फोन, मोबाईल, इंटरनेट, समाज माध्यमे आदिंचा उपयोग करून स्त्रियांना त्रास देणे, लैंगिक छळ करण्याचे अनेक प्रकार आपण नेहमी ऐकतो, पाहतो, अनुभवतो. फेसबूक, इंस्टाग्राम, टिकटॉक, ट्विटर, निरनिराळे ब्लॉग्ज, संकेतस्थळे यांचा समावेश समाज माध्यमांत होतो. निरनिराळे डेटिंग, मैत्री, मनोरंजनासंबंधित ॲप्स (उदा . बंबल, टिंडर, भारत मॅट्रीमोनी, कोरा, रेडीट्ट, स्कूट इ.) यांचाही समावेश होतो. खाली दिलेल्या प्रश्नावली चा वापर करून तुम्ही या हिंसेबद्दल जाणून घेऊन वेळीच मदत मागू शकता.

- तुम्हाला मोबाईलवर, ईमेल किंवा इतर माध्यमातून कोणी अश्लील संदेश, चित्रे, व्हिडिओ क्लिप पाठवते का?
- वॉट्स ॲप किंवा इतर समाज माध्यमातून (फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर इ.) तुमची इच्छा नसताना विनाकारण तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला जातो का?
- समाज माध्यमांवरील तुमच्या छायाचित्रांचा कोणी गैरवापर करत आहे का किंवा केला आहे का? ते वापरुन तुम्हाला कोणी त्रास (धमकी, ब्लॅकमेल, बदनामी, डीपफेक व्हिडिओ करणे इ.) देत आहे का ?
- तुमची माहिती, फोटो किंवा नाव वापरुन कोणी खोटे खाते/ प्रोफाईल तयार केले आहे का? या माध्यमातून इतर कोणाची फसवणूक केली आहे का?
- समाज माध्यमाद्वारे ओळख करून, मैत्री करून तुमची कोणत्याही फसवणूक, लैंगिक शोषण झालेले आहे का? होत आहे का?
- तुमच्या खाजगी प्रसंगांचे फोटो, व्हिडीओ तुमच्या परोक्ष वेबसाईट किंवा समाज माध्यमांवर किंवा अश्लील वेबसाईट्सवर अपलोड केले आहे का? त्याद्वारे तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत आहे का?
- वधू-वर सूचक मंडळे, त्या संदर्भातील वेबसाईट्स, डेटिंग ॲप्सचा वापर करून, नातेसंबंध निर्माण करून किंवा तसे करण्याचे वचन देऊन तुम्हाला कोणी फसवत आहे का किंवा फसवलं आहे का?
वरील सर्व प्रकार समाज माध्यमांच्या (सोशल मिडिया)च्या माध्यामांतून होणाऱ्या हिंसेमध्ये मोडतात. या घटना अनोळखी व्यक्तीकडून किंवा अगदी ओळखीच्या व्यक्तीकडूनही घडल्या तरी ती हिंसाच आहे हे लक्षात ठेवा.