कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना आधार देण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली
स्विसएडने नुकतेच एक मौल्यवान पुस्तिका – कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना आधार देत असताना कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली (Standard Operating Procedures – SOPs) तयार केली आहे. या पुस्तिकेचे नाव ‘कौटुंबिक हिंसा पीडित महिलांना सुरक्षितता आणि मदत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी – सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श कार्यप्रणाली’ असे असून त्याचे लेखन प्रसन्ना इनवल्ली यांनी केले असून, त्याचे परीक्षण डॉ. जया सागडे यांनी केले आहे.
गावपातळीवरील सामाजिक कार्यकर्ते (Community Volunteers / Civil Society Actors) हे स्थानिक असतात, आपल्या परिसराशी सुपरिचित असतात, त्यामुळे त्यांना कौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांची माहिती मिळवणे आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक ती मदत वेळेत पोचवणे शक्य होते. त्यामुळे कौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांपर्यंत लवकरात लवकर पोचून त्यांना सर्वात प्रथम मदत करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हिंसा पीडित महिलांसाठी आधाराची, मदत मिळवण्याची अशी पहिली जागा हे कार्यकर्ते ठरतात. सामाजिक कार्यकर्त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी जेणेकरून ते कौटुंबिक हिंसेच्या पीडितांना अधिक प्रभावी पद्धतीने मदत करू शकतील, ही कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ही आदर्श कार्यप्रणाली स्वेच्छेने काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, कौटुंबिक हिंसा पीडित महिलेला मदत उपलब्ध करून देताना कुठली पावले कधी उचलावी, काय करावे आणि काय करू नये या विषयी एक स्पष्ट आणि ठोस चौकट प्रदान करते. यात उदाहरणांसह ‘काय करावे आणि काय करू नये’ (Dos and Don’ts) याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. कायदा राबविणारी यंत्रणा, आरोग्यसेवा प्रदाते, आणि इतर संस्थांशी आपण कधी आणि कसा समन्वय साधू शकतो या विषयीही एक तपशीलवार रूपरेषा या कार्यप्रणाली मध्ये देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पीडित महिला व मदतकर्ती/कर्ते यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने करायचे उपाय यांचाही अंतर्भाव या कार्यप्रणालीमध्ये आहे, जेणेकरून त्यांचा धोका कमी होईल आणि संबंधित व्यक्तींचे हितही जपले जाईल.
हिंसेच्या घटनेला द्यायच्या प्रतिसादांचे प्रमाणीकरण झाल्यामुळे, निरनिराळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीत सुसंगतपणा असेल, गोंधळ कमी होईल आणि हिंसा थांबण्याच्या दृष्टीने पीडित व्यक्तीला येणारा अनुभव एकुणात चांगला असेल हे या आदर्श कार्यप्रणालीमुळे सुनिश्चित होईल अशी आशा आहे. कौटुंबिक हिंसेच्या केसेस हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपली नेमकी भूमिका आणि जबाबदारीविषयी चांगली समज निर्माण होण्यासाठी आणि नवीन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठीही ही आदर्श कार्यप्रणाली एक मौल्यवान संसाधन ठरेल.
स्विसएडच्या प्रस्तुत प्रकल्पात सहभागी संस्थांसोबतच कौटुंबिक हिंसा प्रतिबंधाच्या मुद्यावर काम करणाऱ्या इतरही व्यक्ती आणि संस्थाना या आदर्श कार्यप्रणालीचा त्यांच्या कामात नक्कीच उपयोग होईल अशी आम्हाला खात्री आहे. आम्हाला विश्वास आहे की या कार्यप्रणालीमुळे कौटुंबिक हिंसेला प्रभावी प्रतिसाद देण्याची प्रक्रिया अधिक प्रमाणित, सुरक्षित आणि परिणामकारक होईल.