आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय असतात? जाणून घ्या.
वर्षानुवर्षे स्त्रियांच्या आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. बातमी कानावर येते आणि आपण हलहळतो. कधी ती स्त्री परिचयातली असते, कधी नात्यातली तर कधी अगदी घरातली! एका स्त्रीच्या मृत्यूचा तिच्या कुटुंबावर खूप मोठा प्रभाव पडतो. अशा घटना खूप अस्वस्थ करणाऱ्या असतात. एखाद्या स्त्रीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं याची कारणं शोधताना अनेकदा त्यात समान धागाही दिसतो. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घटनेआधी त्यांच्या वागण्यात, विचारांत काही विशिष्ट बदल घडतात.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर हतबल वाटण्यापेक्षाही हे वर्तणूकीतील बदल आपल्याला टिपता आले, हे संकेत ओळखता आले तर त्या स्त्रीच्या अडचणी समजावून घेऊन तीला मदतीचा हात देता येईल.
यातून समुपदेशन, कायदेशीर मदत अशा विविध प्रकारे तील तिच्या अडचणीतून मार्ग दाखवता येईल. यातून एका स्त्रीचा जीव वाचेलच पान त्यातून तिच्या कुटुंबाची नंतर होणारी फरफटही थांबेल.
खाली दिलेले मुद्दे महिलांसोबतच पुरुषांनाही लागू होतात.
- मृत्यू किंवाआत्महत्येचा सतत विचार, बोलणं किंवा लिहिणे.
- निराशा, हतबलता, आपल्याला किंमत नसल्याची भावना चिंता, राग, मूडमध्ये बदल, निष्काळजी वर्तन, स्वत:कडे दुर्लक्ष
- कोषात जाणे, अंग काढून घेणे.
- निरोपाची भाषा, निरवा निरवीची भाषा वापरणे किंवा मौल्यवान वस्तूंचे इतरांना वाटप करणे.
- नेहमीच्या वागण्यात अचानक आणि आमूलाग्र बदल
- अंमली पदार्थाचे सेवन (दारू, ड्रग्ज इ.)
- यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न .
- गरज नसताना धोके पत्करणे.
- नुकतेच झालेले गंभीर मानसिक, वैयक्तिक नुकसान जसे अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेमभंग, व्यवसायात तोटा, गुन्ह्याचा आळ
- भूक व झोप याबाबत तक्रारी असतात.
- मित्रमंडळींना भेटणे, समाजात मिसळणे टाळणे
- काम, छंद, कौटुंबिक जबाबदऱ्या, सणवार यांमधला रस संपतो.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी ८० टक्के व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे वरीलपैकी काही लक्षणे दाखवितात. कौटुंबिक किंवा इतर हिंसाचाराची बळी असेलेल्या व्यक्तिमध्येही ही लक्षणे प्रकर्षाने जाणवतात. त्यांची दखल घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नांना आळा घालता येतो.
(संदर्भ – पुस्तक – मला जगायचंय् लेखक – अरुणा बुरटे, संगीता रेगे, पद्म देवस्थळी सेहत संस्था, मुंबई आणि कनेक्टिंग एनजीओ)
आत्महत्येचा विचार येऊ शकतो अशी, किंवा आत्महत्येचा विचार करणारी किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेली अशी व्यक्ती ओळखण्यासाठी पुढील मुद्यांची नोंद घ्यावी. यातील काही लक्षणे ही आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या, धोक्याच्या रेषेजवळ असलेल्या स्त्रियांमध्ये दिसतात, तर काही लक्षणे आत्महत्येचा विचार करण्याचा संभव असलेल्या स्त्रियांमध्ये दिसतात.
खालील परिस्थितीत असलेल्या व्यक्ती आत्महत्येच्या विचारात असते यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल, पण तो अयशस्वी ठरला असेल.
- सहज गप्पांमधून आत्महत्येचे विचार बोलून दाखवले असतील.
- जवळच्या नातेवाइकांमध्ये अथवा मैत्रिणींमध्ये कोणीतरी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल.
- जुनाट आजार, सततचे किंवा किंवा वारंवार उद्भवणारे आजारपण.
- अनेक दिवस / वर्ष मानसिक ताणतणावात असेल.
- खूप तापट स्वभाव असेल. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना सहन करता येत नसतील. झालेला अपमान विसरता येत नसेल, अवहेलना सहन होत नसेल.
- घरामध्ये किंवा कामाच्या सतत, खूप किंवा अधूनमधून पण असह्य छळ होत असेल.
- जवळचे कोणी माणूस गमावल्यामुळे खूप दुःखी असेल.
- अपयशामुळे निराश, खचलेली असेल.
- प्रचंड गरिबी, दारिद्रय व कर्जबाजारीपणामुळे स्वप्नांबाबत घोर निराशा झालेली असेल.
- एकटेपणा, एकलकोंडेपणा, सतत गप्प गप्प राहाणे.
- नेहमी शांत स्वभाव असलेली स्त्री अचानक बोलू लागली असेल, हसून खेळून राहू लागली असेल.
- शेजारी, मैत्रिणी यांच्याकडे निरवा-निरवीची भाषा बोलत असेल.
- “माझ्यानंतर नीट राहा, मी नसले तर तुमचे काय होईल?” अशा प्रकारची वाक्ये मुलांसमोर बोलत असेल.
- दुसऱ्या बाळंतपणासाठी दवाखान्यात किंवा माहेरी जाताना ज्याप्रमाणे एखादी स्त्री अत्यंत बारकाईने विचार करून पहिल्या मुलाची, नवऱ्याची सोय लावते; त्याप्रमाणे सतत जाच सहन करणारी एखादी स्त्री घरामध्ये भांडण झाल्यावर, अचानक आवराआवर करत असेल.
- छळ सहन करणाऱ्या एखाद्याकडून स्त्रीकडून ’माणसांचं काय, आज आहे. उद्या नाही.’ ‘आज सगळं जग दिसतंय. उद्या बघता, येईल का कुणी सांगावं?’, अशा अर्थाचे निराशावादी बोलणे परत परत ऐकायला मिळत असेल.
- तिला तिच्या आयुष्याबद्दल सखोल माहिती विचारा.
- तिच्याबरोबर खूप वेळ बोला.
- थोडेसे विषयांतर करून, थोडेसे आडून आडून, तर कधी थेटपणाने प्रश्न विचारून तिच्या मनातील घालमेल समजून घ्यायचा प्रयत्न करा.
- आपण प्रश्न विचारल्यानंतर, तिच्याशी चर्चा केल्यानंतर ती अस्वस्थ दिसली, तर तिच्या मनाची घालमेल, ताण कमी होईपर्यंत तिला शक्यतोवर एकटे सोडू नका. तिच्या सोबत राहा.
- आपण तिच्या मदतीसाठी व सहकार्यासाठी आहोत याची तिला खात्री द्या.
- तिच्या मनात आत्महत्येसंदर्भात काहीतरी विचार सुरू आहेत असे जाणवल्यास तिच्या संपर्कातल्या, तिची काळजी असणाऱ्या कोणास तुमचे निरीक्षण बोलून दाखवा.
- कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तिच्या संपर्कात राहा
- अडचणीवर तिला स्वतःला मात करता येऊ शकते, प्रश्नावर उशिरा का होईना, पण चांगली उत्तरे सापडू शकतात, असा तिच्या मनात विश्वास निर्माण करा. तिला धीर द्या.
- मनामध्ये जीवाचे बरे-वाईट करण्याचा विचार आल्यास ताबडतोब तिने कोणाशी तरी बोलले पाहिजे, हे तिच्या मनावर ठसवा. त्या व्यक्ती कोण असतील ते तिला आठवायला सांगा.
- ती ज्यांच्याशी आत्महत्येचे विचार बोलून दाखवू शकते त्यांच्याशी संवाद साधा. त्यांनी तिच्या मनातील विचारांबाबत सारखे न बोलता तिला काही मनातले सांगायचे असल्यास भरपूर वेळ द्यावा व बारकाईने तिचे म्हणणे समजून घ्यावे, असे त्या व्यक्तींना सांगा. तातडीने करण्याच्या हस्तक्षेपाचे नियोजन त्यांच्याबरोबर करा.
- ज्या व्यक्ती तीच्या आत्महत्येच्या विचारास कारणीभूत असतील, त्यांना चुकूनही अशा कोणाच्या आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगू नका. उदा., अनेकदा सासरी छळाला कंटाळून मुलींच्या मनात आत्महत्येचे विचार बळावतात. जर तिच्या सासरी तिच्या विरोधी वातावरण असेल तर कळत नकळत किंवा मुद्दाम तिच्या आत्महत्येच्या विचारांस खतपाणी मिळेल असे वर्तन घडण्याची शक्यता वाढते. काही बाबतीत तिचा खून करून मग तिनेच आत्महत्या केली असाही बनाव रचला जाऊ शकतो.
- आत्महत्येचे प्रयत्न करणारी व्यक्ती समाजाला किंवा कुटुंबाला काहीतरी सांगू इच्छित असते. ते समजून घेणे आवश्यक आहे.
- ज्या परिस्थितीमुळे व्यक्ती आत्महत्येस किंवा आत्महत्येच्या विचारास प्रवृत्त होते ती परिस्थिती बदलणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी मदत केंद्रामध्ये स्वयंमदत गट (सेल्फ हेल्फ ग्रुप) असावा. यामार्फत एकमेकांच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या मनाला उभारी मिळते आणि अडचणीतून मार्ग निघतो.
- मानसोपचारतज्ज्ञ तसेच ‘प्ले थेरपी’ सारख्या ‘थेरपी’ देणाऱ्या तज्ञांशी संपर्क ठेवून चर्चा करावी.
- आत्महत्येचे विचार करणाच्या व्यक्तीला मदत करताना तिच्या सुरक्षा नियोजनासंदर्भात पुढील मुद्द्यांचा आधीच विचार करून ठेवणे गरजेचे आहे.
- व्यक्ती कोणकोणत्या प्रकारे आत्महत्या करू शकते हे जाणून घेणे.
- त्यातून जीव वाचवण्याचे उपाय काय असू शकतात, हे आधीच समजून घेणे. (उदा. भाजल्यानंतर अथवा विषबाधा झाल्यावर नेमके काय करायचे असते, इत्यादी)
- संपर्कासाठी सरकारी दवाखाना, पोलीस स्टेशन, पोलीस पाटील यांचे दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक व पत्ते लिहून ठेवणे.
- अडचणीच्या वेळी मदतीला उपलब्ध असतील अशा व्यक्तींची नावे, पत्ते व दूरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक लिहून ठेवणे.
- आत्मघाताचा प्रयत्न झाल्यास त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी कोणती, ती उपलब्ध नसेल तर पर्यायी व्यवस्था काय असेल, याची तजवीज करून ठेवणे.
- संपर्कातील ज्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर आपण हे नियोजन करणार आहोत, उदारणार्थ डॉक्टर, गाडी उपलब्ध करून देणारी व्यक्ती इत्यादी. त्या सर्व व्यक्तींची नावे, त्याचे संपर्क क्रमांक, पर्यायी संपर्क, पत्ता यांची माहिती मदत करणाऱ्या व्यक्तीकडे असावी.