टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास काय करावे? काय आहे कायदा?

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास काय करावे? काय आहे कायदा?

लैंगिक छळ म्हणजे?

  • स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली खालील कोणतीही कृती लैंगिक छळ समजली जाते. शारीरिक स्पर्श किंवा जवळीक साधणे, शरीर संबंधाची मागणी करणे किंवा तशी इच्छा ठेवणे, असुरक्षित स्पर्श करणे, कुरवाळणे, पाठ थोपटणे, चिमटे घेणे, हात लावणे.
  • स्त्रीच्या इच्छेविरुध्द तिच्या खाजगीपणाचे उल्लंघन करणारे शारीरिक जवळीक साधणारे कृत्या
  • स्त्रीला उद्देशून, लैंगिक अर्थाचे शब्द वापरणे जसे, आयटम, चिकणी इ.
  •  तीच्या पेहराव, लैंगिक अवयव, लिंग या संदर्भाने लैंगिक वाक्य उच्चारणे एखाद्या स्त्रीला पाहून गाणे गाणे, लैंगिक आवाज काढणे, शिटी वाजवणे किंवा शिव्या उच्चारणे.
  • अश्लील किंवा स्त्री सन्मानाला धक्का पोहचेल असे विनोद तीला पाठवणे किंवा सांगणे.
  • वैयक्तिक आयुष्यातील घटना किंवा खाजगी बाबी सर्वांसमोर उघडपणे बोलणे, स्वत:च्या किंवा पत्नीच्या खाजगी लैंगिक आयुष्याबद्दल चर्चा करणे. लैंगिक गोष्टींचा उल्लेख करुन पत्र, ईमेल किंवा फोन करणे, द्वयर्थी शब्द उच्चारणे
  • लैंगिक साहित्य किंवा तशी सामग्री उदा. अश्लील फिल्म, पुस्तके, फोटो दाखवणे किंवा त्यांची मागणी करणे
  • कामामध्ये लुडबुड करणे, एखाद्या स्त्रीला आकर्षित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अवाजवी महत्त्व देणे किंवा दुर्लक्ष करणे, हेतूपुरस्सररित्या तिच्या कामाबद्दल शंका साशंकता, भीतीदायक वातावरण तयार करणे, विरोध करणे
  • स्त्रिच्या आरोग्यावर आणि सुरक्षितेवर परिणाम होईल अशी अमानवी, अपमानास्पद वागणूक देणे

कामाचे ठिकाण म्हणजे?

  1. शासकीय, निमशासकीय आणि शासन पुरस्कृत इ. किंवा स्थानिक प्रशासन, सार्वजनिक कंपनी, महामंडळ किंवा सहकारी संस्था संचलित कोणतीही संस्था, उद्योग, कार्यालय, किंवा शाखा.
  2. खाजगी क्षेत्रातील संस्था किंवा कंपनीने संचालित केलेली संस्था, उद्योग, सोसायटी, विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था इ. तसेच व्यापारी, व्यावसायिक किंवा कौशल्य प्रशिक्षण केंद्र, शैक्षणिक संकुल आणि मनोरंजनाची ठिकाणे, उद्योग, आरोग्य किंवा वित्त इत्यादी क्षेत्रात पुरवठा, विक्री, वितरण किंवा अन्य सेवा देणाऱ्या संस्था.
  3. रुग्णालये किंवा शुश्रूषागृहे
  4. खेळांशी संबंधित संस्था, स्टेडीयम, वास्तू, खेळ किंवा तत्सम कामासाठी वापरात असलेली निवासी किंवा अनिवासी स्पर्धेची ठिकाणे
  5. कर्मचारी कामासंदर्भात भेट देत असलेली ठिकाणी किंवा नियोक्त्याने पुरवलेली साधनं, नियोक्त्याचे निवासाचे ठिकाण अथवा घर
कायद्याची व्याप्ती आणि कार्य समजून घेण्यासाठी त्यातील इतर व्याख्याः
  1. पीडित/तक्रारदार महिला – कामाच्या ठिकाणाच्या संपर्कात येणारी कोणत्याही वयाची स्त्री तक्रार देऊ शकते.
  2. घर कामगार – घरकाम करण्यासाठी थेट किंवा एखाद्या संस्थेमार्फत तात्पुरत्या/कायम स्वरूपी, अर्धवेळ अथवा पूर्णवेळ नेमलेली स्त्री ही घरकामगार ठरते. मात्र ती स्त्री घरमालकाची कुटुंबीय नसावी.
  3. कर्मचारी – नियमित, तात्पुरती, रोजंदारीने किंवा कंत्राटी असलेली व्यक्ती तसेच पगारी, बिनपगारी, ऐच्छिक काम करणारी व्यक्तीही कर्मचारी या व्याख्येत बसते. कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण, तपासणी किंवा ऑडीटसाठी येणारी व्यक्ती देखील कर्मचारी समजली जाते. मुख्य मालकाला माहिती नसताना ठेकेदाराने कामासाठी नेमलेली व्यक्तीही कर्मचारी असते.

समितीची स्थापना

तक्रार निवारण समितीची स्थापना दोन पद्धतीने होते.

  • दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ठिकाणी ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापना करावी लागते.
  • दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ठिकाणी संबंधित स्त्रियांसाठी ‘स्थानिक कामाची तक्रार निवारण समिती’ जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन करणे आवश्यक आहे.

या समितीच्या कामकाजाबाबत कायद्याने काही व्याख्या स्पष्ट केल्या आहेत.

समितीची स्थापना करण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत
  1. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेची अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी.
  2. संबंधित जिल्ह्यातील तालुका, प्रभाग, नगर परिषद या ठिकाणी कार्यरत महिलांना सदस्य म्हणून नेमावे.
  3. समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करावी.
  4. एक कायदेतज्ज्ञ व्यक्ती नेमण्यात यावी.
  5. निमसरकारी संघटनेची एक व्यक्ती नेमण्यात यावी.
  6. समितीचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो. दर तीन वर्षांनतर नवीन सदस्यांची नेमणूक करावी.
  7. समितीतील कोणत्याही सदस्याने तक्रारदार महिला, साक्षीदार, आरोपी किंवा तक्रारीसंदर्भातील माहितीची गोपनीयता राखावी. गोपनीयता भंग करणाऱ्या सदस्यास समितीतून काढण्यात यावे.
  8. समितीमधील सदस्याने पदाचा गैरवापर केला, त्यास एखाद्या अपराधासाठी शिक्षा झाली किंवा शिस्तभंग कारवाईत ती व्यक्ती दोषी ठरली तर अशा सदस्यास समितीतून काढण्यात यावे.
  9. समितीमधील सदस्यांना कामकाज चालवण्यासाठी ठरवून दिलेली फी किंवा भत्ता द्यावा.

तक्रार देताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

लैंगिक छळ कायदा या कायद्यानुसार, जिल्हाअधिकाऱ्यांकडे किंवा समाज कल्याण अधिकारी किंवा महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे थेट तक्रार देता येते.

इतरांशी बोला

लैंगिक शोषण थांबविण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे त्याबद्दल इतरांशी बोला. यामुळे समस्या नक्की काय आहे हे तुम्हाला व इतरांनाही कळेल. सहन करत राहिल्यास समोरच्याचे फावते. याउलट त्याबद्दल चर्चा झाल्यास मार्ग मिळतो. कदाचित इतरांनाही तसाच अनुभव आला असेल! स्वतःला दोष देऊ नका आणि विलंब करू नका. चर्चेमुळे समस्येचे अस्तित्व मान्य होईल आणि त्यावर उपाय शोधायला सुरुवात करता येईल. यामुळे तक्रारदार व्यक्तीलाही आपली व्यथा व्यक्त करण्यासाठी एक विश्वासू वातावरण मिळते. माहितीचा आधार मिळाला की अशा प्रकारच्या घटनांमध्ये नक्की काय पावले उचलायची हे लक्षात येते.

वेळीच आवाज उठवा

छळ करणाऱ्या व्यक्तीला तुमचा नकार स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये कळवा. त्याचं वर्तन अश्लील आणि अस्वीकारार्ह्य आहे हे तुमच्या शब्दातून, हावभावातून आणि कृतीतून दाखवून द्या. त्या त्या वेळी असा विरोध केला तर पुढे त्या व्यक्तीवर आरोप दाखल करताना या विरोधाचा फायदा होतो.

नोंद ठेवा

प्रत्येक घटनेची कुठेतरी नोंद ठेवा. तुम्हाला कोणी चिठ्ठ्या, पत्रे किंवा इतर कागद / चित्रे पाठवत असेल तर ती जपून ठेवा. त्या संदर्भातील तारीख वेळ, स्थळ आणि काय काय घडलं याचे सर्व तपशील लिहून ठेवा. कोणी साक्षीदार असतील तर त्यांची नावे लिहून ठेवा. संबंधित व्यक्तीस , आपल्याला कोणते वर्तन अयोग्य वाटत आहे हे पत्राद्वारे कळवून असं वर्तन त्वरित थांबवायला सांगा. हे पत्र औपचारिक, सभ्य भाषेत, तपशीलवार आणि मुद्देसूद असावं. अनेकदा तोंडी सांगण्यापेक्षा असे लिखित पत्र जास्त प्रभावी ठरते. या पत्राची एक प्रत तुमच्यापाशी नक्की ठेवा. आवश्यकता वाटल्यास त्याही एक प्रत मानव संसाधन विभाग (ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट)लाही पाठवा.

स्पष्ट नकार द्या

तुम्हाला मनाविरुद्ध, एखाद्या असुरक्षित स्थळी जावे लागत असेल, कृती करावी लागत असेल, प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत असतील तर अशा वेळी ठामपणे नकार द्या. ‘नाही’ म्हणा! त्या वेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल का वगैरे विचार करत बसू नका. पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या.

गाफील राहू नका

कोणत्या प्रकारच्या परिस्थितीपासून व लोकांपासून तुम्हाला धोका वाटतो याची सतत नोंद घ्या आणि याविषयी सतर्क रहा. गाफील राहू नका. तुम्हाला कोणी सावधान करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

अंतर्मनाची सूचना

धोक्याबाबत आपल्या अंतर्मनाचं ऐका. असुरक्षित परिस्थितीमध्ये बिलकुल थांबू नका. प्रतिकार करा. आधी तुम्ही कसे वागलात, कोणत्या प्रकारचे कसे संकेत दिलेत हे महत्त्वाचे नसून जर कोणी तुमच्यावर कसलीही जबरदस्ती करत असेल तर ती कोणत्याही वेळी थांबवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुमचा हा हक्क/अधिकार ओळखा आणि त्यानुसार वागा.

साक्षीदार निर्माण करा

लैंगिक छळ होत असल्यास त्या घटनेचे साक्षीदार निर्माण करा. तुमच्या विश्वासातील सहकाऱ्यांना याविषयी सांगा. तुम्हाला जेव्हा कोणी असा त्रास देत असेल तेव्हा तुमचा विश्वासू सहकारी ती घटना प्रत्यक्ष पाहिल किंवा ऐकेल हे पाहा. तुम्ही पुढे जेव्हा तक्रार कराल तेव्हा त्यासाठी याचा उपयोग होईल. तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला लैंगिक छळाविरुध्दच्या कार्यालयीन धोरणाचे नियम पाठवा.

संघटनेतील कार्यकर्ते / प्रतिनिधीशी बोला

तुम्ही जर कामगार/कर्मचारी संघटनेच्या सदस्य असाल तर तुमच्या संघटना प्रतिनिधीशी बोला.

वैद्यकीय तपासणी

जर तुम्हाला शारीरिक अतिप्रसंगाला सामोरे जावे लागले किंवा तुमच्यावर लैंगिक हल्ला किंवा बलात्कार झाला तर लगेच वैद्यकीय तपासणी (सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात) करून घ्या. त्याचा अहवाल मिळवा. हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कायदेशीर खटल्यात हा एक महत्त्वाचा पुरावा असतो.

योग्य व्यक्तीकडे तक्रार नोंदवा

तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत हे बघा आणि गरज वाटल्यास लिखित स्वरूपात तक्रार नोंदवा. तुमच्या संस्थेत लैंगिक शोषणविरोधी धोरण नसेल तर तुमचे संस्थाचालक तसे धोरण लागू करतील व त्यासंदर्भात संबंधित कारवाई करतील यासाठी प्रयत्न करा.

संघटनेतील कार्यकर्ते / प्रतिनिधीशी बोला

तुम्ही जर कामगार/कर्मचारी संघटनेच्या सदस्य असाल तर तुमच्या संघटना प्रतिनिधीशी बोला.

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ वाचण्यासाठी करा.