धोक्याची पातळी ओळखणे
अनेकदा केंद्रामध्ये एकाच वेळी तीन – चार स्त्रिया येतात. प्रत्येकीला परत जाण्याची घाई असते. “आपल्याशी समुपदेशक ताबडतोब बोलली तरच आपला प्रश्न सुटेल, नाही तर आपले काही खरे नाही.” असेही त्यातील एखादया स्त्रीला वाटत असते. आपल्याकडे आलेल्या या स्त्रियांपैकी एखादीच्या जिवाला खरेच धोका असू शकतो व आपण ताबडतोब सुरक्षा नियोजन केल्यास तिचा जीव वाचूही शकतो. तसेच स्वतःचा जीव वाचवण्याबद्दल योग्य सल्ला व माहिती मिळाली नाही तर तिच्या जीवाला धोका होईल अशी शक्यता असते. पण तातडीने नेमके कोणाशी बोलले पाहिजे, हे अनेकदा कळत नाही. म्हणूनच स्त्रीच्या जिवाला इतरांकडून किंवा स्वतःकडून असलेला धोका ओळखणे ही अत्यंत कौशल्याची बाब प्रत्येक समुपदेशकाला जमली पाहिजे.
धोका ओळखण्यासाठी माहिती मिळविण्याच्या हेतूने एक प्रश्नावली दिलेली आहे, पहिल्याच भेटीत काही थेट व मोजके प्रश्न तिला विचारले पाहिजेत.
(खालील वाक्यांवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या. सोबत प्रश्नावलीच्या PDF ची लिंक आहे. )
1. धोक्याची पातळी ओळखण्याचे ठळक प्रश्न
आज केंद्रात येण्यापूर्वी एखादी गंभीर घटना घडली आहे का? होय/ नाही जिवाला धोका होईल अशी भीती वाटते आहे का? होय/ नाही घरी परतल्यावर तीव्र काळजी करण्यासारखी घटना घडेल अशी तिला भीती वाटते आहे? होय/ नाही "आपल्याला होणारा त्रास संपणार नाही. तेव्हा स्वतःला संपवणे हाच सोपा उपाय आहे." असा विचार तिच्या मनात सतत येतो का? होय/ नाही आज केंद्रातून बाहेर पडल्यावर नेमके कुठे जायचे आहे हे माहिती नाही अशी तिची परिस्थिती आहे का? होय/ नाही
एकूण गुण :
यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आले तर तिच्याकडून धोक्याची पातळी ओळखण्याची खालील प्रश्नावली ताबडतोब भरून घ्यावी.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
2. इतरांकडून जिवाला धोका आहे का याचे मूल्यमापन
स्त्रीने आता तिच्याभोवती असलेल्या वातावरणात राहणे प्रचंड धोक्याचे आहे हे दाखवणारा आलेखस्तंभ:
जीव वाचविण्यासाठी घर सोडून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर आला आहे का? होय/ नाही तुम्हाला जिवे मारून टाकण्याचा प्रयत्न घरच्या कोणी केला आहे का? होय/ नाही असा प्रयत्न एकापेक्षा अधिक झाला आहे का? होय/नाही मारहाण होत असताना तुम्ही आरडओरड करून घरात मदत मागत असतानाही घरातील लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का? होय/ नाही तुम्हाला मारून टाकीन अशी धमकी गेल्या काही दिवसांमध्ये देण्यात आली आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
या तक्त्यातील एकाजरी प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल तर धोक्याची पातळी ‘तीव्र’ मानावी. जितक्या जास्त प्रश्नांना ‘होय’ म्हणून उत्तर येईल तितका जिवाला जास्त धोका आहे असे समजावे. ही गंभीर बाब तिच्या विश्वासातल्या व्यक्तीला सांगावी. आधारगृहात राहायला जाण्याबाबत सल्ला द्यावा. ‘जीवाला धोका आहे.’ असा अर्ज लिहून घ्यावा.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
3. स्त्रीच्या मनातील आत्महत्येचा विचार
धोकादायक परिस्थितीत स्त्रीची इच्छाशक्ती शाबूत असते तोवर ती विरोध करते. परंतु सतत होणाऱ्या मारहाणीनंतर तिच्यामध्ये परिस्थितिशी झगडण्याची ताकद कमी व्हायला लागते. ‘आपले भोग संपत नाहीत, तर आपला जीवच संपवू.’ अशा विचारांची गर्दी होऊ लागते. अशा वेळी तिला स्वतःकडून असलेला धोका समजून घेण्यासाठी हा आलेखस्तंभ :
"स्वतःचे आयुष्य संपवून टाकावे." असा विचार तुमच्या मनात येतो का? होय/ नाही आत्महत्येचे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतरही परत परत डोकावतात का? होय/ नाही तुम्हाला मारहाण करणाऱ्यांना तुम्ही आत्महत्येचे विचार बोलून दाखविले आहेत का? होय/नाही घरातल्यांना आत्महत्येची धमकी दिली की त्यांच्याकडून होणारा त्रास तात्पुरता थांबतो असे तुम्हाला वाटते का? होय/ नाही
एकूण गुण:
या तक्त्यातील एकजरी उत्तर ‘होय’ असेल, तर धोक्याची पातळी ‘तीव्र’ मानावी. जितक्या जास्त प्रश्नांना ‘होय’ म्हणून उत्तर येईल, तितकी आत्महत्येची शक्यता जास्त.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
4. जीवघेणी परिस्थिती/ जीवघेणी मारहाण
स्त्रीला होणारी मारहाण जीवघेणी ठरू शकते का हे समजून घेण्यासाठी आलेख स्तंभ
हत्यारे किंवा घातक वस्तूंनी तुम्हाला मारहाण होते का? होय? नाही तुम्ही आत्महत्या करावी यासाठी तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला आहे का? होय/ नाही मारहाणीची धमकी दिली जात असताना अमूक एका पद्धतीने मारून टाकीन असे तुम्हाला स्पष्ट बोलून दाखविले गेले आहे का? होय/ नाही
एकूण गुण :
या तक्त्यातील एकजरी प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर धोक्याची पातळी ‘तीव्र’ मानावी. या पुस्तकाच्या भाग चार, प्रकरण तेरा मध्ये दिल्याप्रमाणे ताबडतोब सुरक्षा नियोजन करावे. स्त्रीशी रोजच्या संपर्कात राहावे. पोलिसांकडे अर्ज लिहून देण्याबाबत सल्ला द्यावा.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
5. स्त्रीच्या जिवाला जाणवलेला धोका
समुपदेशकाबरोबरचा स्त्रीला स्वतःच्या धोकादायक परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते. आपापल्या परिस्थितीतील धोका ओळखण्याच्या प्रत्येकीच्या स्वतंत्र पद्धती असतात, त्याबद्दलचा हा स्तंभ:
जोडीदाराचे वर्तन पूर्वीपेक्षा जास्त हिंसक झाले आहे असे तुम्हाला जाणवले आहे का? होय/ नाही तुमच्या जिवाला धोका होईल असे काही संशयास्पद बदल घरातील लोकांच्या वागण्यात जाणवत आहे का? होय/ नाही शेजारी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला कळत नकळत सावध राहण्याचा इशारा दिला का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील तक्त्यातील एकापेक्षा जास्त प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर धोक्याची पातळी ‘तीव्र’ मानावी. तिला सतर्क व सांभाळून राहण्याचा आग्रह धरावा. माहेरच्या लोकांना परिस्थिती सांगण्याचा सल्ला द्यावा.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
6. जीवघेण्या मारहाणीची शक्यता ओळखणे
जोडीदार रागावलेला असताना त्याची खूप भीती वाटते का? होय/ नाही कधी खूप प्रेमाचे, तर कधी खूप रागाचे असे त्याचे टोकाचे वागणे असते का? होय/ नाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांमध्ये त्याचे उठणे बसणे वाढले आहे का? होय/ नाही पिस्तुल, चाकू किंवा इतर जीवघेणी शस्रे तो बाळगतो का? होय/ नाही दुसऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी अशी शस्रे वापरणे गरजेचे आहे, असे त्याला वाटते का? होय/ नाही तो व्यसनी आहे का? होय/ नाही तो तापट स्वभावाचा आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील तक्त्यातील एकापेक्षा जास्त प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर जीवघेण्या मारहाणीची शक्यता जास्त आहे असे मानावे.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
7. तुमच्या जोडीदाराची / नवऱ्याची वृत्ती हिंसक आहे का हे ओळखणे
अनेकदा आपल्याकडे समुपदेशनासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी माहेरची मंडळी मुलीला घेऊन येतात. सासरी भांडणे सुरु असतात. “मारहाण होत नाही” असे सर्व म्हणत असतात. अशावेळेस मारहाणीची शक्यता आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठीचा हा आलेख स्तंभ:
तुमच्या जोडीदाराने लहानपणी घरातील इतर स्त्रियांवर हिंसा होताना पहिली आहे का? होय/ नाही "बाईमाणूस ही पायातली वहाण" अशा अर्थाची वाक्ये तो सहज म्हणतो का? होय/ नाही तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमच्या माहेरचे नातेवाईक आणि तुमचा तो राग-राग करतो का? होय/ नाही जवळच्या एखादया स्त्रीला मारहाण होते तेव्हा “तुझी अशीच गत करीन.” अशा धमक्या तो देतो का? होय/ नाही त्याच्या मनात स्वतःबद्दल कमीपणाची भावना, न्यूनगंड किंवा अहंकार आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
यापैकी जितके गुण जास्त तेवढी स्त्रीला कौटुंबिक हिंसा होण्याची शक्यता जास्त.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
8. स्त्रीच्या मानसिक परिस्थितीबद्दल माहिती
सध्या तुम्हाला काही मानसिक आजार आहेत का? होय/ नाही तुम्हाला पूर्वी कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार झाला होता का? होय/ नाही दररोजचे काम, सण-समारंभ यात कशातच रस वाटत नाही अशी बरेच दिवसांपासून निराशा आली आहे का? होय/ नाही भूक न लागणे, लैंगिक संबंधांत रस ना वाटणे, छातीत धडधडणे, झोप न लागणे यांसारखी लक्षणे महिन्याहून अधिक काळासाठी जाणवत आहेत का? होय/ नाही तुमच्या अंगात येते का? होय/ नाही
एकूण गुण:
स्त्रीची मानसिक परिस्थिती नाजूक असेल, किंवा तिला एखादा मानसिक आजार असेल, तर तिच्यावर हिंसा होण्याची शक्यता वाढते.
तसेच तिची हिंसेला प्रतिकार करण्याची ताकदही कमी होते. कौटुंबिक हिंसा व मानसिक आजार यांचे मिश्रण स्त्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करते. म्हणून मानसिक आजारावर लवकरच उपाय करायला हवेत. मानसशास्रज्ञाशी संपर्क ठेऊन स्त्रीला होणारा त्रास त्यांना सांगत राहावा. त्यांच्याकडून मार्गदर्शन अथवा औषधे आवश्यक असल्यास ते स्त्रीला सांगावे.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
9. सासरच्या लोकांची वृत्ती हिंसेला पूरक आहे का?
घरातील सदस्यांशी गावकरी तुटक वागतात का? होय/ नाही नातेवाईक/ शेजारी यांच्यापासून तुम्हाला तोडून टाकले आहे का? होय/ नाही घरातील सदस्यांशी तुमचे संबंध बिनसले आहेत का? होय/ नाही काही गंभीर कारणावरून तुमचे नवऱ्याशी संबंध बिनसले आहेत का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील काही प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर स्त्रीवर भविष्यात हिंसा होण्याची शक्यता आहे, हे ओळखावे.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
10. तीव्र प्रकारची हिंसा खालील कुटुंबामध्ये होऊ शकते
घरातील इतर सुना नांदत नाहीत, असे आहे का? होय/ नाही कुटुंब सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का? होय/ नाही जाच सहन करून मुलीने सासरी नांदलेच पाहिजे, असे तुमच्या माहेरच्यांचे ठाम मत आहे का? होय/ नाही सासरच्या घरातील एखादी स्त्री संशयास्पदरीत्या मरण पावली आहे का? होय/ नाही माहेरचे कोणी जाब विचारत नाहीत म्हणून सासरी छळ वाढत चालला आहे असे तुम्हाला वाटते का? होय/ नाही
एकूण गुण:
वरीलपैकी एखादया प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर आज हिंसा होत नसली तरी भविष्यात तीव्र व धोकादायक प्रकारची हिंसा होऊ शकते. म्हणून तिच्या परिस्थितीबाबत माहिती संकलित करावी. व परिस्थितीमधील धोके तिच्या लक्षात आणून द्यावेत.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
11. स्त्रीची कुटुंबातील किंमत कमी होण्याची कारणे
स्त्रीमध्ये दोष शोधून अनेकदा हिंसा केली जाते. विशेषतः शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक कारणांमुळे स्त्रीला घरात मान नसेल, तर हिंसा होण्याची शक्यता वाढते.
पहिली बायको ( मयत) ही तुमची बहिण अथवा घरातीलच मुलगी असून तिच्या मुलांचा आपलेपणाने सांभाळ व्हावा म्हणून तुमच्याशी लग्न लावण्यात आले आहे का? होय/ नाही पहिल्या बायकोला मूल नाही किंवा ती आवडत नाही, अशा काही कारणांनी तुमच्याशी दुसरा विवाह लावण्यात आला आहे का? होय/ नाही पहिल्या बायकोने स्वतः हे लग्न जुळवून आणले आहे का? होय/ नाही तुमच्या किंवा जोडीदाराच्या मनाविरुद्ध हे लग्न जुळवले आहे का? होय/ नाही जोडीदारामध्ये मानसिक व्यंग किंवा अपंगत्व आहे, तरीही गरिबी किंवा इतर कारणांमुळे तुम्ही स्थळ स्वीकारले आहे का? होय/ नाही तुमच्यानंतर नवऱ्याने दुसरी बायको केलेली आहे का? होय/ नाही तुम्हाला मुले/ मुलगा नाही, पण तुमच्या सवतीला आहेत. असे आहे का? होय/ नाही तुम्हाला अपंगत्व अथवा शारीरिक/ मानसिक आजार आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
12. स्त्री ही दुसरी बायको असेल तर खालील प्रश्न विचारावेत
पहिल्या बायकोपासून घरच्याघरी काडीमोड घेतलेला आहे का? होय/ नाही तिने नांदायला येणार नाही, असे सांगितले आहे का? होय/ नाही नवरा बिजवर आहे व तुमचे वय लहान आहे का? होय/ नाही पहिल्या बायकोने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर त्या स्त्रीची कायदेशीर व सामाजिक बाजू कच्ची असण्याची शक्यता जास्त आहे.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
13. स्थळ स्वीकारताना सासरच्यांची मनस्थिती
तुमच्या स्थळाला सासरच्या काही महत्त्वाच्या लोकांची नापसंती होती का? होय/ नाही लग्नाआधी नवऱ्याला एखादी मुलगी पसंत असूनसुद्धा घरातल्यांच्या आग्रहामुळे त्याने तुमच्याशी लग्न केले आहे का? होय/ नाही सासू- नणंद-जाऊ किंवा घरातील इतर काही जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या माहेरच्या लोकांचे भांडण झाले होते का? होय/ नाही लग्नाच्या देण्या-घेण्यावरून बैठकीमध्ये काही वाद झाले होते का? होय/ नाही लग्नाच्या बैठकीत किंवा मांडवात सासरचे लोक अडून राहिलेले असताना, त्यांची मनधरणी करून तुमचे लग्न लावले गेले आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर भविष्यात सासरी मारहाण होण्याची शक्यता वाढते.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
14. स्थळ स्वीकारताना माहेरच्यांची परिस्थिती
घरातील भावंडांच्या लग्नात उरकून जाईल म्हणून घाई घाईने तुमचे लग्न ठरवले का? होय/ नाही फार पूर्वतयारी न करता, अचानक लग्न लावण्यात आले आहे का? होय/ नाही फार गाजावाजा न करता, निर्जन मंदिरात, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावले का? होय/ नाही भाऊ नसल्याने किंवा इतर काही कारणांनी वडिलांची संपत्ती तुम्हाला मिळणार आहे का? होय/ नाही आत्ते-मामे भावंडांमध्ये तुमचे लग्न झाले आहे का? होय/ नाही
एकूण गुण:
वरील प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेल तर माहेरातील लोकांच्या चुकीमुळे स्त्रीला हिंसक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे असे निदर्शनास येते.
(वरील प्रश्नावलीची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा )
सारांश: अर्थातच आपण प्रत्येक स्त्रीकडून या प्रकरणामधील प्रत्येक तक्ता भरून घ्यायचा नाही. गरजेप्रमाणे माहिती गोळा करायची आहे. योग्य प्रश्न विचारल्यास नेमके सुरक्षा नियोजन कसे करायचे, कायदेशीर कारवाई केव्हा करायची, धोक्याची तीव्रता कशी ओळखायची हे जाणून घेण्यास मदत होईल.
(संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन – मनीषा गुप्ते, अर्चना मोरे – मासूम प्रकाशन – वर्ष १० डिसेंबर २०१०)