तुम्ही दिव्यांग असाल तर ही खबरदारी नक्की बाळगा.
हे जरूर करा
- आपला फोन नेहमी आपल्याजवळ ठेवा. त्यातील महत्त्वाचे नंबर पाठ करा किंवा लगेच डायल करता येतील असे ठेवा. शक्य असल्यास आपल्या पाल्याकडूनही महत्त्वाचे क्रमांक पाठ करून घ्या.
- आपल्याला कोणाबद्दल संशय वाटत असेल, एखाद्या व्यक्तीसोबत असुरक्षित वाटत असेल तर, तर आपल्या जवळच्या/विश्वासातल्या व्यक्तीला तुम्हाला जे वाटतंय ते सगळं सांगा.
- नेहमी आपल्या विश्वासातील व्यक्तीसोबतच राहा किंवा अशाच व्यक्तींना आपल्या सोबत राहू द्या.
- तुमच्यासोबत कोणी हिंसा करत असेल, तर मदतीसाठी आरडाओरडा करा.
- तुमच्यासोबत कोणतीही हिंसा किंवा तुमचे लैंगिक शोषण झाले असेल, तर विश्वासातील व्यक्तींना सांगा.विश्वासातील व्यक्तीला सोबत घेऊन अशा व्यक्तीची पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा, किंवा ११२ क्रमांकावर फोन करून कळवा.
- आपल्याला लागणाऱ्या गोष्टी नेहमी आपल्या जवळ ठेवाव्यात. (घरात आणि बाहेर जाताना ही.)
- घरातील सोयी-सुविधा, घराची रचना ही आपल्याला/ आपल्या पाल्याला वापरण्यास सहज होईल अशी करा. जसे घराचे दरवाजे व्हीलचेअर सहज जाईल असे मोठे हवेत, आवश्यक ठिकाणी आधारासाठी हॅंडल, कुठेही जखम, मार लागणार नाही अशी फर्निचरची रचना इ. (उदा. बाथरूम, टॉयलेट, किंवा घरातील इतर रचना.
- जेवढे शक्य असेल तेवढे स्वावलंबी जीवन हवेच. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कायम राहतो. उत्तम मानसिक आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे. मात्र याचबरोबर तुम्हाला गरज लागेल तेव्हा चटकन उपयोगी पडेल अशी मदत यंत्रणाही तुम्ही उभी करायला हवी.
- आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळेत जेवण करा. औषधे नियमित आणि वेळेवर घ्या आणि आणि डॉक्टरांनी सांगितला असेल तसा व्यायामही करा.
- आपल्या आवडीच्या गोष्टीत मन रमवा/छंद जोपासा.
- घरात पूर्णवेळ मदतनीस ठेवायचा असल्यास व्यक्ती पूर्ण विश्वासू, प्रशिक्षित आहे ना हे पाहून, त्यांचे ओळखपत्र, पार्श्वभूमी, पोलीस रेकॉर्ड तपासूनच कामावर ठेवा. हल्ली अनेक संस्था अशा सेवा पुरवतात. अशा विश्वासू संस्थांकडून मदतनीस घेतल्यास आपल्यावरचा तणाव कमी होतो. मदतनीसाची सर्व माहिती जसे ओळखपत्र, कायमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नं.) व फोटो आपल्याजवळ असू द्या आणि त्याने दिलेली कागदपत्रे खरी आहेत ना याचीही खात्री करा.
- मानसिक ताण-तणावासाठी समुपदेशकांची मदत घ्या.
हे कधीही करू नका
- कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये आणि त्याच्या सोबत जाऊ/पाठवू नये.
- घरात राहताना किंवा बाहेर जाताना शक्यतो एकटे राहू नका.
- तुमचा कोणी गैरफायदा घेत/घेतला असेल, तर गप्प बसू नका आणि घाबरू नका.
- स्वतःला दोष देऊ नका.
- नकारात्मक विचार करू नये.
- समाजातील व्यक्ती काय म्हणतील याचा विचार करू नये.
- स्वतःच्या जीवावर बेतेल असं काही करू नये किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
- स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करू नका.