गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४, सुधारित २००३
गर्भलिंगनिदानाला घालविण्यासाठी भारत सरकारने १९९४ साली गर्भलिंगनिदान विरोधी कायदा आणला. त्यानंतर त्यात २००३ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या.
गर्भलिंगनिदान हा गुन्हा
या कायद्यानुसार गरोदरपण आणि बाळंतपणाच्या आधी पोटातील गर्भ स्त्रिलिंगी आहे की पुल्लिंगी म्हणजेच मुलगा आहे की मुलगी याची तपासणी आणि निवड करुन घेणे (आणि त्यानंतर गर्भ मुलीचा आहे म्हणून गर्भपात करणे/मूल पाडणे) हा गुन्हा आहे.
गर्भतपासणी आणि गर्भलिंगनिदान
गरोदर स्त्रीला पुढील परिस्थितीमध्ये तपासण्या करून घेण्यास परवानगी आहे –
- गरोदर स्त्री चे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल,
- गरोदर स्त्रीचा यापूर्वी दोन किंवा अधिक वेळा नैसर्गिकरित्या गर्भपात झाला असेल,
- काही धोकादायक औषधे, रसायने, रेडीएशन यांच्या संपर्कात गरोदर स्त्री आली असेल किंवा तिला संसर्ग झाला असेल,
- गरोदर स्त्री किंवा तिचा पती यांच्यापैकी कोणाच्याही कुटुंबात कोणी मतिमंद, शारीरिक व्यंग, रक्तस्रावासंदर्भातील किंवा स्नायूंसंदर्भातील काही अनुवांशिक दोष असतील,
वरील परिस्थितीमध्ये गर्भामध्ये काही आजार, विकार असण्याची शक्यता असते, ते टाळण्यासाठी वेळीच औषधोपचार करणे शक्य व्हावे यासाठी गर्भतपासण्यांना परवानगी दिली जाते.
अशा चाचण्यांमध्ये गर्भाचे लिंग कोणते याची माहिती नको आहे असे गरोदर स्त्रीने लेखी घोषीत करावयाचे असते. तसेच या चाचणी करणा-या वैद्यकीय व्यावसायिकानेही ती चाचणी गर्भलिंग तपासणीसाठी केली जाणार नाही हे घोषीत करावे लागते.
गरोदर स्त्री, तिचा पती किंवा तिचे नातेवाईक यांनी कोणीही गर्भाचे लिंग तपासण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांवर दडपण आणू नये.
गरोदर स्त्रीच्या तपासण्या करण्यापूर्वी वैद्यकीय व्यावसायिकाने स्त्रीला –
- गर्भतपासणीच्या सर्व संभाव्य दुष्परिणामांची माहिती द्यावी.
- गरोदर स्त्रीची तिला समजेल अशा भाषेमध्ये या चाचण्यांसाठी लेखी संमती घ्यावी.
- लेखी संमतीची एक प्रत गरोदर स्त्रीला द्यावी.
महत्वाच्या तरतुदी:
- गर्भतपासणी करण्यास स्त्रीची लेखी संमती घेणे आवश्यक आहे.
- पोटातील गर्भ मुलगा आहे का मुलगी याची तपासणी करण्यास बंदी
- पोटातील गर्भाचे लिंग माहित करून मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यास बंदी
- पोटातील गर्भाचे लिंग माहित करून गर्भपात करून मिळेल अशा स्वरुपाची जाहिरात करण्यास बंदी. उदा. छापील पत्रक, एस एम एस. इ
- सोनोग्राफी केली जाते ती जागा, सोनोग्राफी मशीन (तपासण्याचे मशीन) आणि मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची शासनाकडे नोंदणी केलेली पाहिजे.
- सोनोग्राफी मशीन, केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र/सर्टिफिकेट सर्वांना दिसेल अशा दर्शनी जागी लावलेले असावे
- ज्या ठिकाणी सोनोग्राफी केले जाते त्याठिकाणी काही गोष्टी असणे बंधनकारक आहे
- वेटिंग रूम/थांबायची जागा, ओपीडी, सोनोग्राफी मशीनच्या शेजारी येथे पोटातील बाळाचे लिंग तपासणी केली जात नाही’ असा बोर्ड मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असायला हवा.
- या कायद्याचे पुस्तक असायला हवे.
- सोनोग्राफी मशीन वापरण्यासंबंधीचे प्रशिक्षण/ट्रेनिंग झाल्याचे सर्टिफिकेट असायला हवे.
- कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन केली आहे. यामध्ये तीन डॉक्टर, वकील, माहिती अधिकारी आणि तीन सामाजिक कार्यकर्ते विशेषतः एक महिला संघटनेची प्रतिनिधी असावी.
गुन्हे व शिक्षा:
या कायद्यानुसार पुढील कृत्ये गुन्हा मानली आहेत –
- गर्भधारणापूर्व व गरोदरपणात गर्भलिंगनिश्चिती, गर्भतपासणी करणेसाठी जागा उपलब्ध करून देणे,
- त्यासाठी आवश्यक मशीनरी उपलब्ध करून देणे,
- गर्भलिंगतपासणीसेवांची माहिती छापील स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक, इंटरनेट वगैरे माध्यमातून जाहिरातींमधून प्रसारीत करणे वगैरे
वरीलप्रमाणे सेवा-सुविधा दिल्या तर हा कायदा मोडला असे मानले जाईल. हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो. असे गुन्हे न्यायालयाबाहेर तडजोड करून मिटवता येत नाहीत.
शिक्षा
- वरील गुन्ह्यांसंदर्भात पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत कैद, किंवा रू. १०,०००/- पर्यंत दंड किंवा कैद व दंड अशी दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते,
- पुढील प्रत्येक वेळी दोषी आढळल्यास ५ वर्षांपर्यंत कैद किंवा रू. ५०,०००/- पर्यंत दंड किंवा कैद व दंड अशी दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते,
- तपासणीकेंद्रावर गरोदर स्त्रियांच्या करण्यात आलेल्या एकंदर तपासण्यांसंदर्भातील नोंदी कायद्यात सांगितल्याप्रमाणे अचूकपणे न ठेवणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाला ३ महिने कैद किंवा रू. १०००/- दंड किंवा कैद व दंड दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
- पहिल्यांदा दोषी आढळलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी तात्पुरती रद्द म्हणजेच व्यवसायाचा परवाना रद्द होऊ शकतो.
- पुन्हा दोषी आढळलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी कायमस्वरूपी रद्द म्हणजेच व्यवसायाचा परवाना रद्द होऊ शकतो.
- गर्भलिंग निवड किंवा गर्भलिंगनिश्चितीसंबंधित सेवांची जाहिरात करणा-या व्यक्तींना ३ वर्षे कैद किंवा रू. १०,०००/- दंड किंवा कैद व दंड दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
- लिंगनिवड करण्याची मागणी करणा-या, त्यासाठी दबाव आणणा-या व्यक्तीस पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षाची कैद किंवा रू. ५०,०००/ पर्यंत दंड किंवा कैद आणि दंड दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
- लिंगनिवड करण्याची मागणी करणा-या, त्यासाठी दबाव आणणा-या व्यक्तीस दुस-यांदा दोषी आढळल्यास ५ वर्षाची कैद किंवा रू. १,००,०००/ पर्यंत दंड किंवा कैद आणि दंड दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते.