टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

आईचे व मुलांचे सुरक्षा नियोजन

लहान मुलांना मोठ्यांच्या भांडणामध्ये घेणे चुकीचे आहे. पण आपला जीव धोक्यात येणार असेल तर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची व तुम्हाला मदत करण्याची मुलांच्याही मनाची तयारी झाली पाहिजे. यासाठी मुलांचे मन घट्ट करावे लागेल. हिंसाचक्राच्या कोणत्याही टप्प्यावर असलात, तरी तुम्ही मुलांना सर्व परिस्थिती समजावून सांगा. खरे तर आपण काही न सांगताही थोड्या मोठ्या वयाच्या मुलांना घरच्या परिस्थितीचा चांगला अंदाज आलेला असतो. त्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता व गोंधळ दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद करत राहणे फार महत्त्वाचे असते. न कळत्या वयातील मुलांना परिस्थिती कशी सांगायची याबाबत शिक्षिका किंवा जवळच्या कुटुंब सल्ला केंद्रातील ताईंची मदत घ्या.

(खालील वाक्यांवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या … )

मुलांसंदर्भात आईसाठी सूचना

स्त्रीला मारहाण होत असताना मुलांनी तिला मदत करावी, यासाठी मुलांकडून काही पूर्वतयारी आईने करून घेतली पाहिजे. त्या संदर्भात आईसाठी सूचना

  1. जीव वाचवण्यासाठी किंवा मारहाणीमुळे होऊ शकणारी दुखापत टाळण्यासाठी मुलांची मदत घेणे आणि नवराबायकोच्या भांडणात मुलांचा वापर करणे यातील फरक आईने लक्षात घेतला पाहिजे. मुलांकडून घरातील इतर लोकांविषयी माहिती काढून घेणे, त्यांना साक्षीला घेणे, आपली बाजू घ्यायला मुलांना भाग पाडणे अशा रीतीने मुलांचा वापर केला गेला तर मुलांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल हे लक्षात घ्या.
  2. तुम्हाला त्रास देण्यासाठी घरातील लोक मुद्दाम मुलांशी जवळीक साधतील. तुमच्याशी उद्धटपणे वागण्यासाठी, तुम्हाला उलट बोलण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देतील. मुलांना शिस्त किंवा त्यांच्यावर जास्त नियंत्रण ठेवण्याची ही वेळ नाही. तुमच्यासाठी मुले महत्त्वाची आहेत, मुलांचा तुम्हाला आधार वाटतो हे मुलांना प्रेमाने समजावून सांगा. स्वतःच्या प्रेमळ भावना दाखवण्यात अजिबात संकोच बाळगू नका.
  3. नव-याचा, सासूचा इतर नातेवाइकांचा राग मुलांवर कधीही काढू नका. त्यामुळे मुलांवर अन्याय होतो व मुले तुमच्यापासून दुरावतात.
  4. घरात भांडणे होत असताना मुलांनी काय करायचे हे मुलांना आधीच सांगून ठेवा. घरात काय घडते आहे, का घडते आहे, आपल्या जिवाला काय धोका आहे, कोणापासून धोका आहे याबद्दल कळत्या वयातल्या मुलांना विश्वासात घेऊन सांगा.
  5. टेलिफोनचा, मोबाईलचा वापर करणे मुलांना शिकवा. शेजारी, नातेवाईक वगैरे लोकांना फोन करून मुले त्यांची मदत मागू शकतील. मुलांकडून त्यांचे सुरक्षा नियोजन करून घ्या.
  6. तुमच्या सुरक्षा नियोजनाबाबत मुलांसमोर कोणाशीही बोलू नका. तुमच्या सुरक्षा नियोजनातील काही भाग मुलांना समजला असेल, तर गरज वाटेल त्याप्रमाणे त्यामध्ये जरूर बदल करा. मुलांवर अविश्वास म्हणून हा बदल करायचा आहे असे नाही, तर मुलांकडून घरातील लोकांनी ही माहिती मिळवल्यास तुमची सुरक्षितता धोक्यात येईल म्हणून बदल करायचा आहे.
  7. खाऊ, खेळण्यांचे आमिष देऊन किंवा धाक, भीती दाखवून तुमच्या नियोजनाबद्दल मुलांकडून माहिती काढून घेतली जाऊ शकते हे लक्षात ठेवा.
  8. मुलांना पुढील बाबी समजावून सांगा.
    1. आई घर सोडून जाण्याबद्दल निर्णय घेणार असेल व मुलांनाही तिच्याबरोबर घराबाहेर पडण्याची इच्छा असेल, तर मुलांनी आईजवळच थांबायचे आहे.
    2. खाऊ किंवा इतर कसलेही आमिष दाखवून मुलांना घरातले लोक परत बोलावत असतील, तरीही आईला सोडून मुलांनी एकटे जाऊ नये हे मुलांना सांगा.
    3. थोड्याशा मोठ्या वयाच्या मुला-मुलींनी आईची मारहाणीतून सोडवणूक करायची आहे. उदाहरणार्थ रॉकेल ओतून पेटवून दिल्यास आईच्या अंगावर भरपूर पाणी ओतणे किंवा घोंगडे, कांबळे टाकून आग विझविणे. इत्यादी.

पण हे करताना मुलांना स्वतःला दुखापत किंवा फार मानसिक ताण, होणार नाही, याची पुरेशी काळजी घेण्यास मुलांना शिकवले पाहिजे.

मुलांचे सुरक्षा नियोजन

स्वतःचा जीव धोक्यात असतानाही मुलांची काळजी आई घेते. पण आईचा जीवही मुलांच्या जिवाइतकाच महत्त्वाचा आहे. स्वतःच्या आयुष्यातील घडामोडींची झळ मुलांना बसणार नाही, यासाठी प्रत्येक आई धडपडत असते. याशिवाय मुलांची काळजी घेत असतानाच आपण आपल्या आयुष्यात चांगला बदल आणू शकतो हा आत्मविश्वास आईच्या मनात जागृत होऊ शकतो. म्हणून स्वतःबरोबर मुलांचेही सुरक्षा नियोजन पुढीलप्रमाणे करावे.

मुलांच्या सुरक्षा नियोजनाची सुरुवात मुलांच्या शाळेपासून करता येईल

  • मुलांच्या शाळेतील विश्वासू शिक्षिकांना भेटून घरच्या परिस्थितीची कल्पना देऊन ठेवा.
  • मुलांना कोणाबरोबर घरी पाठवायचे किंवा पाठवायचे नाही, हे शिक्षकांना स्पष्ट सांगा. तसे पत्रही शिक्षक व मुख्याध्यापकांकडे देऊन ठेवा.
  • मूल अचानक कोणाबरोबर किंवा एकट्याने निघून गेल्यास लगेचच शिक्षकांना कळवावे असे मुलांच्या मित्र-मैत्रिणींना सांगा.
  • घरातील ताण-तणावाच्या परिस्थितीचा मुलांच्या मनावर होणारा वाईट परिणाम अथवा त्रास कदाचित शिक्षकांच्या लक्षात येईल, म्हणून शिक्षकांच्या संपर्कात राहा.
  • मुलांच्या वाढीवर या वातावरणाचा होणारा परिणाम टाळण्यासाठी शिक्षकांनी तुम्हाला दिलेल्या काही उपयुक्त सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करा.
  • अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीला-मुलाला अंगणवाडी संपल्यावरही संध्याकाळी आई कामावरून परत येईपर्यंत ताईंनी स्वतःजवळच थांबवून घेण्यास अंगणवाडी ताईंना विनंती करा.

हे सर्व नियोजन अत्यावश्यक आहे. विशेषतः तुम्ही माहेरी असताना सासरची मंडळी मुलांना फसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे सुरक्षा नियोजन उपयोगी पडते.

मुलांना देण्याच्या सूचना

सर्व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने पुढील सूचना मुलांना देऊन ठेवल्या पाहिजेत. घरामध्ये भांडणे सुरू असतील तर या सर्वसाधारण सूचना जास्त महत्त्वाच्या ठरतात, आईने मुलांना सांगून ठेवायचे आहे की,

  • शाळेत जाताना-येताना भावंडांनी एकत्र यावे.
  • मोठ्या भावंडाने लहान भावंडाची काळजी घ्यावी, त्याला एकटे सोडू नये.
  • शाळेतील विश्वासू शिक्षकांना सांगितल्याशिवाय मुलांनी कुठेही जाऊ नये. घरातले कोणी न्यायला आले, तरी त्या शिक्षकांना सांगून मगच जायचे आहे.
  • शिक्षकांनी परवानगी दिली नाही, तर कोणाबरोबरी (अगदी घरातील व्यक्तींबरोबरही) शाळेबाहेर जायचे नाही.

मुलांच्या आजारपणातली विशेष काळजी

  1. मुलांच्या कपडे-औषधांची एक पिशवी विश्वासातील व्यक्तींकडे ठेवावी. मुलांना काही आजार असतील, तर त्याबद्दलची माहिती त्या व्यक्तींना द्यावी.
  2. मुलांच्या आजारपणाची माहिती लिहून ठेवावी. त्यामध्ये पुढील माहिती लिहिलेली असावी.
    अ) मुलाचे नाव ——————————————- मुलाचे वय —————————-
    आ) आजाराचे नाव————————————————————————
    ङ) औषधांची नावे——————————————————————
    इ) औषधांचे प्रमाण———————————————————-
    उ) डॉक्टरांचे नाव-पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्र.————————————————
    ऊ) मुलांसाठी आवश्यक असलेली औषधे खात्रीने मिळतात, त्या दुकानाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्र.
    —————————————————————————————————————-
    ए) औषधांसाठी लागणारे पैसे, कोणाकडून घ्यायचे त्या व्यक्तीचे नाव———————————
    ऐ) आजार झाल्यास घ्यायची दक्षता——————————————————————–
    ओ) औषधांची अॅलर्जी असेल, तर त्याबद्दल माहिती. पर्यायी औषधांची नावे——————————————————————————————————————————————
  3. या माहितीचा एक कागद मुलांच्या वापरात ठेवावा आणि एक कागद जवळच्या विश्वासू व्यक्तीकडे देऊन ठेवावा.
  4. आपले भावंड आजारी असल्यास इतर भावंडांनी काय काळजी घ्यावी, हे त्यांना आधीच समजावून सांगावे.
  5. ज्या मुलाला आजार असेल, त्यालाही स्वतःची किमान काळजी कशी घ्यायची याबद्दल सांगून ठेवावे. आजाराचा त्रास होऊ लागल्यास प्रथम कोणाला सांगावे, कोणते औषध घ्यावे, त्याचा डोस काय असेल, नाव वाचता आले नाही तरी औषधाच्या रंगावरून, गोळ्यांच्या व बाटलीच्या आकारावरून औषध कसे ओळखायचे याबद्दल मुलांना बारकाईने माहिती द्या.

मुलींची विशेष काळजी

प्रत्येक मुलीला स्वतंत्र व मोकळ्या वातावरणामध्ये राहाण्याची व वाढण्याची संधी मिळालीच पाहिजे. सुरक्षितता किंवा संस्कारांच्या नावाखाली मुलींवर जास्त बंधने घातली जातात पण मुलींवर बंधने घालण्यापेक्षा मुलींना धीट करणे हा जास्त चांगला पर्याय आहे. असेल त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुलींना निर्भय बनविल्यामुळे मुली सक्षम व सबल बनतात. आयुष्यातील संकटांना तोंड देऊ शकतात. आईने घेण्याची काळजी –

  1. आईने घराबाहेर पडताना पाच वर्षांच्या आतील मुलीला नेहमी स्वतःबरोबरच घेऊन जाणे बरे.
  2. अचानक एकटीला कुठे जावे लागले, तर मुलीला कोणाकडे ठेवायचे हे ठरवून ठेवावे.
  3. मुलीच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवा, हे विश्वासातील व्यक्तींना सांगावे.
  4. ज्या माणसांकडून धोका आहे, त्याच्याबद्दल मुलीच्या मनात अकारण भीती निर्माण होणार नाही अशा प्रकारे तिला धोक्याच्या सूचना द्याव्यात.
  5. घरातल्या गोष्टींबद्दल आई शेजाच्यांशी, मैत्रिणींशी बोलताना मुलगी ऐकते. घरातील परिस्थिती डोळ्यांनी बघते. यातले तिला सगळे समजत असेलच असे नाही. पण तिच्या मनावर याचा कळत नकळत परिणाम होत असतो, हे आईने लक्षात ठेवावे. बाईने मार खायचा असतो अशी तिची धारणा बनता कामा नये.
  6. मुलीच्या मनावर घरातल्या वातावरणाचा पडणारा ताण कमी करण्यासाठी काय करायचे, हे महिला मंडळातील, समुपदेशकाला विचारावे.
  7. तिच्या वागणुकीत चिंताजनक असे काही वेगळेपण नाही ना, तिची शारीरिक-भावनिक वाढ व्यवस्थित होते आहे ना याबद्दल सजग राहावे. गरज पडल्यास तिच्या शिक्षकांना भेटून विचारावे. त्यांनी केलेल्या आवश्यक त्या सूचना मुलगी व्यवस्थित पाळते का, हे पाहावे.
  8. घरातल्या तणावामुळे मुलगी एखाद्यावर पटकन विश्वास टाकू शकते किंवा मोहातही पडू शकते. अशा विचलित परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेत नाहीना, याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी मुलींशी सतत संवाद साधणे अत्यावश्यक आहे.

 (संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन मनीषा गुप्ते, अर्चना मोरे मासूम प्रकाशन वर्ष १० डिसेंबर २०१०)