टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

जर तुम्ही अठरा वर्षांखालील असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होय असेल तर तुमच्या बाबतीत लैंगिक हिंसा किंवा तुमचे लैंगिक शोषण होत आहे. हे करणारी व्यक्ती तुमच्या परिचयातील किंवा ओळखीची असू शकते. अशा परिस्थितीत त्याबद्दल तुमचे आई-वडील किंवा शिक्षकांना या घटनेबद्दल लगेच सांगा.

प्रश्नावली

  • तुम्हाला खाऊ किंवा भेटवस्तू (गिफ्ट) देऊन किंवा त्याचे आमिष दाखवून एकट्यालाच बोलवतात का, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात का?
  • तुम्हाला स्वतःच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खाजगी अवयवांना (म्हणजे छाती, शु किंवा शीची जागा इथे) हात लावायला सांगतात का?
  • तुम्हाला नको असताना किंवा तुम्ही एकटे आहात असे पाहून तुमच्या गालांची किंवा ओठांची कोणी चुंबनं/पापी घेतात का किंवा तुम्हाला मिठीत घेतात का?
  • तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर स्त्री-पुरुषांचे नग्न (उघडे) फोटो किंवा व्हिडिओ दाखवतात का?
  • तुम्हाला एकटंच बघून किंवा बोलवून तुमच्या खाजगी अवयवांना (म्हणजे तुमची छाती, शु किंवा शीची जागा) कोणी हात लावतं का/लावला आहे का?
  • तुमच्या खाजगी अवयवाशी (म्हणजे तुमची छाती, शु किंवा शीची जागा)इथे जवळीक करून त्यांच्या शरीराच्या एखाद्या भागाचा किंवा वस्तूचा वापर करतात का?
  • तुमच्या खाजगी अवयवांना हात लावून ‘हा आपला सिक्रेट खेळ आहे, कोणाला सांगायचं नाही’ असं म्हणतात का?
  • तुमच्या खाजगी अवयवांना हात लावून नंतर तुम्हाला, ‘कोणाला सांगू नको, नाहीतर सगळ्यांना सांगेन.’ किंवा ‘तुलाच मारून टाकेन’ अशा धमक्या देतात का?

असं कोणी आपल्याशी वागत असेल, बोलत असेल तर लगेच आपल्या पालकांना किंवा विश्वासातील व्यक्तींना सांगा.

घाबरू नका, स्वतःला काही त्रास करून घेऊ नका.

आपल्या मुलांचे लैंगिक शोषण झाले आहे का हे पालकांनी कसे ओळखावे?

लैंगिकता हा भारतीय समाजातला एक निषिद्ध किंवा बंद दरवाजाआड बोलण्याचा विषय. त्यातही त्या बोलण्यात मोकळेपणा, स्पष्टपणा कमीच. आणि त्यामुळे त्यासंबंधीचे अत्याचार, या भीतीपोटी त्याबद्दल बोलणे टाळले जाते. अन्याय ही तर तोंड दाबून सहन करण्याची गोष्ट, कोणाला समजलं तर काय? आपल्या अब्रुचं काय? लैंगिक अत्याचार व्यक्तीच्या शरीरासोबतच मनावरही खूप मोठा आघात करतो. त्यात हे बालवयात घडले तर त्याचा माणसाच्या जडणघडणीवरही खूप मोठा परिणाम होतो. संकोच, अज्ञान, भीती अशा विविध कारणांमुळे याबद्दल मुलं चटकन बोलत नाहीत.

अशा घटना घडल्यावर मुलांच्या वागण्यात बदल होतात. मूल एकलकोंडे होते. लहान मुलांच्या बाबतीत काही संकेत वेळेवर ओळखणे, आपल्या मुलांमध्ये जागरूकता, विश्वास निर्माण करणे ही जबाबदारी पालकांवरच आहे.

प्रश्नावली

  • तुमच्या मुलाच्या/मुलीच्या वागण्यात चिंता वाटेल एवढा बदल जाणवत आहे का?
  • तुमची मुलगी-मुलगा नेहमीसारखे वागत नसेल तर असे का वागत आहे?
  • मूल कोणाशीच काही बोलत नसेल, एकटेच बसून रहात असेल तर असं का होत आहे?
  • मूल खूप घाबरलेलं, शांत-शांत दिसत असेल तर असं का होत आहे?
  • मूल नेहमी ज्या गोष्टी करतं उदा. खेळणे, अभ्यास करणे, मित्रांसोबत बोलणे किंवा इतर अशा कोणत्याही गोष्टी करत नसेल तर असं का होत आहे?
  • तिचे/त्याचे कशातच लक्ष लागत नसेल तर असं का?
  • तिच्या – त्याच्या शरीरावर किंवा खाजगी अवयवांवर काही जखमा/खुणा दिसत असतील तर असं का?
  • ती/तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असेल तर असं का?
  • कोणत्याच गोष्टीत मुलाला रस/आनंद/मजा वाटत नसेल तर असं का होत आहे?
  • काही व्यक्तींना बघून मूल घाबरत असेल तर असा का?

वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना मुलांशी हळूवार संवाद साधणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत  त्यांना समजून घेऊन, कुठलाही दोष न देता, मोकळेपणाने बोलून त्यांच्याकडून माहिती घेणे आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे.

एक पालक म्हणून खालील गोष्टी ध्यानात ठेवा.

हे जरूर करा

  • मुलांवर विश्वास ठेवा.
  • मुलांचा तुमच्यावर विश्वास असेल, ते त्यांचे अनुभव तुम्हाला विश्वासाने सांगतील असे वातावरण घरात निर्माण करा.
  • मुलांबरोबर प्रेमाने बोला आणि वागा.
  • मुलांबरोबर नेहमी मन-मोकळेपणाने संवाद साधा, त्यांच्याशी बोलत राहा.
  • मुलं जे सांगतात ते शांतपणे ऐकून घ्या.
  • मुलांच्या वागण्या-बोलण्यात जराही बदल जाणवला, तर त्यांच्याशी लगेच बोला.
  • मुलांच्या बाबतीत घडलेली हिंसा किंवा लैंगिक शोषण यात त्या मुलाचा काहीही दोष नाही हे मुलांना सांगा.
  • कोणी काही (खाऊ, भेटवस्तू, खेळणी, इ.) दिले किंवा कुठे जाऊ या असे म्हटले तर पहिल्यांदा पालकांना सांगणे, पालकांच्या परवानगीशिवाय ते घेऊ नये, तसेच कोणासोबत जाऊ नये याबद्दल मुलांना स्पष्ट सूचना द्या. असे काही घडले तर आधी आई वडिलांना सांगावे याची शिकवण द्या.

हे कधीही करू नका

  • मुलांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होईल असं बोलणे किंवा वागणे.
  • मुलांवर ओरडणे/रागावणे/शिक्षा करणे.
  • मुलांना खोटं सांगतोस/ बोलतेस असं म्हणणे.
  • विशेषतः अशा प्रसंगी मुलांना दोष देणे.
  • तुम्हाला खात्री किंवा विश्वास नसलेल्या जागी किंवा व्यक्तींसोबत (मग ती व्यक्ती कोणीही असो,) मुलांना एकटे सोडणे.
  • मुलांच्या बदललेल्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे.
  • मुलांना भीती घालणे/ घाबरवणे.
  • मुलं तुमच्यापासून एखादी गोष्टी लपवतील किंवा तुम्हाला कल्पना देणार नाहीत असं वातावरण घरात असणे.