कौटुंबिक हिंसेचे दुष्टचक्र
स्त्रीवर होणारी हिंसा ही एखाद दुसरी घटना आहे असे म्हणून ती कमी लेखणे चुकीचे ठरेल. कुटुंबातील हिंसेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी हिंसेचे चक्र समजणे आवश्यक आहे.
सासरी होण-या हिंसेचे दुष्टचक्र
वर दाखविल्याप्रमाणे स्त्रीवर हिंसा होते. त्यानंतर नवरा तिची माफी मागतो. तडजोडीचा प्रयत्न करतो. माघार घेण्याची तयारी दाखवतो. तीही संसार तुटू नये आणि नवरा सुधारला या आशेने माफ करते. परिस्तिथी आटोक्यात आली, आता काही त्रास नाही या भावनेने ती हुरळून जाते. अनेकदा लैंगिक संबंधांपुरते दोघेही एकमेकांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. या काळात बायकोने माहेरी जाऊ नये असं नवरा तिला बजावतो तर इतरांच्या सांगण्यावरून मी तुमच्याशी वाईट वागले, मला आता काही तक्रार नाही अस स्त्री म्हणते. पण परिस्थिती जुळवून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न वरवरचा ठरतो. मूळ वादाच्या मुद्द्याचे निरसन केलेले नसते. त्यामुळे मनामध्ये असेलेले/राहिलेले पुन्हा उफाळून येते आणि त्यातून हिंसेला पुन्हा सुरुवात होते.
माहेरी होणा-या हिंसेचे दुष्टचक्र
आपल्या समाजात मुलीने सासर किंवा माहेर सोडून तिस-या ठिकाणी जाणे मान्य नसते. त्यामुळे सासरच्या हिंसाचक्रातून बाहेर पडून मुलगी माहेरी येते. तेव्हा तिचे आपुलकीने स्वागत होते. काही पालक सासरच्या मंडळींना धडा शिकविण्याची भाषा बोलतात. तिला प्रेमाने जेवू-खाऊ घालतात. पण पुन्हा तिला सासरी नेऊन सोडतात. नातं टिकवायला बाईनेच नमतं घ्यावं अशी भूमिका असते.
मुलीला सासरी नाही सोडलं तर घरात, शेजारी कुजबूज चालू होते. लोकही नंतर मुलगी माहेरी एवढे दिवस कशी काय असं सतत विचारू लागतात. तेव्हा मुलीलाच दोषी ठरवून तिचा तिरस्कार करतात. तिला, तिच्या मुलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. आई-बापाच्या उरावरचा धोंड अशी वागणूक दिली जाते.
वरील दोन्ही चक्रातून मुलीची किमत कमी होते. हिंसेच्या भोवऱ्यात ती अडकत जाते. यामध्ये योग्य हस्तक्षेप न झाल्यास तिच्यासमोर ‘मृत्यू’ हा एकच पर्याय आहे असे तिला वाटू शकते. अनेकदा असे होऊ शकते की तिला जीवे मारले जात असताना तिच्यात प्रतिकार करण्याची ताकद शिल्लक राहत नाही. किंवा कधी कधी ती सततच्या हिंसा व अपमानामुळे स्वतःच मरण जवळ करते.
या चक्रातून कसे बाहेर पडाल?
या चक्रातून त्या मुलीला/स्त्रीला बाहेर पडण्यासाठी सामाजिक संस्था-संघटना, समुपदेशक, महिला मंडळे, पोलीस, नातेवाईक यांनी मदत केल्यास हिंसेचे चक्र थांबू शकते. स्त्रीला तिचा सन्मान आणि सुरक्षितता परत मिळू शकते.
यासाठी हिंसापीडित स्त्रीने किंवा तिला मदत करू पाहणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक टप्प्यावर असलेले धोके समजून घेऊन सुरक्षा नियोजन करायला पाहिजे. समुपदेशन किंवा तटस्थ हस्तक्षेपाचा हेतू फक्त कुटुंब केंद्रित नसावा, तर स्त्रीची सुरक्षितता आणि तिचे सबलीकरण महत्वाचे मानणारा असावा. ‘’हिंसा कधीच समर्थनीय असू शकत नाही, हिंसा कधीच सहन केली जाऊ नये.’’ अशी भूमिका घेतली पाहिजे.
स्त्रियांवरील हिंसा एकदा थांबवून थांबणारी नाही. त्याची मुळे सामाजिक परीस्थीतीमध्ये आहेत. पुरुषप्रधान समाजव्यवस्था बदलली पाहिजे तसेच स्त्री-पुरुषांच्या लिंगाधारित भूमिका आणि जोडीने येणारे राजकारण बदलले पाहिजे.
संदर्भ – मासूम संस्था, पुणे, चक्रभेद पुस्तक, लेखन – मनिषा गुप्ते, अर्चना मोरे व मानवी हक्क व हक्काधारित दृष्टिकोन प्रशिक्षण मार्गदर्शिका लेखन – लता भिसे -सोनावणे , मिलिंद चव्हाण