टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

स्त्रियांवरील हिंसा म्हणजे काय?

कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता येईल.

आपल्या समाजाची रचना पुरुषप्रधान आहे. तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या जात, धर्म, वर्ग यामध्ये समाज विभागणी केलेली/झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आणि नियंत्रण असते तो दुसऱ्या घटकांवर हिंसा करताना दिसतो. त्यामध्ये पुरुष-स्त्रियांवर, पुरुष-पुरुषांवर, स्त्रिया-पुरुषांवर, स्त्रिया-स्त्रियांवर हिंसा करत असतात परंतु आपल्या समाजात पुरुषांना महत्त्व आहे आणि स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. अशा भेदभावामुळे सगळ्यात जास्त स्त्रियांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर हिंसा होत आहेत.

आपल्या समाजात पुरुषांचे अपघात रस्त्यांवर होतात, तर स्त्रियांचे त्यांच्या स्वतःच्या घरांमध्ये. आज हिंसेची व्याख्या तपासून पहाण्याची वेळ आली आहे. स्त्रियांवरील हिंसा म्हणजे फक्त मारहाण नाही तर मारहाण हे स्त्रियांवरील हिंसेचे उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, तंत्रज्ञानाचा (सोशल माध्यम) वापर करताना होणारी हिंसा, लैंगिक छळ, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. स्त्रियांवरील हिंसेचा महत्वाचा पैलू म्हणजे सर्रास करण्यात येणारा भेदभाव. मुलगी म्हणून किवा बाई म्हणून दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक, सर्वच बाबतीत केला जाणारा भेद, सतत नियंत्रण ठेवणं, निर्णय घेऊ न देणं, स्वातंत्र्य नाकारणं ही देखील हिंसाच आहे. कशाच बाबतीत मत न विचारणं, समंती व्यक्त करू न देणं, मताचा आदर न करणं हा स्त्रियांसाठी खूप हिंसक अनुभव असतो.

घरापासून ते गावं-शहरापर्यंत सर्व कारभारापासून हेतुतः दूर ठेवणं, सामावून न घेणं, ही न दिसणारी पण खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना अनुभवावी लागणारी हिंसाच आहे. हिंसेची आकडेवारी पाहिली असता आपल्याला लक्षात येईल की, समाजातील अर्धा हिस्सा आपण फक्त पितृसत्ताकतेमुळे दुर्लक्षित ठेवतोय. ही पितृसत्ताकतेची बंधने तोडून काही प्रमाणात स्त्रिया पुढे येताना दिसत आहेत. त्यांना साथ देऊन हा लढा बळकट करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ही लढाई फक्त महिलांची नसून, ती स्त्री आणि पुरुष दोघांचीही आहे.