ऑनर किलिंग
१९ वर्षीय कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचे प्रेमसंबंध समजले म्हणून तिचे शिक्षण बंद करून तिला घरी बसविले शिवाय तिच्या डोक्याला बंदूक लावून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या मुलीने या संबंधीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. (लोकमत, ७ मे २०१९)
तेलंगणामध्ये आपल्या मुलीने खालच्या जातीतील मुलीशी लग्न केले म्हणून मुलीच्या वडिलांनी १ कोटी रुपयांची सुपारी देऊन प्रणयचा खून केला. तो त्याच्या गर्भवती पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना हा खून केला. (लोकमत, २० सप्टेंबर २०१८)
हैदराबाद येथे मुलीने दलित समाजातील मुलाशी लग्न केल्यानंतर, विवाह मान्य आहे असे खोटे सांगून समेटासाठी बोलावून घेतले. थिएटर समोर जावई संदीपवर कोयत्याने हल्ला केला तर कोयत्याने पोटच्या मुलीचे हात तोडले. (लोकसत्ता २० सप्टेंबर २०१८)
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अनुराधाने शेतातील गड्याच्या मुलासोबत लैंगिक संबंध ठेवले म्हणून तिच्या आईवडिलांनी हत्या केली. शिवाय ज्या ठिकाणी तिची हत्या केली त्याच ठिकाणी तिचा पती श्रीशैल याचा देखील मृतदेह आढळून आला. (महाराष्ट्र टाईम्स, ९ डिसेंबर २०१८ )
मागच्या वर्षभरातील काही निवडक ऑनर किलिंगच्या या घटना. ऑनर किलिंग म्हणजे इज्जतीच्या नावाखाली होणारे खून अणि हल्ले. ज्या व्यक्तीमुळे घराण्याची इज्जत गेली त्या नातेवाईकाची, जोडप्याची, मुलीची किंवा स्त्रीची हत्या म्हणजे ऑनर किलिंग. यात समाजाने ठरवून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाऊन जे लोक नाती प्रस्थापित करतात किंवा विवाह करतात अशा लोकांनी घराण्याची इज्जत धुळीस मिळविली म्हणून संपविले जाते. यात विवाहबाह्य संबंध, वेगळ्या जातीतील किंवा धर्मातील व्यक्तीशी लग्न करणे, स्वतःच्या गोत्रात, भावकीत लग्न करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जर प्रेमसंबध आणि विवाह केल्यास होणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना सर्रास होताना दिसतात.
पोटच्या मुलांचा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेण्याइतपत जाती धर्माचा खोटा अभिमान येतो कुठून? याच्या मुळाशी गेल्यास आपल्या लक्षात येते, की कुटुंबाची, घराण्याची, खानदानाची इज्जत बाईच्या हातात असते असे मानले जाते. समाजाने ठरवून दिलेल्या नियमांत राहून केल्या जाणाऱ्या लग्नांनाच आपल्या विवाहसंस्थांमध्ये मान्यता दिली जाते. स्वतःच्या गोत्रात, दुसऱ्या जातीतील किंवा धर्मातील व्यक्तीबरोबर लग्न करता येत नाही हा त्यातील एक महत्वाचा नियम. स्वतःच्या मर्जीने लग्न करणे किंवा इतर जाती-धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे याचा संबंध इज्जतीशी आणि घराण्याच्या प्रतिष्ठेशी लावला जातो.
तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या स्त्रिया अधिक पवित्र असतात असे मानले जाते तर शुद्र समजल्या जाणाऱ्या जातीतील स्त्रिया या चारित्र्यहीन किंवा वाईट असतात असे मानले जाते. स्त्रियांच्या लैंगिकतेवरील नियंत्रण ठेऊन जात धर्म गोत्र यांचे रक्षण केले जाते. त्यामुळेच प्रत्येक धर्मातील तथाकथित उच्च जातीय स्त्रियांवर अधिक बंधने असल्याचे दिसून येते. बुरखा पद्धती, पडदा पद्धती, विधवा पुनर्विवाहास परवानगी नसणे, विशिष्ट प्रकारची कपडे घालण्याचा प्रघात अशाप्रकारची बंधने स्त्रियांवर घातली जातात. स्वतःच्या जातीची ओळख आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी हे नियम बनविले गेले. अशा रिती रीवाजांतून आपल्या जातीतील स्त्रिया किती पवित्र आहेत हे दाखविले जाते. स्त्रियांच्या माध्यमातून इतर जातींपेक्षा आपले वेगळेपण, श्रेष्ठत्व हे राखले जाते. यासाठी विवाह संस्था, कुटुंबसंस्था, जातव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि समाजव्यवस्था एकत्रितपणे काम करत असतात.
महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात संशोधनाच्या कामानिमित्त गेले होते. आम्ही लोकांच्या इज्जतीच्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
“मुलगी वयात आली, की लगेचच तिचे लग्न लावून देतो त्यामुळे मुलगी चारित्र्यहीन होतच नाही.”
“सातवीपासूनच लग्नाची तयारी होते. मुलगी दरवाजाच्या बाहेर जातंच नाही तर तिचं वाकडं पाऊल पडायचा संबंधच येत नाही”
“शाळेत गेली तरी तिनं गाडीमध्ये जायचं, गाडीमध्ये यायचं. गल्लीतील प्रत्येकाचे तिच्याकडे लक्ष असते आणि तिच्यावर दबाव असतो. तिला शक्यतो मोबाईल दिला जात नाही.”
“आमच्या समाजातील मुलीशी दुसऱ्या समाजातील मुलाचं लफडं आहे असं कळलं, तर त्याला मारून टाकतात आणि समोरची पार्टी मोठी असली त्याला मारायची ताकद नसली तरी आपल्या मुलीला मारून टाकतो”
मुलीने प्रेमविवाह आणि जातीच्या बाहेर विवाह करू नये यासाठी पालक काय करतात असे विचारले असता, तथाकथित उच्च जातीय समजल्या जाणाऱ्या गटातील पुरुषांनी दिलेल्या या प्रतिक्रिया.
‘अमकी- तमकीनं आईबापाचं नाक कापलं, तुम्ही तसं काही करू नका’, ‘ लग्नाची घाई झाली असली तर सांगायचं लगेच लग्न करून देतो पण असली थेरं करायची नाहीत.’ अगदी लहानपणापासूनच मुला-मुलींच्या मनावर स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडणे चूक असल्याचे बिंबविले जाते. जातीबाहेर किंवा धर्माबाहेर लग्न म्हणजे तर बोलायलाच नको. तो तर गुन्हाच जणू ! मुलगी म्हणजे घराची ‘इज्जत’ असं मानणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये मुलींवर अनेक बंधने येतात. प्रेमसंबंध समजले तर शिक्षण आणि बाहेर जाणे बंद होते, मारहाण केली जाते. अनेकदा मोठ्या बहिणीने स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडला म्हणून लहान बहिणीवर बंधने येतात. ‘वाकडं पाउल पडायच्या आत हात पिवळ करून द्या.’ असं म्हणत आजूबाजूचे लोक देखील पालकांवर सामाजिक दबाव आणताना दिसतात. कुटुंबात अगदी लहानपणापासून यावर चर्चा असल्याने इतर जातीच्या आणि धर्माच्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा विचारही करत नाहीत.
जातीभेद निर्मुलनासाठी अनेक समाज सुधारकांनी योगदान दिले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून ‘कोणताही जात, धर्म, वर्ग, प्रांत याबाबत भेदभाव केला जाऊ नये’ हा मुलभूत हक्क सर्वांना मिळाला.
आम्ही जात-पात काही मानत नाही असं जवळजवळ सगळेच म्हणत असतात. असे असूनही, जाती पावित्र्य राखण्यासाठी ही सामाजिक यंत्रणा अगदी चोखपणे आपली कामगिरी बजावत आहे. दोन वेगवेगळ्या जातीतील व्यक्तींनी विवाह केले तर ही जातीव्यवस्था मोडकळीस येईल व जातीशी निगडीत सत्तासंबंधांना देखील धक्का पोहचेल. म्हणूनच पितृसत्ताक व्यवस्था ही पुरुषाचे वर्चस्व व स्त्रीचे दुय्यमत्व अबाधित राहावे याची काळजी घेते तर जातीव्यवस्था आणि धर्मसंस्था ही लोक विविध जाती आणि धर्मात विभागले आहेत ते तसेच विभागलेले राहतील याची काळजी घेते.
ऑनर किलिंगच्या अनेक घटना पहिल्या तर आपल्या लक्षात येते, की बऱ्याचदा मुलगी तिच्या जोडीदारासोबत आनंदी असते तरीदेखील तिला संपविले जाते. अनेकदा गर्भात मुल असताना, किंवा त्यांना मुलं झाल्यानंतर जीवे मारले जाते. मुलीचे प्रेमसंबंध माहित झाल्यानंतर जातीतील कोणत्याही मुलाशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. खोट्या जात आणि धर्माच्या अभिमानापोटी पोटच्या मुलांवर अन्याय करत असताना मुलीला, जोडीदाराला मारत असताना आणि माणूसपण विसरत चाललो आहे हे लक्षातच येत नाही.
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांवर बंदी असल्याने अनेकजण आपल्याला हवा तसा जोडीदार स्वतःच्या मर्जीने निवडू शकत नाहीत. लहानपणापासून मुला-मुलींवर घालण्यात आलेली बंधने ही त्यांच्या स्वतंत्र्याच्या आणि स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडीच्या अधिकाराचे उल्लंघनच आहे. पुरोगामी वारसा असलेल्या आपल्या समाजाने उन्नत होण्याची गरज आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मोकळेपणाने मुला-मुलींशी जोडीदार निवड, संमती, मर्जी, जोडीदार पूरकता याविषयी चर्चा करण्याची गरज आहे.
लेखन – गौरी सुनंदा