हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी
भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबाचे मिलन. परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी कधी योग्य चौकशी न करता, काळजी न घेतल्याने मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते. विवाह करताना कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्यास विवाह अवैध मानला जातो व पुढे खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच, विवाह करताना कुठली काळजी घ्यावी, कायदा काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
भारतामध्ये अनेक जातीधर्मांचे लोक राहत असल्यामुळे, प्रत्येक धर्माचे वेगळे विवाह कायदे इथे अस्तित्वात आहेत. हिंदू व्यक्ती हिंदू विवाह कायदा, १९५५ अथवा विशेष विवाह कायदा, १९५४प्रमाणे विवाह करू शकते.
- कोणत्याही दोन हिंदू व्यक्ती या कायद्यांतर्गत विवाह करू शकतात. ‘हिंदू’ या शब्दाच्या व्याखेमध्ये शीख, जैन व बौद्ध लोकांचा देखील समावेश होतो. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे आंतरधर्मीय विवाह करता येत नाही. आंतरधर्मीय विवाह ‘विशेष विवाह कायदा, १९५४’ अंतर्गत करता येतो.
- दोन्ही व्यक्ती विवाहाच्या वेळेस विवाहित नसाव्या, म्हणजेच त्या अविवाहित, घटस्फोटीत अथवा विधुर/विधवा असाव्यात. आपल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतल्यावर अथवा त्याच्या मृत्युनंतर दुसरा विवाह करता येतो.
- पती व पत्नी दोघंही मानसिकरित्या विवाह करण्यास व संमती देण्यास समर्थ असणे गरजेचे आहे. पतीचे लग्नाच्या वेळेस वय कमीत कमी २१ व पत्नीचे कमीत कमी १८ असावे.
- पती व पत्नी हे कायद्यामध्ये दिलेल्या निषिद्ध नातेसंबंधांमधील नसावेत. उदा. भाऊ – बहीण, आत्येभाऊ – मामेबहीण, मामा – भाची, आत्या – भाचा अशा नात्यांमधील व्यक्तींच्या विवाहास कायदा मान्यता देत नाही. परंतु, संबंधित व्यक्तींच्या सामाजिक रूढी – परंपरेनुसार अशा प्रकारचा विवाह करता येतो.
- पती – पत्नी एकमेकांचे सपिंड नसावेत. अशा प्रकारचा विवाहदेखील, संबंधित व्यक्तींच्या समुदायांमध्ये प्रचलितरूढी – परंपरा असल्यास करता येतो.
- विवाह हिंदू पद्धतीने होणे गरजेचे आहे. जर पती – पत्नीच्या कुटुंब अथवा समुदायामध्ये सप्तपदीची पद्धत असेल, तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह संपन्न झाल्याचे मानले जात नाही.
वरील अटी बघून आपल्या लक्षात येईल की हिंदू विवाह कायदा, काही बाबींमध्ये आपल्याला रूढी, परंपरा, रिती, रिवाज पाळण्याची मुभा देतो. मात्र सदर रूढी, परंपरा रिती, रिवाज हे पूर्वापार चालत आलेले व कायद्याला मान्य असणारे असावेत. तसेच ते कुठलाही खंड न पडता आजही संबंधित समुदयामध्ये पाळले जाणारे असावेत. वर नमूद गोष्टींची पूर्तता करून संपन्न झालेला विवाह कायद्याने वैध मानला जातो
विवाह करताना काही तरतुदींची पूर्तता न झाल्यास विवाह जरी अवैध नसला तरी तो न्यायालयातून रद्द करून घेता येतो.
- विवाहाच्या वेळेस पती अथवा पत्नी मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्यास.
- विवाह करताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची माहिती लपवली असल्यास
- विवाह जबरदस्तीने झाला असल्यास.
- पती अथवा पत्नी विवाह संबंध ठेवण्यास सक्षम नसल्यास.
- विवाहाच्या वेळेस वधू त्रयस्थ व्यक्तीपासून गर्भवती असल्यास आणि ही माहिती वरापासून लपवली असल्यास, विवाह झाल्यापासून १ वर्षाच्या आत पती न्यायालयात दावा दाखल करून विवाह रद्द करून घेऊ शकतो.
वरील प्रकारचे विवाह कायद्याच्या दृष्टीने अवैध नसतात. मात्र न्यायालयात अर्ज करून हे विवाह रद्द करता येतात. असा अर्ज ठराविक मुदतीत करावा लागतो.
वरील माहितीवरून विवाहाचे तीन प्रकार दिसतात: वैध, अवैध आणि रद्द करता येणारा विवाह.
कायद्याप्रमाणे आवश्यक सर्व तरतुदींची पूर्तता केली तर विवाह वैध मानला जातो. अशा विवाहामधील दोन्ही व्यक्तींना पती-पत्नीचे सर्व कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. दोघांनाही एकाच्या मृत्युनंतर त्याच्या/तिच्या संपत्तीत कायदेशीर वारस म्हणून हक्क प्राप्त होतो. तसेच वैध विवाह अस्तित्वात असताना पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकत नाही.
विवाह अवैध असल्यास दोन्ही व्यक्तींना पती-पत्नीचे कुठलेही हक्क व अधिकार मिळत नाहीत. असा विवाह मूलतःच अवैध असल्याने न्यायालयातून नाते अवैध असल्याचा हुकूम आणणेही बंधनकारक नसते. त्यामुळे, न्यायालयातून हुकूम न आणताही पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकते. अशा विवाहातील दांपत्यांना एकाच्या मृत्युनंतर त्याच्या / तिच्या संपत्ती मध्ये कायदेशीर वारस म्हणून काहीही हक्क – अधिकार मिळत नाही.
रद्द करता येणारा विवाह न्यायालयातून हुकूम आणेपर्यंत वैध मानला जातो आणि तोपर्यंत दोघांनाही पती -पत्नीचे सर्व हक्क अधिकार प्राप्त होतात. अशा विवाहाला न्यायालयाने रद्द ठरवण्याआधीच एकाचा मृत्यू झाला तर दुसरा त्याच्या संपत्तीत कायदेशीर वारस म्हणून हक्क सांगू शकतो. मात्र कोर्टाने असा विवाह रद्द करेपर्यंत दोघेही दुसरा विवाह करू शकत नाही.
अशोक, एक हिंदू धर्मीय आणि जसमीत, एक शीख धर्मीय व्यक्ती हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करू इच्छितात. त्यांना कायद्याने हा विवाह करण्याची परवानगी आहे का? असा विवाह वैध मानला जाईल का?
उत्तर – हो. अशोक आणि जसमीत हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करू शकतात,कारण हिंदू विवाह कायद्यामध्ये ‘हिंदू’ ह्या शब्दाच्या व्याखेमध्ये हिंदूंसोबतच शीख, जैन आणि बौद्ध समुदायाचाही समावेश केला आहे.
मीना आणि अशोक हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करतात. सदर विवाह अस्तित्वात असतानाच, अशोकने सीमा ह्या दुसर्या मुलीशी विवाह केला. अशोक असे करू शकतो का? मीना अशोकला थांबवू शकते का? अशोक आणि सीमाचा विवाह वैध मानला जाईल का?
उत्तर – अशोक आणि मीनाचा विवाह अस्तित्वात असताना अशोक सीमाशी विवाह करू शकत नाही. सीमाशी विवाह हा अशोकचा दुसरा विवाह असल्याने आणि तो विवाहित असल्याने हा विवाह कायद्याने अवैध मानला जाईल. यात अशोक व सीमाला पती – पत्नीचे कुठल्याही प्रकारचे हक्क व अधिकार मिळणार नाहीत.
असा विवाह होणार असल्याचे समजल्यावर मीना कोर्टातून मनाईचा हुकूम आणून अशोकलादुसरा विवाह करण्यापासून रोखू शकते. तसेच, पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मीना अशोकविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या आधारे फौजदारी गुन्हा देखील नोंदवू शकते.
मीना आणि अशोक यांचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार झाला. लग्नाला ५ वर्ष होऊन देखील मीना व अशोक ला मूल-बाळ न झाल्याने मीना अशोकला दुसरा विवाह करण्यास आग्रह करते. मीनाच्या आग्रहामुळे अशोक मीनाला घटस्फोट न देता सीमाशी दुसरा विवाह करतो. अशोकच्या दुसर्या विवाहाला मीनानेच आग्रह केल्यामुळे हा विवाह वैध मानला जाईल का?
उत्तर – दुसर्या विवाहाला पहिल्या पती / पत्नीची जरी मान्यता असली अथवा त्यांच्या आग्रहामुळे जरी असा विवाह करण्यात आला असला तरी असा विवाह अवैधच ठरतो. अशोक आणि मीनाचा विवाह अस्तित्वात असताना अशोक सीमाशी विवाह करू शकत नाही. अशोक व सीमाला पती – पत्नीचे कुठलेही हक्क -अधिकार प्राप्त होणार नाहीत. तसेच, पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशोकविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या आधारे फौजदारी कारवाईदेखील होऊ शकते.
मीना १४ वर्षांची असताना तिचं लग्न २१ वर्षीय अशोकशी लावून दिलं. ती १६ वर्षांची असताना तिला या विवाहबंधनातून मुक्त व्हावेसे वाटत आहे. मीनाला काय करता येईल?
उत्तर – हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहाच्या वेळेस वधूचे वय कमीत कमी १८ वर्षे आणि वराचे वय कमीत कमी २१ वर्षे असणे गरजेचे आहे. विवाहाच्या वेळी पती अथवा पत्नीपैकी कोणाचेही वय कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असेल तर तो ‘बालविवाह’ समजला जातो.
मीना आणि अशोकचा हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह झाल्यावर अशोकला समजले की मीनाला मानसिक आजार तआहे. मीनाच्या या मानसिक आजाराची कल्पना अशोकला लग्नापूर्वी देण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत हे लग्न वैध आहे का? अशोक अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो?
उत्तर – या उदाहरणामध्ये अशोकची फसगत झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये कायदा अशोकला आपला निर्णय घेण्याची मुभा देतो. इच्छा असेल तर तो जर मीनाला तिच्या आजारासकट स्वीकारू शकतो. मात्र हे मान्य नसल्यास मीनाच्या आजाराचा व स्वत:च्या फसगतीचा पुरावा न्यायालयात देऊन विवाह रद्द करता येतो.
मीनाचा विवाह तिचा मामेभाऊ अशोकशी झाला. सदर विवाह वैध आहे का?
उत्तर – मीना आणि अशोकचे नाते हे हिंदू विवाह कायद्यानुसार प्रतिबंधित नात्यांमध्ये येते. त्यामुळे त्यांचा विवाह अवैध मानला जाईल. परंतु जर त्या दोघांच्या घराण्यांमध्ये अथवा समुदायांमध्ये पूर्वापार चालत आलेल्या रूढी – परंपरा प्रमाणे असा विवाह करण्याची पद्धत असेल तर असा विवाह वैध मानला जातो.
मीना आणि अशोक एका मंदिरा मध्ये जाऊन हार घालून विवाह करतात व एकत्र राहण्यास सुरवात करतात. त्यांचा विवाह वैध आहे का?
उत्तर – हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करताना वधू अथवा वर यांच्या घराण्यातील रूढी – परंपरा अनुसार विवाह करणे आवश्यक आहे. अशा रूढी – परंपरा मध्ये जर सप्तपदीचा समावेश असेल तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. मीना अथवा अशोकच्या घराण्यातील रूढी – परंपरा अनुसार जर सप्तपदी करणे गरजेचे असेल तर फक्त हार घालण्याचा विधी केल्यावर विवाह पूर्ण होणार नाही व त्यांचा विवाह अवैध मानला जाईल.
वरील उदाहरणामध्ये मीनाचे वय कायद्याने आखलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्याने त्यांचा विवाह बालविवाह आहे. त्यामुळे अशा बालविवाहातील पत्नी आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊ शकते.
यासाठी खाली दिलेल्या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे :
- विवाहाच्या वेळेस वधूचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज करताना पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त व १८ वर्षांपेक्षा कमी असावे.
वरील दोन्ही अटींची पूर्तता झाली असेल तर न्यायालय इतर कुठलेही कारण न बघता घटस्फोटाचा अर्ज मान्य करू शकते. मीना वरील दोन्ही अटींची पूर्तता करत असल्यामुळे ती घटस्फोटासाठी अर्ज करू शकते.
हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट घेण्याव्यतिरिक्त मीना बालविवाह प्रतिबंध कायद्यातील तरतुदींचादेखील उपयोग करू शकते. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पती व पत्नी दोघेही सज्ञान झाल्यावर ते पुढील २ वर्षात हा बालविवाह कोर्टातून रद्द करून घेऊ शकतात. म्हणजेच पत्नी १८ ते २० वर्षे पूर्ण होईपर्यंत व पती २१ ते २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत हा बालविवाह कोर्टातून रद्द करून घेता येतो. मीना आत्ता १६ वर्षांची असल्यामुळे बालविवाह प्रतिबंध कायद्यामधील तरतुदींचा वापर करून लग्न रद्द करून घ्यायचे असेल तिला १८ वर्षांची होईपर्यंत थांबावे लागेल.
बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार सज्ञान व्यक्तीने बालविवाह करणे, असा विवाह करण्यास एखाद्याला भाग पाडणे, अशा विवाहाला उपस्थित राहणे, व अशा विवाहाला सहाय्य करणे कायदेशीर गुन्हा असून अशा सगळ्यांवर फौजदारी कार्यवाही होऊ शकते.
वर्षा खंडागळे.
सहाय्यक प्राध्यापक
आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे