बालविवाह थांबविण्यासाठी सहाय्यभूत मार्गदीपिका
‘बालपण जपताना’ (मार्गदीपिकेविषयी)
आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड गेली अनेक वर्षे एकत्र काम करत आहे. महिलांचे हक्क आणि समानता या विषयावर दोन्ही संस्थांनी मिळून अनेक प्रकल्प राबवले आहेत. स्विसएडचे लिंगभाव समानतेचा काम प्रामुख्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये चालू होते. कोरोना २०१९ च्या महामारीने अनेक नवीन आव्हाने सर्वांसमोर आणली. त्यात या महामारीच्या काळात आधीच समानतेचे हक्क डावलल्या गेलेल्या गरीब आणि आदिवासी पाड्यातील मुली आणि महिलांची अवस्था तर अधिकच हलाखीची झाल्याचे लक्षात आले. अनेक कोवळ्या वयातील मुलींचे विवाह या काळात झाल्याचे निदर्शनास येऊ लागले. गरिबी, असुरक्षितता, शिक्षणासाठीच्या साधनांचा अभाव, अशा अनेक कारणांमुळे असे विवाह लावून देण्यात आले. कोरोनामुळे बालविवाहाची कमी होत असलेली आकडेवारी पुन्हा वाढीस लागली. ही बाब स्विसएडच्या निदर्शनास आली. त्यातच, बालविवाहाचे परिणाम, बाल विवाह प्रतिबंध कायदा, त्यात समाविष्ट केलेली बालविवाहांना रोखण्यासाठीची प्रणाली इत्यादी बाबत जन-माणसांत जागरुकता कमी असल्याचे देखील निदर्शनास आले. त्यामुळे, आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड या संस्थांनी एकत्रपणे बालविवाह या विषयावरील कायदा आणि त्यातील सर्व संबंधित घटक यांची भूमिका विस्ताराने मांडणारी मार्गदीपिका तयार करण्याचे ठरवले. या विचारातून ‘बालपण जपताना’ ही मार्गदीपिका जन्माला आली. या मार्गदीपिकेमध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग समाजातील विविध स्तरातील लोकांना नक्की होईल अशी आमची आशा आहे. या माहितीचा उपयोग करून बालविवाह सारख्या कुप्रथेला आळा घालण्याच्या कामाला आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड हातभार लावू इच्छिते.
“बालपण जपताना” ही मार्गदीपिका लवकरच प्रकाशित केली जाईल.