“जिथे नारींचा सन्मान केला जातो तिथे देव निवास करतात”
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥
मनुस्मृति ३.५६
अर्थात जिथे नारींचा सन्मान केला जातो तिथे देव निवास करतात आणि जिथे त्यांचा अपमान केला जातो तिथे सर्व धर्म आणि कर्म विफल ठरतात. आपल्या तीन हजार वर्षांच्या वैदिक इतिहासात अनेक विद्वान आणि महान व्यक्तींनी स्त्रियांचे समाजातील महत्व अधोरेखित केले आहे. तरीही पुरुषप्रधान संस्कृती आणि पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांमुळे स्त्रियांची प्रतिमा आजही दुय्यम दर्जाची समजली जाते. त्यांच्यावर होणारे अन्याय आणि शोषण यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. एका बाजूला आपण स्त्री-पुरुष समानता, समान कामासाठी समान वेतन, समान पदासाठी समान वागणूक हे समतेचे पाठ्यपुस्तकी पाठ गिरवतो पण वास्तव मात्र भीषण आहे.
स्त्रियांवर होणार हिंसाचार मग तो घरगुती असो किंवा सार्वजनिक दोन्हींचे प्रमाण समाजात अत्यंत वेगाने वाढत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ऑगस्ट 2022 च्या अद्ययावत माहितीनुसार भारतात दररोज 86 बलात्कार होतात आणि 49 महिलांविरोधी अत्याचाराच्या घटना घडतात. एका विकसनशील आणि महान सांस्कृतिक ठेवा असलेल्या देशासाठी ही अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेची बाब आहे. जवळपास 30% भारतीय महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी आहेत. साधारणतः 2017 ते 2021 या काळात 35000 हुंडाबळी नोंदवले गेले आहेत. या सगळ्यावरून आपल्याला आपली सामाजिक स्तिथीची आणि लैंगिक समानतेच्या अभावाची जाणीव होते.
आपल्या आयुष्यात आई, बहीण, बायको, मुलगी आणि इतर अनेक महत्वाच्या भूमिका बजावणारी एक स्त्री असली तरीही आपण स्त्रियांशी भेदभाव करण्यात अजिबात डगमगत नाही. बुरसटलेले विचार आणि हीन वृत्ती यांनी भारतीय स्त्रियांचे अधःपतन केलेले आहे. जोपर्यंत आपला समाज स्त्रियांविरोधी भूमिका सुधारत नाही तोपर्यंत आपला समाज विकसित म्हणवून घेण्यास लायक नाही.
स्त्रीविरोधी गुन्हे आणि अत्याचार ताबडतोब थांबवणे ही काळाची गरज आहे. 21 व्या शतकात आपले राष्ट्र प्रगतीपथावर असताना आपण आपल्या देशातील नारींचा योग्य सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. आजघडीला स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि शोषित स्त्रियांचा आवाज बनण्यासाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत ज्यांचा लाभ घेऊन नारी सशक्तीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली जात आहे. भारत सरकारच्या प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्ज्वला योजना, किशोरी शक्ती योजना, सखी एप या आणि अश्या अनेक योजनांनी भारतीय स्त्रियांना सशक्त करण्यात अवर्णनीय योगदान दिलेले आहे.
परंतु स्त्रियांसंबंधित कौटुंबिक आणि सार्वजनिक हिंसाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फक्त सरकारी यंत्रणा पुरेशी नाही. समाजाची मानसिकता आणि इच्छाशक्ती यांचेदेखील या कार्यात तितकेच महत्व आहे. पोलीस, प्रशासन, दक्ष आणि सुजाण नागरिक यांनी एकजूट होऊन आपल्या आजूबाजूला होणाऱ्या महिलांविरोधी कारवायांचा वेळीच पाठपुरावा करून योग्य कारवाई केल्यास समाजातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. सर्वतोपरी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्त्रीविरोधी हिंसा आणि अन्यायाचा त्याग करून त्यांना योग्य सन्मानजन्य वागणूक दिल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषांनी माता, भगिनी किंवा मुलगी पाहिल्यास समाज खऱ्या अर्थाने प्रगती करेल.
महिला या कोणत्याही लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राच्या आधारस्तंभ आहेत. त्यांचे संवैधानिक अधिकार आणि मूल्यांचं जतन करणं ही सर्व समाजघटकांची जबाबदारी आहे. कारण राष्ट्रउभारणीच्या कार्यात पुरुषांइतके स्त्रियांचे देखील योगदान महत्वाचे आहे. ज्योतिबानी साथ दिली नसती तर सावित्रीबाई महान झाल्या नसत्या, महादेव रानडे नसते तर रमाबाई मोठ्या झाल्या नसत्या, तात्या टोपे नसते तर लक्ष्मीबाई लढवय्या झाशीच्या राणी झाल्या नसत्या, मल्हारराव नसते तर अहिल्याबाई घडल्या नसत्या. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजाचे अविभाज्य घटक बनवणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तरच खऱ्या अर्थाने आपला भारत देश सुजलाम, सुफलाम म्हणता येईल.
NAME: SAGAR DADASAHEB LONDHE.
ROLL NO.: 2022/BBALLB/12.
BATCH: 2022-2027.
YEAR OF STUDY: 2nd YEAR.
INSTITUTION NAME: MAHARASHTRA NATIONAL LAW UNIVERSITY, AURANGABAD.
EMAIL: 22bballb12@gmail.com
PHONE NO.:9096918460.