टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१

गर्भपात म्हणजे काय?

गर्भधारणेपासून २० आठवड्यांच्या काळातील गर्भ कोणत्याही पद्धतीने काढून टाकणे किंवा पडून जाणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यांच्या आतील गर्भ हा स्वतंत्रपणे जगण्यासाठी समर्थ नाही असे मानले जाते. काही कारणांनी गर्भ आपोआप गळून पडू शकतो किंवा मुद्दाम प्रयत्नपूर्वक तो काढून टाकावा लागतो. दोन्ही प्रकारांना गर्भपात असेच म्हटले जाते. वैद्यकीय गर्भपाताच्या १९७१ च्या कायद्यानुसार शासनाने ठराविक परिस्थितींमध्ये गर्भपातकरून घेण्याचा अधिकार महिलेला कायदेशीरपणे दिला आहे. गरोदर राहिल्यापासून २० आठवड्यांच्या व विशेष परिस्थितीत (जसे की बलात्कारपीडित स्त्री- बलात्कारामुळे गर्भ राहिल्यास अथवा दिव्यांगस्त्री किंवा नाबालिक मुलगी )२४ आठवड्यांच्या आत मान्यताप्राप्त गर्भपातकेंद्रात प्रशिक्षित डॉक्टरांकडून गर्भपात करता येतो.

गर्भपात कशापद्धतीने करतात.

गोळ्यांच्या मदतीने – गर्भधारणेपासून १४ आठवड्यांपर्यंत वैद्यकीय देखरेखीखाली गर्भपाताच्या दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात. या प्रकारच्या गर्भपातासाठी रूग्णालयात दाखल होण्याची गरज नसते. गोळ्या घेतल्यानंतर चार तासांनी काही काळ रक्तस्राव होतो.  नेहेमीपेक्षा हा रक्तस्राव तीव्र असल्याने जास्त धावपळ न करणे फायद्याचे ठरते.

वैद्यकीय गर्भपात – सर्जीकल अॅबोर्शन – हे दोन प्रकारे करतात.

एका लांब निर्जंतुक काडीच्या मदतीने गर्भाशय आतून खरवडून काढला जातो. यासाठी गर्भाशयाचे तोंड उघडावे लागते.  गर्भाशयाच्या आतील भागांना इजा होऊ नये म्हणून गर्भ खरवडणे हे अत्यंत सावधगिरीने व काळजीपूर्वक करावे लागते.

दुसऱ्या प्रकारे गर्भपात करताना, गर्भाशयामध्ये एक नळी घातली जाते. या नळीचे दुसरे टोक एका बंद भांड्यामध्ये सोडलेले असते. ही नळी गर्भ व गर्भाशयातील आवरण शोषून घेते व दुस-या टोकाला असलेल्या भांड्यामधे फेकून देते.

गर्भपात कोणत्या परिस्थितीत करता येतो –
  • गरोदरपणामुळे स्त्रीच्या आरोग्यावर गंभीर दुष्परीणाम होण्याची शक्यता असेल
  • गरोदर स्त्रीला जर बलात्कारामुळे गर्भधारणा झाली असेल,
  • कुटुंब नियोजनाचे साधन वापरून ही स्त्री गरोदर राहिली असेल,
  • गंभीर व्यंग असलेले किंवा अपंग बाळजन्माला येण्याची शक्यता असेल तर

गर्भपात करून घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

गर्भपात कुठे करता येतो –
घरच्या घरी गर्भपात करून घेणे गुन्हा आहे.
  • शासकीय रूग्णालयात,
  • शासनाच्या नियंत्रणाखाली चालणा-या रूग्णालयात किंवा
  • शासनाने मान्यता दिलेल्या नोंदणीकृत गर्भपात केंद्रातच

गर्भपात करून घेता येऊ शकतो.

गर्भपात कोण करू शकते –
  • गरोदर स्त्रीचा गर्भ हा १२ आठवड्या पर्यंतचा असेल तर कमीत कमी एक नोंदणीकृत, प्रशिक्षीत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार, देखरेखीखाली,
  • गरोदर स्त्रीचा गर्भ १२ व्या आठवड्यापासून २० व्या आठवड्यापर्यंतचा असेल तर कमीत कमी दोन नोंदणीकृत, प्रशिक्षीत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार, देखरेखीखाली गर्भपात केला जाऊ शकतो.
  • गरोदरपणाच्या २०व्या आठवडयापासून २४व्या आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी किमान २ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आवश्यक असते.
  • केवळ गर्भात लक्षणीय विकृती आढळल्यास २४ आठवड्यांच्या वर गर्भपात करता येऊ शकतो. परंतु अश्या गर्भपातासाठी वैद्यकीय बोर्डाकडून मान्यता मिळवणं आवश्यक असेल.
  • डॉक्टरांची/वैद्यकीय व्यावसायिकांची पात्रता– गर्भपात करणारे वैद्यकीय व्यावसायिक हे स्त्रीरोग शास्त्र आणि प्रसूतिशास्त्रात पदव्युत्तर किंवा डिप्लोमा वगैरे योग्य प्रशिक्षण घेतलेले असावेत तसेच अनुभवी असावेत.

शासनमान्यता प्राप्त, नोंदणीकृत केंद्रामधे गर्भपात करून घेणे हे कायदेशीर आहे.  गर्भपात करीत असताना काही गुंतागुंत निर्माण झाल्यास ईमर्जन्सी सेवा देण्यासाठी इतर तज्ज्ञ डॉक्टर, ब्लडबॅंक, मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरोदर स्त्रीला तातडीने नेण्याची गरज पडल्यास अँब्युलन्स वगैरे सोयी-सुविधा उपलब्ध असल्यास गरोदर स्त्रीच्या जीवाला उत्पन्न झालेला धोका तातडीने टाळता येतो.

म्हणून गर्भपात हा शासनमान्य नोंदणीकृत गर्भपात केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करून घ्यावा.

गर्भपाताबाबत गरोदर स्त्री चे नाव, पत्ता, गर्भपात करून घेण्याचे कारण वगैरे माहितीसंदर्भात गुप्तता पाळणे हे गर्भपात करणा-या वैद्यकीय व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. तशी गुप्तता न पाळल्यास त्यांना एक वर्षापर्यंत कारावास आणि/अथवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.

कायदेबाह्य वर्तनास शिक्षा
  • नोंदणीकृत नसलेल्या, अप्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे गर्भपात केल्यास
    • कमीत कमी दोन वर्षे ते सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा
  • नोंदणी नसलेल्या, शासनमान्यता नसलेल्या ठिकाणी गर्भपात केल्यास
    • कमीत कमी दोन वर्षे ते सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा
  • गर्भपातासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या जागामालकाला
    • कमीत कमी दोन वर्षे ते सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा
  • गरोदर स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात करणे
    • दहा वर्षांपर्यंत कैद व दंड
  • गर्भपातादरम्यान गरोदर स्त्री मृत्यू पावल्यास गर्भपात करणा-यास
    • दहा वर्षांपर्यंत कैद व दंड, तसेच स्त्रीच्या संमतीशिवाय हा गर्भपात होत असेल तर त्यास आजीवन कारावास होऊ शकतो.
  • वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या केंद्रात केलेल्या गर्भपातांची माहिती विहित तक्त्यांमध्ये भरून शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांनी गर्भपात करून घेतलेल्या स्त्रियांबद्दलची माहिती गोपनीय ठेवायची आहे. यासंदर्भात व्यावसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
गर्भपात अंतिम निर्णय कोणाचा
  • गरोदर स्त्रीने स्वतःच गर्भपातासाठी संमती दिली पाहीजे. इतर कोणाच्या ही परवानगीची आवश्यकता नसते.
  • १८ वर्षांखालील आणि मानसिक आजारी असलेल्या गरोदर मुलींच्या गर्भपातासाठी त्यांच्या पालकांची संमती घेणे बंधनकारक आहे.
  • गर्भपात करण्यासाठी जोडीदाराची सही आवश्यक नाही.