टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की पुरुषांचे अपघात रस्त्यावर होतात तर स्त्रियांचे ‘अपघात’ घरात होतात. हे खरंच अपघात असतात का? मनात रुजलेल्या पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमुळे अनेकदा स्त्रियांना, त्यांना होणारा किंवा कोणी देत असलेला त्रास हा कौटुंबिक हिंसा आहे, आपल्यावर होणार अन्याय आहे, गुन्हा आहे आणि त्याबद्दल न्यायालयात दाद मागता येते हे माहितीही नसतं. हे समजण्यासाठी  म्हणून कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येत कोणकोणत्या घटना येतात हे समजून घेण्यास खालील प्रश्न मदत करतील.

प्रश्नावली

  • घरात कुटुंबीय तुमच्यावर सतत टीका करतात का?
  • तुमची इतरांबरोबर सतत तुलना केली जाते का?
  • कुटुंबीय तुमच्या शिक्षणावरून टोमणे मारतात किंवा तुमचा अपमान करतात का?
  • तुमचा व तुमच्या जवळच्या व्यक्तीचा अपमान केला जातो का?
  • तुमचा इतरांसमोर अपमान केला का?
  • तुम्हाला शिवीगाळ होते का?
  • तुम्हाला एकटे पाडले जाते का?
  • तुमच्याबरोबर अबोला ठेवला जातो का?
  • घरातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला वेगळे ठेवले जाते का?
  • घरातल्या सगळ्या समस्यांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाते का?
  • घरातील व्यक्तीकडून स्वत:ला इजा करून घेण्याची किंवा कोणाला इजा करण्याची, जीव देण्याची किंवा जीव घेण्याची धमकी तुम्हाला दिली जाते का?
  • तुम्हाला घराबाहेर काढण्याची किंवा घटस्फोटाची धमकी दिली जाते का?
  • तुम्ही काय बोलावे, कोणाशी बोलावे, कुठे जावे, केव्हा जावे हे कुटुंबातील इतर व्यक्ती ठरवतात का?
  • तुम्हाला तुमच्या मुलांपासून तोडले जाते का?
  • तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणी/ शेजारी, माहेराशी संबंध ठेवण्यापासून मज्जाव करतात का?
  • तुम्हाला नोकरी करण्यासाठी किंवा अर्थार्जन करण्यासाठी विरोध केला जातो का?
  • तुमच्याकडे सतत पैशाची मागणी केली जाते का?
  • तुमचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले जातात का?
  • तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य दिले जात नाही का?
  • प्रत्येक पैशाचा हिशोब तुमच्याकडून मागितला जातो का? आर्थिक व्यवहार तुमच्यापासून लपवून केले जातात का?
  • तुम्हाला शारीरिक इजा होईल असे वर्तन घडते का? उदा. मारणे, केस ओढणे, ढकलणे, चिमटा घेणे, चावणे, लाथा मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.
  • तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे का?
  • तुमच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली जाते का?
  • लैंगिक संबंधात त्रासदायक पद्धती वापरल्या जातात का?
  • तुमच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत का? नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे का?
  • तुम्हाला पुरेसे अन्न, वेळेवर वैद्यकीय उपचार, योग्य ती औषधे यांच्यापासून वंचित ठेवले जाते का?

या यादीत कौटुंबिक हिंसेचे हे काही प्रकार दिले असले तरीही ही यादी परिपूर्ण नाही. या पलिकडेही वेगवेगळ्या प्रकारे कौटुंबिक हिंसा घडते. ही हिंसा ओळखून त्याविरोधात आवाज उठवणे, प्रतिकार करणे, त्यासाठी मदत मिळवणे गरजेचे आहे. आपल्यावरील हिंसा सहन करू नका. स्वतःला दोष देऊ नका, हिंसेविषयी बोला, मदत मागा. हिंसामुक्त जीवन हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे.