टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

स्त्रियांवर हिंसा का होते?

आपल्या समाजाची रचनाच पुरुषप्रधान, पुरुषाला महत्त्व देणारी, पुरुषाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली आहे. त्यामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यमच मानण्यात आला आहे.

मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्याबरोबर भेदभावाला सुरुवात होते हिंसेची सुरुवातच मुलीचा गर्भ आहे हे समजल्यापासूनच होते. मुलीकडे अजूनही ‘ओझ’ म्हणूनच पाहण्यात येतं. तिच्या लग्नात होणारा खर्च, हुंडा हा मोठा बोजा असतो. मुलगा हाच वंशाचा दिवा या समजुतीमुळे मुलीकडे आधार म्हणून कधी पाहिलं जात नाही. स्त्रियांना ओझं, नकोशा आणि निरुपयोगी मानणाऱ्या समाजव्यवस्थेमुळे हिंसा होते.

मुली/स्त्रिया यांच्या वागण्या-बोलण्यावरही बंधनं आहेत. मुलं-पुरुष याच्या वागण्या-बोलण्यावर कोणतीच बंधनं नसतात. या पुरुषप्रधान रचनेमुळेच स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन ती एक ‘उपभोगाची वस्तू’ असा आहे. त्यामुळे लहान मुलीपासून ते वयस्कर स्त्रियांवर बलात्कार केले जात आहेत. आपल्या समाजातील स्त्री ही पुरुषांवर अवलंबून राहावी यासाठी तिला शिकण्याची, नोकरी-कामधंदा करण्याची मुभा फारच कमी असल्यामुळे तिला बऱ्याच हिंसेला सामोरे जावे लागते. पितृसत्ताक पद्धतीने स्त्रियांच्या श्रम, प्रजनन, आणि लैंगिकतेचा वापर व त्यावर नियंत्रण करण्यासाठी हिंसेचा उपयोग केला आहे. ही एकांगी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हिंसेचा, दडपशाहीचा वापर केला जातो.