कौटुंबिक हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली
आपल्या समाजात पुरुषांचे अपघात रोडवर होतात, तर स्त्रियांचे अपघात त्याच्या स्वतःच्या घरात होतात. मुली व स्त्रियांना प्रत्येक वेळी आपल्यावर कुटुंबात हिंसा होते आहे हे ब-याच वेळा लक्षात येत नाही. हे स्पष्टपणे समजण्यासाठी खालील प्रश्न वाचा.
- तुमच्यावर सतत टीका केली जाते का?
- तुमची इतरांबरोबर सतत तुलना केली जाते का?
- तुमच्या शिक्षणाचा उद्धार केला जातो का?
- तुमचा व तुमच्या जवळच्या व्यक्तीचा अपमान केला जातो का?
- तुम्हाला शिवीगाळ होते का? तुम्हाला उद्देशून अपशब्द वापरले जातात का?
- तुम्हाला एकटे पाडले जाते का?
- तुमच्याबरोबर अबोला ठेवला जातो का?
- महत्वाच्या विषयांच्या निर्णय प्रक्रियेत तुमचे मत घेतले जात नाही का?
- घरातल्या सगळ्या समस्यांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाते का?
- इजा करून घेण्याची किंवा करण्याची, जीव देण्याची किंवा जीव घेण्याची धमकी तुम्हाला दिली जाते का?
- तुम्हाला घराबाहेर काढण्याची/घटस्फोटाची धमकी दिली जाते का?
- तुम्ही काय बोलावे, कोणाशी बोलावे, कुठे जावे, केव्हा जावे हे इतर व्यक्ती ठरवतात का?
- तुम्हाला तुमच्या मुलांपासून तोडले जाते का?
- तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणी/शेजारी, माहेरी यांच्याशी संबंध ठेवू दिला जात नाही का?
- तुमचा इतरांसमोरही अपमान केला जातो का?
- तुम्हाला नोकरी करण्यासाठी किंवा अर्थार्जन करण्यासाठी विरोध केला जातो का?
- तुमच्याकडे सतत पैशाची मागणी केली जाते का?
- तुमचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले जातात का?
- तुम्हाला पैसा कसा व कुठे वापरायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही का?
- तुम्हाला प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जातो का? तुमच्यापासून कुटुंबाचे सर्व आर्थिक व्यवहार लपवून ठेवले जातात का?
- तुम्हाला शारीरिक इजा होईल असे वर्तन करतात का? उदा. मारणे, केस ओढणे, ढकलणे, चिमटा घेणे, चावणे, लाथा मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.
- तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे का?
- तुमच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली जाते का?
- लैंगिक संबंधात त्रासदायक पद्धती वापरल्या जातात का?
- तुमच्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांचा तुम्हाला त्रास होतो का? किंवा त्याने दुसरे लग्न केले आहे का?
- तुम्हाला पुरेसे अन्न, वेळेवर वैद्यकीय उपचार, योग्य ती औषधे यांच्यापासून वंचित ठेवले जाते का?
मैत्रिणींनो, कौटुंबिक हिंसेचे हे काही प्रकार आहेत. यासोबतच इतर अनेक प्रकारे महिलांना कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागतो. आपल्यावरील हिंसा सहन करू नका. स्वतःला दोष देऊ नका, हिंसेविषयी बोला, मदत मागा. हिंसामुक्त जीवन हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.
(संदर्भ – सखी हेल्पलाईन, पुणे)