टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःचे संरक्षण

स्त्रीच्या मनातील आत्महत्येचा विचार

धोकादायक परिस्थितीत स्त्रीची इच्छाशक्ती शाबूत असते तोवर ती विरोध करते, परंतु सतत होणाऱ्या मारहाणीनंतर तिच्यामध्ये परिस्थितीशी झगडण्याची ताकद कमी व्हायला लागते. ‘आपले भोग संपत नाहीत तर आपला जीवच संपवू.’ अशा विचारांची गर्दी होऊ लागते. अशा वेळी तिला स्वतःकडून असलेला धोका समजून घेण्यासाठी हा आलेखस्तंभ :

1.स्वतःचे आयुष्य संपवून टाकावे" असा विचार तुमच्या मनात येतो का? होय/नाही

2.आत्महत्येचा विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतरही परत परत डोकावतात का? होय/नाही

3.तुम्हाला मारहाण करणाऱ्यांना तुम्ही आत्महत्येचा विचार बोलून दाखवले आहेत का? होय/नाही

4.घरातल्यांना आत्महत्येची धमकी दिली की त्यांच्याकडून होणारा त्रास तात्पुरता थांबतो असे तुम्हाला वाटते का? होय/नाही

5.तुम्ही कधी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का? होय/नाही
जिवाचे काही बरेवाईट करून घेण्याचे विचार मनात सतत येत असतील अशा वेळी सांगून टाका.
  • पटकन विश्वसातल्या माणसाला ते विचार सांगून टाका. (अंगणवाडी ताई, शाळेतल्या शिक्षिका, संस्थेची कार्यकर्ता, जवळपास राहाणारे नातेवाईक, शेजारी, नेहमी मदत करणारी व्यक्ती, कामावरची, ऑफिसमधील मैत्रीण इत्यादी)
  • आपल्या मनात असा विचार आला म्हणून स्वतःला कमी लेखू नका. अनेक लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असतो. विचार येऊनसुद्धा आत्महत्या न करणे हे सर्वात मोलाचे.
  • तुमच्या मनात येणारा आत्महत्येचा विचार तपासून पाहा. नक्की कोणामुळे किंवा कोणत्या कारणामुळे आत्महत्या करावीशी वाटते हे शोधा, त्याबद्दल विचार करा.
  • आपले आयुष्य मौल्यवान आहे याचा कधीही विसर पडू देऊ नका. इतर कोणाच्या वागण्या-बोलण्यामुळे ते फुकट घालवायची मुळीच गरज नाही, हे स्वतःला समजवा.
  • तुम्ही आत्महत्या केल्यामुळे तुम्हाला त्रास देणाऱ्याच्या वागणुकीत काहीही फरक पडणार नाही, याचा विसर पडू देऊ नका.
  • तुमच्या एखाद्या मैत्रिणीने आत्महत्या केलेली असेल, तर तिच्यामागे तिचे नातेवाईक – मुले यांची किती वाईट अवस्था झालेली असेल याचा विचार करा.
  • आत्महत्येचा केलेला प्रयत्न फसलेला असेल, तर त्यानंतर स्वतःला सावरायला तिला किती त्रास झाला असणार हे आठवा.
  • तुमच्या ज्या मैत्रिणी त्यांच्या पडत्या काळात परिस्थितीशी झगडून उभ्या राहिल्या, त्यांचे प्रयत्न आठवा.
  • तुमच्या मनात जिवाचे बरे-वाईट करून घेण्याचे विचार केव्हा केव्हा येतात याची उजळणी करा.
  • जेव्हा जेव्हा ते विचार तुमच्या मनात येतात, तेव्हा तेव्हा ते दूर करण्याचे काही मार्गही तुमच्या समोर असतात. त्यांची उजळणी करा.
  • तुम्ही कोणत्या प्रकारे आत्महत्या करू शकता याची यादी करा व त्या गोष्टींपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करा.
  • खूप संताप आल्यावर तुमच्या मनात जर असे विचार येत असतील तर संताप आवरण्याचा मनापासून प्रयत्न करा.
  • शेजारच्यांशी, घरातील इतरांशी वेगळ्या विषयांवर गप्पा मारा.
  • रोजच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे काम हातात घ्या.
  • संतापामुळे अंग थरथरायला लागते, हात शिवशिवायला लागतात, कोणाला तरी बडवावे, किंवा आपलेच डोके भिंतीवर आपटावे असे वाटते. अशा वेळी आपटता, बडवता येईल अशी एखादी वस्तू हातात घ्या. तुमचा संताप स्वतःला काहीही इजा न करून घेता बाहेर पडेल यासाठी प्रयत्न करा.
  • गर्दीच्या ठिकाणी खूप वेळ चालत राहा. आपल्या शरीरात काय चालले आहे याचे बारकाईने निरीक्षण करा. अंगाची थरथर हळूहळू कमी होत आहे, असे तुम्हाला जाणवेल.
  • थोडेसे शांत वाटल्यावर लगेचच पोटभर जेवण घ्या. मनात येणाऱ्या विचारांमुळे जेवण्याची इच्छा होत नसेल, तर उरलेले विचार जेवण झाल्यावर करायचे आहेत असे तात्पुरते मनाला बजावा. जेवण झाल्यावर डोकेदुखी थांबण्याची पॅरासिटीमॉलची एखादी गोळी घेऊन झोपायचा प्रयत्न करा.
  • दु:ख झाल्यावर रडू येणे हा मानवी स्वभाव आहे. त्यात कमीपणा वाटून घेण्याचे कारण नाही. मनामध्ये दुःख साठून राहिले तर जीव कोंडल्यासारखा वाटतो, जिवाचा कंटाळा आलाय असे वाटते आणि आत्महत्येची इच्छा प्रबळ होते. तेव्हा पहिल्यांदा दुःखाला वाट मोकळी करून द्या. दु:ख, अपमान मनात साठवून ठेवू नका.
  • अश्रू मनामध्ये साचलेली निराशेची जाळी-जळमटे धुऊन टाकायला मदत करतात. नंतर काही तरी वेगळा विचार सुचायला मदत होते.
  • नव्याने विचार सुचायला लागल्यावर मग आपल्या प्रश्नावर काय उपाय असू शकतील त्याचे पर्याय मनात आणायचा प्रयत्न करा.
  • तुमच्या अडचणींबद्दल कोणाशी तरी बोलून आत्तापर्यंत शोधलेल्या उपायांपेक्षा वेगळा उपाय शोधायचा प्रयत्न करा.
  • जुनेच उपाय नव्या पद्धतीने केले तरी, वेगळ्या परिस्थितीत ते प्रभावी ठरू शकतात.
  • तुमचा प्रश्न, तुमचे आयुष्य आणि तुम्हाला जवळची वाटतात ती माणसे एवढ्याच गोष्टी समोर ठेवून विचार करा. आपण घर सोडले, किंवा इतरांना न पटणारा निर्णय घेतला तर समाज काय म्हणेल, आई-वडिलांना आवडेल का, सासू-सासऱ्यांना पटेल का, घराण्याच्या प्रतिष्ठेला बाधा येईल का, हे कोणतेही मुद्दे आपला जीव वाचवायला येत नाहीत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांना बगल देऊन प्रथम स्वतःचे आयुष्य आणि स्वतःच्या गरजा यांचा विचार करा.
  • आत्महत्येच्या विचारापासून आपण स्वतःला किती वेळा दूर ठेवू शकतो हे आठवायचा प्रयत्न करा. नको असलेले विचार हटत नसतात, तेव्हा लक्ष दुसरीकडे वळवले, तर विचार विसरायला मदत होते. मनात आत्महत्येचे विचार आल्यावर स्वतःला कशात तरी गुंतवा आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा.
  • आत्महत्येला कारणीभूत घटना किंवा व्यक्ती आपल्यासमोर येत नाहीत किंवा आठवत नाहीत, तोपर्यंत पुन्हा आपल्या मनात सहसा असे विचार येणार नाहीत. डोक्यात असे विचार आल्यानंतर ते झटकून टाकायला लागणारा वेळ खूप महत्त्वाचा आहे. एकदा का त्या वेळेत आपण स्वतःला सावरले, की जिंकलो.
  • सुरुवातीला डोक्यातून असे विचार काढून टाकायला थोडा जास्त वेळ लागेल. हळूहळू आपल्याला हे विचार झटकण्याच्या नवीन कल्पनाही सुचायला लागतील. डोक्यात विचार आल्यापासून, ते डोक्यातून घालवून टाकेपर्यंतचा वेळ हळूहळू कमी होत गेल्याचे आपल्या लक्षात येईल.
  • प्रयत्न करूनही असे विचार मनातून जात नसल्यास मानसोपचारतज्ज्ञ अथवा समुपदेशकाला भेटून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधा.
    पूर्वी कधी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल, तर अशी मदत घेणे जास्त गरजेचे असते.
  • समुपदेशकाला भेटून आपल्यासारख्या विचार करणाऱ्या स्त्रियांचा स्वसाहाय्य गट (self help group) आहे का? विचारावे. आपल्या सारख्याच परिस्थितीमधून जात असलेल्या स्त्रियांना भेटून दिलासा मिळतो, आत्मविश्वास वाढतो.

(संदर्भ – ‘चक्रभेद’ – लेखक – मनीषा गुप्ते, अर्चना मोरे – मासूम प्रकाशन – वर्ष १० डिसेंबर २०१०)