टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

लैंगिक हिंसा/छेडछाड- हे ओळखण्यासाठीची प्रश्नावली

शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, बस किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी महिलांना अनेकदा लैंगिक छेडछाडीचा सामना करावा लागतो. या दृष्टीने घर आणि आपला परिसरही महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नसतो हा नेहमीचा अनुभव आहे. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं वागलं जाऊ शकतं. तुमच्यासोबत असं होतं का? ही हिंसा आहे हे लक्षात ठेवा.

  1. शाळा, कॉलेजच्या आवारात किंवा घरातून बाहेर पडल्यावर कोठेही जाताना तुमचा पाठलाग केला जातो का?
  2. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे एकटक बघतात का / सतत लक्ष ठेवतात का?
  3. रस्त्यावरून जाताना तुमच्या कपड्यावरून, शरीरावरून ‘कमेन्ट’ किंवा तुम्हाला त्रास होतील अशा शब्दाचा वापर करतात का?
  4. तुम्हाला बघून गाणी म्हणणे, शिट्ट्या वाजणे असं होतं का?
  5. तुमच्या ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला एकटे बघून कोणी नसलेल्या ठिकाणी यायला सांगतात का?
  6. तुम्हाला प्रपोज करून तुमची इच्छा नाही तरीसुद्धा सतत मागे लागतात का?
  7. ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती त्यांचे लैंगिक अवयव तुम्हाला दाखवतात का?
  8. तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावण्याचा प्रयत्न करतात का ?
  9. तुम्हाला अश्लील/वाईट पद्धतीच्या खाणा-खुणा (जसं- डोळा मारणे, चुंबन घेण्याची कृती इ.) करतात का?
  10. तुम्हाला शिव्या (लैंगिक अवयवा वरून) देतात का?
  11. तुम्हाला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात का?
  12. प्रेमाच्या नावाखाली किंवा लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी/जबरदस्ती केली जाते का? किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जातं का?
  13. तुमच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली जाते का?/ जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले आहेत का?
  14. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर बलात्कार केला आहे का किंवा तसा प्रयत्न केला आहे का?

कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा (तुम्ही जिथे कामाला जाता ते कोणतेही ठिकाण)

  1. कामाच्या ठिकाणी तुमच्या कपड्यावरून, दिसण्यावरून बोलले जाते का? सूचक ‘कमेन्ट’ करणे/गाणी म्हणणे असे केले जाते का?(आयटम, चिकणी, लैंगिक अवयवावरून वाक्य उच्चारणं इ.)
  2. तुम्हाला मुद्दाम उशीरापर्यंत कामावर थांबविले जाते का?
  3. तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढ थांबवून त्या बदल्यात काही देण्याचे सुचवले जाते का? किंवा उलट विनाकारण पगारवाढ केली जाते का?
  4. तुम्हाला जबरदस्ती कुठेही (चहा प्यायला, जेवायला, खरेदीला किंवा इतर ठिकाणी) घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो का?
  5. तुमच्या कामात लुडबूड केली जाते का?
  6. तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला मुद्दामहून हात लावण्याचा प्रयत्न/ हात लावला जातो का? (उदा. असुरक्षित स्पर्श, कुरवाळणं, चिमटे घेणं इ.)
  7. तुम्हाला मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ, फोटो, मेसेज पाठविले जातात का? किंवा अशा प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात का? / मागणी केली जाते का?
  8. तुमच्याकडे कशाच्या तरी बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली जाते का/ लैंगिक संबंध ठेवले आहेत?

लेखन – विद्या देशमुख