टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी हिंसा म्हणजे काय हे माहीत असणे आवश्यक असते. हिंसा दरवेळी शारीरिक स्वरूपाचीच असते असे नाही. अनेकदा ती अप्रत्यक्षरीत्या वेगवेगळ्या रूपात आपल्या आजूबाजूला सुप्तपणे घडत राहते, आणि ती घडते याची कोणाला जाणीवही होत नाही. जेष्ठ नागरिक बरेचदा अशा सुप्त हिंसेला बळी पडतात. आता आपलं वय झालं, कशाला मुलांच्या संसारात लुडबूड करावी, आपलीच मुले आहेत, होतात चुका अशा दृष्टिकोनातून ज्येष्ठ मंडळी अशा वागणूकीकडे दुर्लक्ष करतात आणि त्रास सहन करत राहतात. पण सन्मानाने जगणे हा प्रत्येकाचाच हक्क आहे आणि तो कोणाकडून हिरावून घेणे हा गुन्हा आहे.

या लेखामध्ये दिलेली प्रश्नावली वापरुन आपल्या किंवा इतर कोणा ज्येष्ठ नागरिकांच्याबाबतीत हिंसा घडते आहे का हे ठरवता येईल. यातून हिंसा समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळवता येईल आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहतील.

प्रश्नावली

  • तुम्हाला घरातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते का?
  • घरातील कोणतीच व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही का? किंवा कामापुरतेच बोलते का?
  • तुम्हाला न सांगताच घरातील सगळ्या व्यक्ती काही दिवसांसाठी बाहेर निघून जातात का?
  • तुम्हाला घरात नक्की काय चाललंय याबाबत माहिती दिली जाते का?
  • तुमच्याकडे असलेल्या पैशाची, दागिन्यांची सतत मागणी केली जाते का? किंवा तुम्हाला आत्ता त्याची काय गरज असं म्हणतात का?
  • तुम्हाला जमत नसलेली (म्हणजे तब्येतीमुळे किंवा इतर कारणांमुळे) कामे सांगितली जातात का?
  • तुमची तब्येत बरी नसताना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात का? वेळेत औषधे दिली जातात का?
  • तुम्हाला जेवण दिले जाते का?
  • तुमच्या जेवणाच्या वेळा पाळल्या जातात का?
  • तुमचा सतत अपमान केला जातो का ? टोमणे मारले जातात का?
  • तुमच्या सहवासात घरातील व्यक्ती थांबतात का?
  • तुम्हाला विनाकारण त्रास दिला जातो का?
  • तुम्ही मागितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीं (उदा. काही खावंस वाटलं ते, कपडे इ.) ह्या शक्य असून दिल्या जात नाहीत का? खूप वेळाने किंवा दिवसांनी दिल्या जातात का?
  • कोऱ्या कागदावर किंवा काही लिहिलेल्या कागदपत्रांवर त्यामध्ये काय आहे हे तुम्हाला न सांगता, त्या कागदपत्रांवर तुमची सही/अंगठा घेतला गेला आहे का?
  • जबरदस्तीने अथवा ब्लॅकमेल करून तुमच्या नावावर असलेली संपत्ती इतरांच्या नावांवर करायला सांगतात का?
  • तुमच्याकडे आर्थिक जमा-पुंजी नसल्यामुळे तुम्हाला सतत त्रास देतात का? तुम्हाला घरात राहू नका असं म्हणतात का?
  • तुम्हाला शारीरिक इजा होईल असे वर्तन करतात का? उदा. मारणे, केस ओढणे, ढकलणे, चिमटा घेणे, चावणे, लाथ मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.

आपल्यासोबत असे होत असेल तर कृपया सहन करू नका. आपल्या विश्वासातील व्यक्तींना सांगा किंवा या वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर त्वरित संपर्क साधा. मदत मिळवा.