टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

व्यसनाधीन व्यक्तीपासून घ्यायची काळजी

व्यसनी व्यक्तींमुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून) कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक, आर्थिक, तसेच शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. समाजात अपमानित व्हावे लागते. हिंसक वृत्तीचा नवरा दारू–गांजाच्या व्यसनात अडकलेला असेल, तर त्याच्या बायको व मुलांच्या जिवाला कधीही धोका होऊ शकतो. यांसदर्भात विचार करताना पुढील मुद्दे लक्षात घेऊया.

नवरा, मुलगा, दीर, सासरा, शेजारी, भाऊ, वडील, जावई यांपैकी कोणाच्याही व्यसनापासून स्त्रियांना त्रास होऊ शकतो. अशा वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्याचे व्यसन जर आपल्या जिवावर बेतणार असेल, तर नात्यापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवले पाहिजे.

व्यसनी व्यक्ती त्याच्या व्यसनासाठी दुसऱ्याच कोणाला तरी जबाबदार धरत असते. ‘’बायकोच्या वागण्याला कंटाळून व्यसन करायला लागलो’’. ” किंवा “बायकोमुळे माझे व्यसन वाढले”. असे बहुतेक व्यसनी पुरुषांच्या बायकांना ऐकावे लागते. दुसऱ्याला व्यसन लागायला किंवा ते वाढायला आपण मुळीच जबाबदार नाही. स्वतःच्या मनाला बजावून सांगा. दुसऱ्याच्या व्यसनाबद्दल स्वतःला मुळीच दोष देऊ नका.

व्यसनाधीन व्यक्तीपासून स्वत:ला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेता येईल.
  • तो कोणत्या काळात व्यसन जास्त करतो हे शोधा.
  • त्याच्या व्यसनाच्या काळात महागडे दागिने अंगावर घालणे टाळा.
  • स्वतःजवळ पैसे बाळगणे टाळा. पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • घरामध्ये उघड्यावर किंवा त्याला सहज सापडतील अशा ठिकाणी पैसे व इतर चीजवस्तू (महत्त्वाच्या) ठेवू नका.
  • घरातली हत्यारे, बागकामासाठी/शेतीसाठी वापरण्याची अवजारे, हत्यार म्हणून मारण्यासाठी वापरता येतील अशा धारदार वस्तू शक्यतो नजरेआड ठेवा. खाटेखाली, बंद
  • खोलीमध्ये वस्तू ठेवा. न जमल्यास कमीत कमी पडद्याचे किंवा जुन्या कपड्याचे झाकण अशा वस्तूंवर घाला.
  • दारूच्या नशेत सर्व पैसे खर्च होतात, हरवतात किंवा चोरीसही जातात. म्हणून त्याच्या व्यसनाच्या दिवसांमध्ये त्याच्याकडील पैसे गोडीने बोलून काढून घेण्याचा प्रयत्न करा. गुत्त्यावर जाताना त्याच्याकडे फार पैसे नसतील, याची काळजी घ्या.
  • तुमच्यावर त्याचा विश्वास नसेल, तर त्याने ते पैसे स्वतःच्या हाताने कपाट, पेटी सारख्या बंद ठिकाणी ठेवावे, असे त्याला सुचवा.
  • त्याला व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यास प्रोत्साहन द्या. तो व्यसन सोडत असेल तर त्याला सहकार्य करा.
  • नेहमीच व्यसन करीत असेल आणि मारहाण होत असेल, तर स्वतःसाठी आणि मुलांसाठीचे सुरक्षा नियोजन बारकाईन करा.
कुटुंबातील व्यसनी व्यक्तींपासून मुलांची घ्यायची काळजी.

मुलांसाठी यापूर्वी सांगितलेले सुरक्षा नियोजन इथेही लागू आहे. पण त्याशिवाय घरात व्यसनी व्यक्ती आहे. त्यामुळे आईने मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
दारू, गांजा यांसारख्या व्यसनाच्या वस्तू मुलांना आणायला सांगितल्यास त्या मुलांनी आणू नयेत, असे त्यांना बजावून सांगा. या वस्तू आणणे टाळण्यासाठी मुलांनी काय करावे, काय कारणे सांगावीत, ते काम शांतपणे आणि कौशल्याने कसे टाळावे याचे मार्ग मुलांना शिकवा.

मुले भीतीमुळे किंवा खाऊची लालूच दाखवल्यामुळे अशी कामे करण्यास तयार होतात. म्हणून शरीर व मन यावर व्यसनाचे होणारे वाईट परिणाम मुलांना समजावून सांगा. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांशी या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधावा लागणार आहे. तुम्हाला हे काही कारणांनी जमणार नाही, असे वाटत असल्यास महिला मंडळाच्या ताईना, शाळेतल्या बाईना सांगा. त्या मुलांना समजावून सांगू शकतील.

मुलांना घरातल्यांच्या व्यसनामुळे कोणी चिडवत असेल, तर त्याला शांतपणे उत्तरे द्यायला मुलांना शिकवा. मुलांना शाळेत किंवा मित्रमैत्रिणींमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत आहे का, त्याचा मुलांवर काही विपरीत परिणाम होतोय का, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.

मुलांशी त्यांचे शिक्षण, खेळ, छंद, आवडी-निवडी याबद्दल सतत चर्चा करा. मुलांशी त्यांच्या आयुष्याबद्दल संवाद साधण्यासाठी आई शाळा शिकलेलीच असली पाहिजे, असे नाही.

आपले कोणी ऐकून घेत नाही, किंवा आपल्याला कोणाचाच आधार नाही, अशी पोरकेपणाची भावना मुलांच्या मनात येऊ शकते. मुलांना तसे वाटते आहे का हे समजून घ्या. तशी भावना मुलांच्या मनात असल्यास ती प्रेमपूर्वक संवादाच्या माध्यमातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

कुटुंबातील व्यसनी व्यक्तींपासून मुलींची घ्यायची काळजी

घरातल्यांच्या व्यसनामुळे होणाऱ्या भांडण-कटकटींचा परिणाम मुलींच्या मनावर होतो. त्यामुळे मुलींच्या मनात घराबद्दल नावड, नाराजी, संकोच असू शकतो. त्यातून गप्प गप्प राहाण्याची वृत्ती मुलींमध्ये निर्माण होऊ शकते. अशा मुलींना मोठी बहीण, आई, काकू, मावशी, आजी किंवा तिला जवळची विश्वासाची वाटेल अशी कोणतीही व्यक्ती मदत करू शकते.

आपली मुलगी ज्यांच्याशी मनमोकळेपणे बोलते, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. मुलींशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
घरातील वातावरणाचा मुलीला काही त्रास होत असेल, तिच्या मनावर काही विपरीत परिणाम होत असेल तर तिच्याशी बोलून, तिला जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तीकडून समजावून घ्या.

मुलीच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचे असेल, तर व्यसनी व्यक्ती घरी नसेल अशा खात्रीच्या वेळीच बोलवा. मुलीच्या विश्वासातील मैत्रिणींना, मुलीच्या परवानगीने घरातल्या परिस्थितीची कल्पना द्या. मुलीला सोबत करण्याबद्दल, तिला आधार देण्याबाबत मैत्रिणींना सुचवा.

दारू गुत्त्यावरचे लोक किंवा व्यसनासाठी घरातल्या माणसांच्या संपर्कात येणारे लोक मुलींना त्रास देत असतील, काहीतरी आमिष दाखवून मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. काही कारणांनी मुलगी स्वतः व्यसनी व्यक्तीच्या अवती-भोवती घुटमळत असेल, तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. तसे होत असल्यास त्या माणसांपासून सावध राहण्यास मुलींना सांगा.

घरात आनंदी, समाधानी वातावरण नसेल तर वाढत्या वयातील मुले मित्र-मैत्रिणींकडून सुरक्षितता आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. यातून मुले-मुली घरापासून तुटतील अशी अकारण भीती बाळगण्याची गरज नाही. समवयस्कांकडून मुली-मुले व्यावहारिक जगणे शिकत असतात. मात्र सुरक्षितता मिळवण्याच्या प्रयत्नात अजून काही असुरक्षित आणि धोकादायक प्रसंगात मुलगी सापडू शकते. याबाबत तिला सावध करणे आवश्यक असते. मुलींशी त्यांच्या मित्र-मैत्रिणींबद्द्ल संवाद साधा.

 (संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखन मनीषा गुप्ते, अर्चना मोरे मासूम प्रकाशन वर्ष १० डिसेंबर २०१०)