सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक ठिकाणी महिलांची छेडछाड होते. अनेकदा त्यांच्या व्यक्तिगत वावरायच्या जागा जसे घर आणि आजूबाजूचा परिसरही सुरक्षित असतोच असे नाही. अगदी तिच्या खाजगी वर्तुळातील लोक जसे नातेवाईक, कुटुंबीय किंवा बाहेरील अनोळखी लोक, कोणाकडूनही लैंगिक हिंसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठल्याही ठिकाणी आणि कोणाकडूनही स्त्री हिंसाचाराला बळी पडते हा सर्वसामान्य अनुभव आहे.
मात्र यातील अनेक प्रकारची हिंसा अशी असते की ती कृती हिंसा आहे हेच माहिती नसतं किंवा नकळत त्याकडे दुर्लक्ष होतं. या कोणकोणत्या कृती आहेत याची यादी खाली दिलेली आहे. यातील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुमच्या बाबतीत लैंगिक हिंसा घडत आहे हे समजा.

- कोणी शाळा, कॉलेजच्या आवारात किंवा घरातून बाहेर पडल्यावर कोठेही जाताना तुमचा पाठलाग करते का?
- कोणी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे एकटक बघते किंवा तुमच्यावर विविध माध्यमांतून लक्ष ठेवून असते का?
- रस्त्यावरून जाताना तुमच्या कपड्यावरून, शरीरावरून टिप्पणी किंवा तुम्हाला त्रास होतील अशा शब्दाचा वापर कोणी करते का?
- कोणी तुम्हाला बघून गाणी म्हणणे, शिट्ट्या वाजवणे अशा गोष्टी करते का?
- तुमच्या ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला एकटे बघून तुम्हाला निर्जन, एकांतात यायला सांगते का?
- कोणी तुम्हाला प्रपोज करून, तुमची इच्छा नसतानाही सतत बोलण्याचा प्रयत्न किंवा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबाव टाकते का?
- ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती त्यांचे लैंगिक अवयव तुम्हाला दाखवते का?
- कोणी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या शरीराला, किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करते का? (उदा.- असुरक्षित स्पर्श, कुरवाळाने, चिमटे घेणे इ.)
- कोणी तुम्हाला अश्लील/वाईट पद्धतीच्या खाणा-खुणा (जसं- डोळा मारणे, चुंबन घेण्याची कृती इ.) करते का?
- तुम्हाला कोणी शिव्या (लैंगिक अवयवावरून) देते का?
- प्रेमाच्या नावाखाली किंवा लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी/जबरदस्ती केली जाते का? किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जातं का?
- तुमच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली जाते का?/ जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले आहेत का?
- ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर बलात्कार केला आहे का किंवा तसा प्रयत्न केला आहे का?
- कामाच्या ठिकाणी तुमच्या कपड्यावरून, दिसण्यावरून बोलले जाते का? सूचक टिप्पणी करणे/गाणी म्हणणे असे घडते का? (आयटम, चिकणी, लैंगिक अवयवावरून वाक्य उच्चारणं इ.)
- तुम्हाला मुद्दाम उशीरापर्यंत कामावर थांबविले जाते का?
- तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढीच्या बदल्यात काही देण्याचे सुचवले जाते का? किंवा विनाकारण पगारवाढ केली जाते का?
- तुम्हाला जबरदस्ती कुठेही (चहा प्यायला, जेवायला, खरेदीला किंवा इतर ठिकाणी) घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो का?
- तुमच्या कामात लुडबूड होते का?
- तुम्हाला मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ, फोटो, मेसेज पाठविले जातात का? किंवा अशा प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात का? / मागणी केली जाते का?
- तुमच्याकडे कशाच्या तरी बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली जाते का/ लैंगिक संबंध ठेवले आहेत?