टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

स्त्रिया आणि लैंगिक हिंसा

भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांना एकीकडे देवी म्हणून त्यांना महिमामंडीत करण्याचा प्रयत्न दिसतो तर त्याच वेळी त्यांची तुलना पशु सोबत केली जाते. पितृसत्तेच्या चष्म्यातून बाईपणाचे गोळीबंद आदर्श उभे केले जातात आणि ‘चुकणाऱ्या’ स्त्रीला शिक्षा देण्याचा अधिकार पितृसत्ता आपल्या हाती ठेवते. आमच्याकडे स्त्रियांना उच्च दर्जा आहे म्हणत म्हणत मुलींना जन्माला येण्यापासूनच रोखले जाते.

लहान मुलीपासून ते ८० वर्षांची वृद्ध स्त्री या समाजात असुरक्षित असते ते या मुळेच. रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, खाजगी जागा ते अगदी स्वतःचे घर असे कुठलेच ठिकाण नाही जिथे स्त्रिया सुरक्षित आहेत. कौटुंबिक हिंसेच्या, लैंगिक हिंसेच्या असंख्य घटना आपण रोज ऐकतो, पाहतो, अनुभवतो. स्त्रीचे वागणे, बोलणे, दिसणे, चालणे, इतकेच काय तिचे असणेही ही पुरुषी नजर आणि सत्ता नियंत्रित करू इच्छिते. रात्री ८ ला मित्रासोबत बाहेर का फिरते आहेस हे एखादा ऐरागैरा पुरुष, जो एकप्रकारे तिला आपली जबाबदारीच समजतो, तिला सहज विचारतो. ‘उत्तर’ दिले म्हणून सगळे मिळून तिला निर्घृण धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. ज्याचा परिणाम पाहून सगळे जग हादरून जाते ते याच देशात.

मुली आणि महिलांवरील लैंगिक हिंसेच्या घटनांना नियंत्रण, बदला, सत्ता, मालकी, बाजार, जात, धर्म आणि वंश भेद असे अनेक पैलू आहेत. आपल्या वेबसाइटवरील ‘स्त्रिया आणि लैंगिक हिंसा’ या विभागात या सर्व पैलूंना आपण स्पर्श करणार आहोत. शिवाय कायदा काय म्हणतो, लैंगिक हिंसा ज्या स्त्रीला सहन करावी लागत असेल तिला कोणती मदत कुठे मिळू शकते, आपण तिला कशी मदत मिळवून देऊ शकतो अशा निरनिराळ्या अंगांनी या विषयाला या विभागात आपण भिडणार आहोत.