टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

तुम्ही जेष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला जर हिंसेचा सामना करावा लागत असेल, तर..

हे जरूर करा

  • घरात एकटे राहात असाल, तर आपल्या वयाचे मित्र-मैत्रिणी, परिचित किंवा आपल्या वयाच्या नातेवाईकांकडे जा. त्यांना तुमच्याकडे बोलवा. त्यांच्या सहवासात राहा.
  • तुम्हाला कोणी शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देत असेल/होत असेल, तर हेल्पलाईनला कळवा किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा आणि समुपदेशकांचीही मदत घ्या.
  • जास्तीत जास्त वेळ सकारात्मक विचारात आणि कामात घालवा.
  • एखादा छंद जोपासा./आपल्या आवडीच्या एखाद्या क्षेत्रात मन रमवा.
  • ज्येष्ठ नागरीक संघ, हास्यक्लब, विरंगुळा केंद्र यासारख्या आपल्या जवळपास उपलब्ध असलेल्या ठिकाणी जेथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात तेथे जरूर जा.
  • आपल्या नंतरच्या सर्व व्यवहारांची योजना अगोदरच करा, आपल्या जोडीदाराच्या हक्कांची आणि अधिकारांची काळजी घ्या, मगच इतरांचा विचार करा.
  • जबरदस्ती किंवा ब्लॅकमेल करून तुमचे पैसे, दागिने, मालमत्ता कोणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर विश्वासातल्या व्यक्तीला सांगा किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा.
  • एकटे बाहेर जाताना घरातील व्यक्तींना कोठे जाणार आहात, ते सांगून जा.
  • घरात मदतनीस किंवा काळजीवाहक व्यक्ती (आया, दाया, नर्स, घर कामगार) घेणार असाल, तर ती व्यक्ती सर्वार्थाने विश्वसनीय असल्याची खात्री करून घ्या. सर्व माहिती लिखित ठेवा.
  • घरात २४ तासासाठी कोणाला मदतीला ठेवायचे असल्यास त्यांचे ओळखपत्र तपासून घ्या. आपल्याजवळ त्यांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक (फोन नं.), भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नं.), व फोटो ठेवून घ्या.
  • तसच जवळच्या पोलिस चौकीत त्यांची माहिती देऊन ठेवा.
  • घराबाहेर पडताना चष्मा, काठी, श्रवणयंत्र, घराचा पत्ता आणि संपर्क अशा नेहमी लागणाऱ्या वस्तू जवळ ठेवा.
  • मोबाईलमध्ये SOS calling ची सोय नसल्यास करुन घ्या व त्याचा वापर कसा करावयाचा तेही शिकून ठेवा.
  • ज्या खात्याचे डेबिट कार्ड जास्त करून वापरणार असाल, त्या खात्यात मुळातच जास्त पैसे ठेवू नका. ज्यायोगे तुमच्या कार्डाचा कोणी दुरुपयोग केला, तरी जास्त रकमेचे नुकसान होणार नाही. रक्कम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने क्रेडीट कार्ड पेक्षा डेबिट कार्ड जास्त सुरक्षित असते.
  • आपले मृत्युपत्र किंवा इच्छापत्र वेळीच करून ठेवा.
  • त्यात आपल्यासाठी दवाखान्यावर/ औषधोपचारांवर किती खर्च करायचा आहे, याचा स्पष्ट उल्लेख करा.
  • स्मरणशक्ती तल्लख राहण्यासाठी पुस्तकांचे वाचन, गाणी म्हणणे, कोडी सोडवणे यांचाही वापर करा.
  • आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळेत जेवण करा आणि औषध घ्या आणि जमेल तसा व्यायामही करा.
  • न्हाणीघर (Bathroom), शौचालय (Toilet) या ठिकाणी सपोर्ट बार बसवून घ्या.

हे कधीही करू नका

  • कोणावरही सहजगत्या विश्वास ठेवू नका. / एकटे असाल तर तसं कोणाला (विश्वास नसणाऱ्या व्यक्तींना) सांगू नका.
  • आपल्या वैयक्तिक गोष्टी विश्वासातील नसलेल्या व्यक्तींजवळ खुलेपणाने बोलताना काळजी घ्या.
  • कोणाच्याही त्रासामुळे, रागामुळे किंवा इतर कारणांमुळे जेवण न करणे, औषध न घेणे, वैयक्तिक स्वच्छता न पाळणे, असे करू नका.
  • स्वत:ला एकटे एकटे ठेवू नका.
  • आपल्याजवळील मौल्यवान वस्तूंबद्दल विश्वासातील व्यक्ती सोडून कोणालाही सांगणे टाळा.
  • बाहेर जाताना (कुठेही) अंगावर सोन्याचे दागिने घालू नका, / गरजेपेक्षा जास्त पैसे सोबत ठेवू नका.
  • तुमचे पैशाचे व्यवहार अनोळखी माणसांसमोर करू नका.
  • चेकबुकवर सह्या करून ठेवणे किंवा चेक दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला लिहावयास सांगणे, असे प्रकार करू नका.
  • न वाचता घाईघाईमध्ये कोणत्याही कागदावर सही करू नका.
  • आपल्या हयातीतच आपल्या सर्व मालमत्तेची वाटणी करून ती प्रत्येकाला देऊन टाकणे टाळा.
  • तुमच्या घरातले मतभेद परक्या व्यक्तींसमोर उघड करू नका.
  • घरात किंवा स्वत:जवळ खूप जास्त रोकड रक्कम ठेवू नका.
  • मोठ्या कालावधीनंतर परतावा मिळणाऱ्या गुंतवणुकी (Long term investment) कररू नका आणि कोणासाठीही कर्ज काढताना पुरेसा विचार करा.
  • स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.