गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा

तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून सोनोग्राफीसारखे उपयुक्त तंत्रज्ञान मानवाला मिळाले. यामुळे पोटातील अवयवांची पाहणी करून योग्य त्यांच्या आजारचे योग्य निदान करता येते. पोटातील बाळाची वाढ, त्यात काही व्यंग, आजार नाही ना हे पाहणेही सोनोग्राफीमुळे शक्य होते. पण त्याच्याही पुढे जाऊन मानव या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत आहे.
सोनोग्राफीतून गर्भाचे लिंगही जाणून घेता येते. याचा दुरुपयोग मानवाने गर्भलिंग निदान करून स्त्री गर्भ नष्ट करण्यासाठी केला. यातूनच समाजातील एकूण स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आणि आता समजव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसू लागले.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने १९९४ साली गर्भलिंगनिदान विरोधी कायदा आणला. पुढे २००३ मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या.

गरोदर स्त्रीला पुढील परिस्थितीमध्ये तपासण्या करून घेण्यास परवानगी आहे –
- गरोदर स्त्रीचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल
- गरोदर स्त्रीचा यापूर्वी दोन किंवा अधिक वेळा नैसर्गिकरित्या गर्भपात झाला असेल
- गरोदर स्त्री काही धोकादायक औषधे, रसायने, रेडीएशनच्या संपर्कात आली असेल किंवा तिला संसर्ग झाला असेल
- गरोदर स्त्री किंवा तिचा पतीच्या कुटुंबात कोणला मानसिक, शारीरिक व्यंग, रक्तस्रावासंदर्भातील किंवा स्नायूंसंदर्भातील काही अनुवांशिक दोष असतील
वरील परिस्थितीमध्ये अनुवंशीकतेमुळे गर्भामध्ये काही आजार, विकार असण्याची शक्यता असते. त्यावर योग्य उपचार करून ते आजार टाळणे शक्य व्हावे यासाठी गर्भतपासण्यांना परवानगी दिली जाते.
अशा चाचण्यांमध्ये ‘गर्भाच्या लिंगची माहिती नको’ असे गरोदर स्त्रीने लेखी घोषित करावयाचे असते. तसेच या चाचणी करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकानेही सदर चाचणी गर्भलिंगनिदानासाठी चाचणी केली जाणार नाही’ हे घोषित करावे लागते.
गरोदर स्त्री, तिचा पती किंवा तिचे नातेवाईक यांनी कोणीही गर्भाचे लिंग तपासण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांवर दडपण आणू नये.
- वैद्यकीय व्यावसायिकाने, डॉक्टरांनी गर्भतपासणीच्या सर्व संभाव्य दुष्परिणामांची माहिती द्यावी.
- गरोदर स्त्रीची तिला समजेल अशा भाषेमध्ये या चाचण्यांसाठी लेखी संमती घ्यावी.
- लेखी संमतीची एक प्रत गरोदर स्त्रीला द्यावी.
- गर्भतपासणी करण्यास स्त्रीची लेखी संमती घेणे आवश्यक आहे.
- या चाचणीमध्ये गर्भ मुलगा आहे का मुलगी याची तपासणी करण्यास बंदी आहे.
- गर्भचाचणीद्वारे गर्भलिंगनिदान करून घेऊन नंतर गर्भपात करण्यास बंदी आहे.
- पोटातील गर्भाचे लिंग माहित करून गर्भपात करून मिळेल अशा स्वरुपाची जाहिरात करण्यास बंदी. उदा. छापील पत्रक, एस एम एस. इ
- सोनोग्राफी केली जाते ती जागा, सोनोग्राफी मशीन (तपासण्याचे मशीन) आणि मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची शासनाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- सोनोग्राफी मशीन, केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र/सर्टिफिकेट सर्वांना दिसेल अशा दर्शनी जागी लावलेले असावे.
- ज्या ठिकाणी सोनोग्राफी केले जाते त्याठिकाणी काही गोष्टी असणे बंधनकारक आहे
- वेटिंग रूम/थांबायची जागा, ओपीडी, सोनोग्राफी मशीनच्याशेजारी ‘येथे गर्भलिंग निदान केले जात नाही’ असा फलक मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असायला हवा.
- गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४, सुधारित २००३ या कायद्याचे पुस्तक असायला हवे.
- सोनोग्राफी तज्ज्ञाचे, मशीन वापरण्याचे प्रशिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र तिथे लावणे आवश्यक आहे.
- कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करणे आवश्यक असते. यामध्ये तीन डॉक्टर, वकील, माहिती अधिकारी आणि तीन सामाजिक कार्यकर्ते विशेषतः एक महिला संघटनेची प्रतिनिधी असावी.
या कायद्यानुसार पुढील कृत्ये गुन्हा मानली आहेत
- गर्भलिंगनिदान, गर्भतपासणी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे,
- त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणे,
- गर्भलिंगनिदान सेवांची माहिती छापील स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक, इंटरनेट वगैरे माध्यमातून जाहिरातींमधून प्रसारीत करणे वगैरे
वरीलप्रमाणे सेवा-सुविधा दिल्या तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो. असे गुन्हे न्यायालयाबाहेर तडजोड करून मिटवता येत नाहीत.
- या गुन्ह्यांसंदर्भात पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत कैद, किंवा रू. १०,०००/- पर्यंत दंड किंवा कैद व दंड अशी दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते,
- पुढील प्रत्येक वेळी दोषी आढळल्यास ५ वर्षांपर्यंत कैद किंवा रू. ५०,०००/- पर्यंत दंड किंवा कैद व दंड अशी दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते,
- तपासणी केंद्रावर गरोदर स्त्रियांच्या करण्यात आलेल्या सर्व तपासण्यांच्या नोंदी कायद्यात सांगितल्याप्रमाणे अचूकपणे न ठेवणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाला ३ महिने कैद किंवा रू. १०००/- दंड किंवा कैद व दंड दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
- पहिल्यांदा दोषी आढळलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी म्हणजे म्हणजेच व्यवसायाचा परवाना तात्पुरता रद्द होऊ शकतो.
- दुसऱ्यांदा दोषी आढळलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी म्हणजेच व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो.
- गर्भलिंगनिदानाच्या सेवांची जाहिरात करणाऱ्या व्यक्तींना ३ वर्षे कैद किंवा रू. १०,०००/- दंड किंवा कैद व दंड दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
- गर्भलिंगनिवड करण्याची मागणी करणाऱ्या, त्यासाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीस पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षाची कैद किंवा रू. ५०,०००/ पर्यंत दंड किंवा कैद आणि दंड दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
- गर्भलिंगनिवड करण्याची मागणी करण्यासाठी, त्यासाठी दबाव आणण्यासाठी दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास त्या व्यक्तीस ५ वर्षाची कैद किंवा रू. १,००,०००/ पर्यंत दंड किंवा कैद आणि दंड दोन्हीही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
- गरोदर स्त्रीवर कुटुंबियांचा दबाव आहे असे लक्षात आल्यास स्त्रीला शिक्षा होणार नाही मात्र एखादी गरोदर स्त्री स्वेच्छेने गर्भलिंगनिदान करण्याची मागणी असेल तर तिलाही शिक्षा होऊ शकते.