अनैतिक देहव्यापारासंबंधी शिक्षा
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे प्रत्येकाचे मूलभूत अधिकार आहेत. याबरोबरच माणसाला प्रेमाचीही गरज असते. पण आजही शेकडो लोक या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. या गरजा भागवण्याच्या उर्मीतूनच साठी अनेकदा लोक वाममार्गाला लागतात. यातूनच विशेषतः लहान मुले व स्त्रिया शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचाराला बळी पडतात आणि अशा व्यवसायात अनिच्छेने लोटल्या जातात.
- अनैतिक देहव्यापाराची व्याख्या अत्यंत विस्तृत आहे. यात जबरदस्तीने, बळजबरी करण्याची धमकी देऊन, पळवून नेऊन, फसवून, खोटे बोलून एखाद्या व्यक्तीला वेश्या व्यवसायासाठी ताब्यात घेणे, तिची वाहतूक करणे, वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे, अशा व्यक्तीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत करणे, यासाठी त्या व्यक्तीच्या दुर्बलतेचा, असहायतेचा गैरफायदा घेणे, स्वतःच्या सत्तेचा, ताकदीचा गैरवापर करणे या कृत्यांचा समावेश होतो. व्यक्तीला वेश्या व्यवसायास भाग पाडताना, तिच्या पालकांशी परवानगी घेण्यासाठी आर्थिक व्यवहार करणे , एखाद्या व्यक्तिला वेश्या व्यवसायास परवानगी देताना त्यापासून काहीतरी लाभ पमिळवणे, आर्थिक फायदा करून घेणे हेही अनैतिक देहव्यापाराच्या व्याख्येत येते.
- अपहरण, जबरदस्ती, दहशत, भीती, लबाडी, मारहाण, कट-कारस्थान अशा कोणत्याही मार्गाने वेश्या व्यवसायास खतपाणी घालणे ही गुन्हाच आहे.
- मानवी देहव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या व्यक्तीस कमीत कमी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होते. या गुन्ह्यासाठी दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- अनैतिक मानवी व्यापारातून कुंटणखान्यात आणलेल्या स्त्रीचे लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने तेथे जाणारी व्यक्ती किंवा कुंटणखाण्यात आढळणारी व्यक्तीसुद्धा गुन्हेगार आहे.
- कुंटणखान्यात आल्याबद्दल पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत कैद किंवा रू. २०,०००पर्यंत दंड किंवा दंड व कैद अशा दोन्ही प्रकारे शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा दोषी आढळलेल्या व्यक्तीस सहा महिन्यांपर्यंत कैद आणि रू. ५०,००० पर्यंत दंड अशा दोन्ही प्रकारे शिक्षा होऊ शकते.
- वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कुंटणखान्यात किंवा अन्यत्र डांबून ठेवणे हाही गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी कमीतकमी सात वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा तसेच एक लाख रूपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते.
- एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवून तिने स्वतःची सुटका करून घेऊ नये म्हणून तिचे दागिने, कपडे वगैरे वस्तू स्वतःच्या ताब्यात ठेवणे, तिने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल अशी तिला धमकी देणे हे लैंगिक शोषण समजले जाते.
- धार्मिक स्थळे, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था वगैरे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणे, गिऱ्हाईकांना आकर्षून घेण्यासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायास परवानगी देणे किंवा वेश्याव्यवसाय केला जातो याची माहिती असूनही त्याला विरोध न करणे हा गुन्हा आहे. संबंधित सार्वजनिक ठिकाणाच्या व्यवस्थापकांना त्याबद्दल दोषी मानले जाईल.
- वेठबिगारी, घरगुती कामे, शेतीबांधकाम, हॉटेल्स इ. ठिकाणी कामास ठेवणे
- अमली पदार्थांची ने-आण करण्यासारख्या बेकायदेशीर, गुन्हेगारी स्वरूपाच्या कामांसाठी त्यांचा वापर करून घेणे
- भीक मागण्यास भाग पाडणे
- त्यांच्या अवयवांचा व्यापार करणे
- वेश्या व्यवसाय करायला लावणे, सामाजिक व धार्मिक चौकटीत पवित्र मानल्या गेलेल्या पद्धतीत वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे. उदा. मुरळी, देवदासी इ.
- उत्तेजक साहित्य, पोर्नोग्राफी – चित्रे, व्हिडीओ तयार करण्यासाठी वापर करणे. उदा. नग्न फोटो काढणे, फिल्म तयार करणे, विकृत लैंगिक संबंधांचे चित्रण करणे इ.
अशा कृत्यांसाठी कायद्यांमध्ये गंभीर शिक्षेची तरतूद आहे.
वेश्या व्यवसायाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळावी असे वेश्यासंघटनांचे म्हणणे आहे. वेश्यावृत्ती हाही एक व्यवसायच आहेत. इतर व्यवसायांप्रमाणेच इथेही व्यवहार कोणाशी करायचा याचे स्वातंत्र्य वेश्येला आहे. या पार्श्वभूमीवर, वेश्येवर तिच्या मनाविरूद्ध अत्याचार करणे हाही गुन्हा ठरला पाहिजे.