टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

मीनाची गोष्ट – भाग १

मीनाची गोष्ट – भाग १ – (स्क्रिप्ट)

ही आहे मीना. (एक लहान बाळ दिसतं). हे आहेत मीनाचे आई- वडील. “अभिनंदन. मुलगी झाली”. (नर्स बाहेर येऊन सांगते, मीनाचेचे आईवडील फक्त एकमेकांकडे ब्लँक नजरेने बघतात). हळू हळू मीना मोठी होऊ लागली. तिला खेळायला तिच्या मोठ्या बहिणीची बाहुली मिळाली. बाहुली, भातुकली, फारतर लंगडी आणि लपंडाव. एवढेच तिचे खेळ. एकदा, मीनाला वाटले आपण देखील मुलांसोबत गोटया खेळाव्यात. पण झाले वेगळेच. (मागून आई पाठीत एक धपाटा मारते). “पोरी गोट्या खेळतात व्हाय गं?” मग हळूहळू एकापाठोपाठ एक यादीच मीनाला कळायला लागली. चांगल्या मुली जोरात हसत नाहीत, मोठ्या आवाजात बोलत नाहीत, आईवडिलांचे ऐकतात, संध्याकाळच्या आत घरी येतात.

मीना जशी मोठी होत गेली तशा-तशा तिला अजून काही गोष्टी जाणवू लागल्या. रात्री मीना आणि तिची बहीण झोपली असताना, कधी-कधी तिला तिच्या आईवडिलांच्या भांडणाचे आवाज येत. बाबा कधी कधी आईवर हात देखील उचलत. सुरुवातीला मीनाला भीती वाटायची. पण हळूहळू सवय होत गेली. ‘बाईच्या जातीले थोडे सहन कराच लागते. पावसानं झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर कोनालं सांगाव?’ मीनाची आजी स्वतःशीच पुटपुटायची. आजी आईची बाजू क्वचितच घ्यायची. असं का ते काही मीनाला कळायचे नाही. मीनाला आठवते, आईने एकदा तिच्या आईवडिलांना मारहाणीबद्दल सांगितले. तर ते उलट तिलाच म्हणाले – “घरच्या गोष्टी घरीच रायलेल्या बऱ्या, घरच्या इज्जतीचा प्रश्न हाय.” आईने बाबांना उलटे उत्तर दिलेले मीनाने कधीही पाहिले नाही. जेवताना देखील आई सगळ्यात शेवटी जेवायची. एखाद्या सामाजिक प्रसंगात गेले तरी बाबापुढे आणि आई, मीना मागे हे ठरलेले. घरी कधी नातेवाईक, पाहुणे जमले, तरी बायका आतल्या खोलीत आणि पुरुष बाहेर अशी विभागणी असे. महिन्याच्या महिन्याला, बाबा तिला पगारातून घर खर्चाला पैसे काढून देत. एखादी वस्तू नवीन घ्यायची झाल्यास बाबांची परवानगी लागे. बाबा म्हणतील तेच खरं असा घराचा नियम. तसेच मीनाला, तिच्या बहिणीला एखाद्या लांबच्या ठिकाणी जायचे असले तरी एकटे जाण्याची परवानगी नव्हती. तिचे वडील किंवा लहान भाऊ सोबत येई. मीनाला कित्येकदा मनातून वाटे, “या बारक्याचा मले काय उपयोग? मलेच याले सांभाळाया लागते”

मीना मोठी होऊ लागली, तसा तसा तिला तिच्या शरीरामध्ये होणारा बदल जाणवायला लागला. तिची पाळी सुरु झाली, बाहेर खेळणे बंद झाले आणि घरच्यांनी तिच्यावर अधिकच कडक नजर ठेवायला सुरुवात केली. तिच्या मनात देखील तिला वर्गातील इतर मुलांबद्दल, इतर पुरुषांबद्दल आकर्षण जाणवू लागले. आपल्याला काय होते आहे हे काही तिला नक्की कळेना. कधी-कधी यासगळ्याबद्दल अपराधीपणाची भावना देखील तिच्या मनात येऊन जायची. असे वाटणे बरोबर आहे का? आपण काही पाप तर करत नाही ना, असेही तिला वाटून जाई. पण कोणाला विचारायची चोरी. मग एकदा धीर करून, तिच्या मोठ्या बहिणीलाच गाठून तिने तिच्या मनातले सगळे प्रश्न धडाधड विचारले. मोठ्या बहिणीने तरी का कुणाला विचारले होते? तिला देखील इकडून तिकडून ऐकलेली, वाचलेलीच माहिती होती.

घरातील कामे नसत तेव्हा मीना आरशात बघत बसलेली असायची. आपण कसे दिसतो, कसे कपडे घालतो याबद्दल हल्ली ती खूप काळजी करायची. सहाजिकच होतं. लहानपणापासून तिने गोष्टींच्या पुस्तकात वाचलं होतं – राजकन्या नेहमी गोरीपान, बारीक, दिसायला सुंदर असायची आणि तिच्या रूपावर भाळून राजपुत्र तिच्याशी लग्न करायचा. आणि लग्न होणे तर स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे आजी म्हणायची. लहानपणी आजीचे एखादे काम करून दिले तरी ‘तुले एकदम झ्याक नवरा भेटेन’’ असाच आशीर्वाद आजी द्यायची. इथेच येऊन सगळं घोडं अडायचं. मीनाला वाटे आपण दिसायला सावळे आणि नाकी डोळी पण ठीकठीक. सिरियल्स, सिनेमा, जाहिरातींमधील स्त्रिया पाहून तिला न्यूनगंड येई. मग ती देखील ‘सुंदर’ दिसण्यासाठी विविध खटाटोप करू लागली.

मीना चांगली विद्यार्थिनी होती. पण तिच्या अभ्यासाकडे ना तिचे शिक्षक कधी लक्ष देत, न घरचे. बरेचदा घरची कामं, शेतातली कामं राहिली म्हणून मीनाची शाळेला बुट्टी व्हायची. पण असे सगळे असले तरी मीनाला अभ्यास करायला आवडायचे. मीना आठवीत असेल तेव्हा मीनाच्या वडिलांची नोकरी गेली आणि मीनाचे शिक्षण थांबले. मीनाने रडून रडून डोळे सुजवले. दिवसभर जेवली नाही. पण कोणी तिची बाजू घेईना. आईबाबांनी ठामपणे सांगितले. “शिकून का कुनाचं भलं होते? लग्न कर अन तुयं तू पाय”. संध्याकाळी तिच्या आजीने तिला हळूच जवळ घेत समजावले, “पोरी ज्यादा शिकल्या का त्यानची सोयरीक जमत नाई. पाटी पेन्सिल करून तू का कलेक्टर होते का? पोरीले कामच काय? चूल ने मूल”

काही दिवसांनी मीनाला एक स्थळ सांगून आले. मुलगा तिच्यापेक्षा वयाने, उंचीने, शिक्षणाने, पैशाने मोठा आहे. हे सगळे बघूनच मुलीकडच्यांनी हो म्हटले. पण मीनाला त्या मुलाशी लग्न करायचे होते की नाही ते काही कोणी विचारले नाही. तिला सोडून इतरांनीच लग्न ठरवले. आजीच्या शब्दांत, आता मीनाची “खरी जिंदगी सुरु होनार.” मीनाचे हे पुढचे आयुष्य कसे असेल? तिच्यावर आतापर्यंत झालेल्या संस्कारांचा तिच्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होईल का? पाहुयात पुढील व्हिडिओंमध्ये.


वरील व्हिडीओ वर आधारीत काही प्रश्न खाली दिले आहेत. या व्हिडीओ मधील संदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या. प्रश्नावली साठी खाली क्लिक करा