38 कागदपत्रांची जुळवणी
कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आधीच्या काही लेखांमध्ये दिलेली आहे. अशा हिंसाचाराला बळी पडल्यानंतर किंवा अशी घटना आपल्या बाबतील घडेल अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या बाजूने काही तयारी केल्यास त्याचा उपयोग पुढे पोलिसात तक्रार केल्यानंतर होऊ शकतो. कौटुंबिक हिंसाचाराविरोधात उभं राहताना व्यक्तीसमोर अनेक अडचणी उभ्या राहू शकतात.
हिंसाचाराबद्दल तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील पुरावे उभे करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. अशा परिस्थिती काय तयारी करावी याचा ऊहापोह या लेखात केला आहे.
पुराव्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज लागेल
- लग्नपत्रिका
- लग्नातील महत्त्वाच्या विधींचे फोटो (लाजाहोम, सप्तपदी निकाह, परिणय इत्यादी)
- लग्नाची नोंद ग्रामपंचायत अथवा संबंधित कार्यालयामध्ये झाली असल्याचा पुरावा.
- लग्नामध्ये, लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर पण लग्नासंदर्भात मिळालेल्या भेटवस्तू, आहेर, रुखवत इत्यादींची यादी.
- लग्नाच्या निमित्ताने किंवा लग्नापूर्वी घेतलेल्या आणि तुमच्या अंगावर असलेल्या दागिन्यांची यादी, दागिने खरेदी केल्याच्या पावत्या.
- सासरच्या घराचे कागदपत्र, शेतजमिनीचे उतारे, इतर स्थावर व जंगम मालमत्तेची कागदपत्रे.
- घरातील भांडणामध्ये तुमच्याकडे पैशाची मागणी केली असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारे धमकी दिली असेल किंवा या संदर्भात एखादे पत्र, चिठ्ठी, इलेक्ट्रॉनिक संदेश लिहिला असेल किंवा तुम्ही त्याबद्दल कोणाला लिहून कळवले असेल तर तो लेखी पुरावा.
- घरातील माणसांबद्दल, भांडणाबद्दल, तुम्ही कोणाला पत्राने, चिठ्ठीतून, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून (SMS, ईमेल, व्हॉटस अॅप) लिहून कळवले असल्यास ते पत्र किंवा चिठ्ठी.
- तुमच्या जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा पुरावा.
- मुलांचा जन्मतारखेचा दाखला किंवा वयाचा दुसरा कोणताही पुरावा.
- जिथे तुमच्या नवऱ्याबरोबर तुमचे नाव नोंदवले गेले आहे अशी शासकिय कागदपत्रे जसे रेशनकार्ड, मतदारयादी
- घरातील कोणाच्या लग्नपत्रिकेमध्ये तुमचे नवऱ्याबरोबर नाव असेल अशी लग्नपत्रिका
- तुमच्या शिक्षणाची प्रमाणपत्रे, नोकरीचा पुरावा, पगाराचे पगारपत्रक वगैरे.
- विविध ठिकाणी जसे बँक, पतसंस्था, फंड, बचतगटात केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे उदा पासबुक, वार्षिक अहवाल इ.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून झालेले संभाषण, गुगल ड्राइव्हवर, पेन ड्राइव्ह, लॅपटॉपवरील सीक्रेट फोल्डरमधे ठेवलेली कागदपत्रे, इ.
या कागदपत्रांचे करायचे काय?
- वरीलपैकी जी कागदपत्रे तुमच्याकडे नाहीत त्यांची एक यादी आणि त्यांचा तपशील तुमच्याकडे लिहून ठेवा.
- उदा. ७/१२ चा उतारा. तो न मिळाल्यास, जमिनीचा गट क्रमांक, जमीन बागायत आहे की जिरायत, किती आहे, किती लांबीचे तुकडे आहेत, पाण्याचा हिस्सा कोणाला, किती आहे, वाटेकरी किती आहेत, जमिनीच्या चतु:सीमा अशी माहिती बारकाईने लिहून ठेवा,
- नवऱ्याचे पगारपत्रक मिळत असेल तर जपून ठेवावे, पण ते मिळत नसेल तरी नवरा कुठे काम करतो तेथील मालकाचे नाव, पत्ता, फोन नंबर, पगाराची रक्कम, , पगारातून विविध बाबी जसे प्रोविडंड फंड, इन्शुरंस साठी वळत्या होणाऱ्या रक्कमेचा तपशील, पगारातून परस्पर केलेली गुंतवणूक समजून घ्या. इतर वेळी महत्त्वाचे न वाटणारे हे तपशील ऐनवेळी आठवत नाहीत म्हणून लिहून ठेवावे.
- मिळालेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढाव्यात, नोटरी किंवा विशेष दंडाधिकाऱ्यांची सही व शिक्का झेरॉक्स प्रतीवर असावा.
- प्रत्येक कागदपत्राची एक प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
- मूळ कागदपत्रे माहेरी, संस्थेत, मैत्रिणीकडे किंवा तुम्हाला सुरक्षित वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीकडे ठेवावीत.
- कागदपत्रे सांभाळण्यासाठी देतानाच संबंधित व्यक्तीला योग्य सूचना द्या, त्यांना समजावून सांगा की त्यातील प्रत्येक कागद अत्यंत महत्त्वाचा आहे. ही कागदपत्रे तुमच्याशिवाय कोणालाही द्यायची नाहीत, तसेच ती त्यांच्याकडे आहेत हेही कोणाला सांगायचेही नाही हा आवर्जून सांगा.
- तुम्ही ज्या व्यक्तीकडे कागदपत्रे दिली आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला कालांतराने काही शंका/संशय आल्यास त्यांच्याकडून कागदपत्रे परत कशी घेणार आणि नंतर कोणाकडे कागदपत्रे देणार याचा विचार त्या व्यक्तीच्या हातात कागदपत्रे प्रत्यक्ष देण्यापूर्वीच करायला हवा.
- ज्या व्यक्तीकडे कागदपत्रे आहेत तिने चुकून दुसऱ्या कोणाला तरी सांगितले तर कागदपत्रांची जागा बदलण्याचे नियोजन ताबडतोब करा.