्दल काही न वाटल्यामुळे, हळूहळू हे वर्तन त्याला सवयीचे झाले. आपल्या वडिलांकडे खूप सत्ता आहे याची त्याला जाणीव झाली. गावात देखील एखादा कार्यक्रम, समारंभ असला तर निमंत्रण वडिलांच्या नावाने येई. त्यावर आईचा उल्लेख देखील नसे. या सगळ्यामुळे वडिलच त्याचे हिरो होऊन बसले. आपल्याला वडिलांसारखे बनायचे आहे असे त्याने मनोमन ठरवले.
त्याचे वडील दारू प्यायचे हे घरात सगळ्यांना माहिती होते. वडील दारू पिऊन आले की घरात हमखास भांडणे आणि मार झोड होई. आपण दारूच्या वाटेला जायचे नाही असे खरं तर त्याने ठरवले होते. पण जसाजसा तो मोठा होऊ लागला, तसे तसे त्याच्या वर्गातील पोरं घरून पैसे चोरून आणून व्यसन करू लागली. सुनीलने व्यसन करण्यास नकार दिल्यावर, त्याचे मित्र त्याला ‘बायल्या’ म्हणून चिडवू लागले. सुनीलला कसेसे झाले. ‘बायल्या’ या नुसत्या शब्दांमुळे आपण शक्तीहीन असल्यासारखे त्याला वाटले. त्याला स्वतः ची किळस वाटली. या त्रासातून सुटायला मित्रांच्या संगतीत तो थोडी- थोडी घ्यायला लागला. पुढे-पुढे सिनेमा, जाहिरातींमधून ‘खरे पुरुष’ कसे असतात याचे त्याला अनेक धडे मिळत गेले. ‘जोरात गाडी फिरवणारे, मारामारी करू शकणारे, कमावलेले शरीर असणारे, धोका पत्करणारे, बेफिकीर, स्त्रियांना काबूत ठेवणारे, रुबाबदार..’
सुनील वयात यायला लागला तसे त्याला त्याच्या वर्गातील मुलींबद्दल, इतर स्त्रियांबद्दल आकर्षण वाटू लागले. त्यातच त्याच्या मित्रांनी त्याला अश्लील सिनेमांची (ब्लू फिल्म्सची) ओळख करून दिली. ब्लु फिल्म ची ओळख झाल्यावर एक वेगळेच मोठे दालन त्याच्यासाठी उघडले गेले. त्या फिल्म्स मधले पुरुष नेहमी सुख ओरबाडून घेणारे, स्त्रियांवर बळजबरी करणारे, त्यांना नियंत्रित करणारे असल्यामुळे, सुनीलच्या ‘खऱ्या पुरुषांच्या’ व्याख्येत बसणारे होते आणि म्हणून देखील, सुनीलला ब्लू फिल्म्स चे जास्तच आकर्षण वाटायला लागले. त्या फिल्म्स बघण्यात तासंतास कसे निघून जात ते सुनील ला देखील कळत नव्हते.
या सगळ्या नादात शाळेतून त्याचे लक्ष उडाले. हळू हळू शाळेला बुट्टी मारून गावभर हुंडारण्याकडे त्याचा कल झाला. घरची शेती असल्यामुळे शाळेत जाऊनही काय फायदा असे त्याला वाटे. शेवटी दहावीच्या वर्गात तो नापास झाला आणि त्यानेच शाळा सोडली. मग काय? दिवस भर मोकळा. थोडावेळ शेतीत लक्ष घातले की नंतर मित्रांसोबत चकाट्या पिटत हिंडायचे. पुढे-पुढे गावातल्या राजकारणात भाग घेणे, अडल्या- नडल्याला धमकावणे, स्वतः चे टोळके जमवून सिनेमाला जाणे, शहरात जाणे, आठवड्यातून एकदा दारूची पार्टी करणे, असे सुरू झाले.
असे करत करत तीन- चार वर्ष गेली. घरात सुनीलच्या लग्नाचा विचार सुरू झाला. मुलगी गोरी, सुंदर, हिरोईन सारखी स्मार्ट पाहिजे ही त्याची एकमेव इच्छा. अशा मुलींशी मैत्री करायचा त्याने आधी बराच प्रयत्न केला होता. पण त्या मुलींचा तोरा त्याला सहन झाला नाही. त्याच्या पेक्षा वरचढ मुलगी पाहिली की त्याला एकदम न्यूनगंड येई. शेवटी त्याने तो नाद सोडला आणि स्वतः साठी मुलगी शोधण्याची जबाबदारी घरच्यांवर टाकली. घरच्यांनी मीनाचे स्थळ त्याला सुचविले. मध्यस्ती करणाऱ्याने सांगितले ‘मुलगी अगदी गरीब गाय आहे’. मीनाचे शिक्षणही त्याच्या पेक्षा कमी, तिची घरची परिस्थिती देखील बेताची. एकूण मीना काही आपल्या वरचढ नाही हे त्याने ओळखले. मीना दिसायला नाकी डोळी चांगली होती. सुनीलने होकार कळवला. मात्र त्याचे वडील आडून बसले. २५,०००/- रुपये हुंडा दिल्याशिवाय लग्न होणार नाही. शेवटी मीनाच्या भावानी कर्ज काढले आणि मीना-सुनीलचे लग्न पार पडले.
मीना आणि सुनील एकमेकांना अनुरूप आहेत का? कसा होईल या दोघांचा संसार? मीना आणि सुनीलच्या घरच्या वातावरणाचा त्यावर परिणाम होईल का? पाहुयात पुढील व्हिडिओंमध्ये.
वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा