अरुणाची गोष्ट (भाग 1)
एकविसावं शतक चालू आहे. आपण रोज बघतोय की जग खूप वेगाने बदलत आहे. आजूबाजूचं जग एवढं बदलत असताना मात्र, काही गोष्टी आजही पुरातन काळातल्या असल्याचं जाणवतं. चालत फिरणारा माणूस आज कुठेही गाडीने जाणे पसंत करतो. प्रत्येक घरात फोन त्यातही स्मार्ट फोन आलेले आहेत. पण स्त्री – पुरुष यांच्या मधील भेदभाव कमी झाला का? आजची स्त्री पुरुषा इतकी स्वतंत्र आहे का? आजच्या मुलं खूप सजग आहेत. ते कोणतीही गोष्ट फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून मान्य करत नाहीत. ते प्रश्न विचारतात. त्याची योग्य उत्तरं नाही मिळाली तर ते विरोध करतात, आपला आक्षेप दर्शवतात. अनेकदा, वडीलधारी मंडळींना त्यांचे हे वागणे, प्रश्न विचारणे आवडत नाही. अनेकदा त्यांच्या अशा वागण्याला “जनरेशन ग्याप” असे गोंडस नाव दिऊन, दुर्लक्ष केले जातं. पण नेहमीच काय त्यांचे प्रश्न आणि विचार धुडकावून लावण्यासारखे नसतात. त्यांच्या शंका रास्त असू शकतात. आता आपली अरुणा कडेच बघा ना. सारखी तिच्या आईला, भावाला आणि वडिलांना प्रश्न विचारून, वेळ पडलीस तर भांडून देखील भंडावून सोडत असते.
आज अरुणाच्या वडिलांनी तिच्या आई साठी एक नवीन स्मार्ट फोन आणला आहे. आणल्या आणल्या, अरुणाने त्या फोनच्या खोक्यावर झडप मारली आणि उघडला. लगेच तो चालू करून, सर्वात पहिला तिने आपला व्हिडीओ काढला —–
“मी अरुणा …. बीड मधल्या एका छोट्याशा आनदंवाडी नावाच्या गावात राहणारी एक १५ वर्षांची अगदी तरुण, चुणचुणीत मुलगी. मी इयत्ता १० शिकत आहे आणि मला अभ्यास करायला खूप आवडतो. त्याच बरोबर, माझ्या धाकट्या भावाबरोबर भांडणे आणि आईने सांगितलेले काम शक्यतो कसे टाळता येईल हे बघणे, हे देखील माझे आवडते छंद आहेत.”
आता अरुणा तिचा कॅमेरा आई कडे फिरवते आणि म्हणते, “ही माझी आई – सौ. सीमा किशोर बोडके. हिला खूप छान स्वयंपाक करता येतो. पण त्याच बरोबर, ही अतिशय सुंदर नाचू शकते.” आई फोन कडे बघून हॅलो करते.
अरुणा फोनचा कॅमेरा तिच्या धाकट्या भावाकडे करते “आणि हा माझा करामती भाऊ – सोहम. आहे तर एवढासा – तीन फुटी पण नुसता नाकात दम आणलाय. अभ्यासाच्या नावाने देखील कंटाळा येतो याला. साधा पाचवीतला अभ्यास देखील जमत नाही याला. पण चित्र मात्र खूप सुरेख काढतो”.
“मला फोन दे… मला पण बघायचं आहे!” मागून सोहम ओरडत असतो, पण सोहमने फोन घ्यायच्या आत ती फोन बाबांकडे फिरवते, “आणि हे माझे बेस्ट बाबा – मिस्टर किशोर बोडके, मराठी विषयात अतिशय पारंगत असणारे आणि आमच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे मराठीचे शिक्षक. भजने गाणे हा त्यांचा आवडता छंद.” बाबा देखील कॅमेरा कडे बघून हसतात आणि म्हणतात, “मुलांनो जिच्या साठी फोन आणलाय तिला तरी फोन बघायची संधी द्या..
तेवढ्यात दार वाजते. दार उघडताच सोहम चकित होऊन म्हणतो “मिनू दीदी तू इकडे??” अरुणा लगेचच फोन तिच्याकडे फिरवून म्हणते, “आणि ही आमची आवडती मिनू दीदी. माझ्या काकांची मुलगी. ही जवळच्या गावात राहते. पण आत्ता तिच्या कडे एक गंमत आहे – तिच्या पोटात एक गोंडस बाळ आहे! काय माहित – मुलगा असेल की माझ्यासारखी हुशार मुलगी असेल?” मिनू मात्र हळूच स्वतःला म्हणते “मुलगा असावा म्हणजे बरं पडेल.”
अरुणा कॅमेरा बंद करते.